आप्पाचीवाडी भाकणूक :भारत हिंदू राष्ट्र बनेल ; जगात जयजयकार चालेल

 भारत हिंदू राष्ट्र बनेल ; जगात जयजयकार चालेल, तिसऱ्या महायुध्दात निष्पापांचे बळी जातील



दि ११ ऑक्टोबर २०२५
 श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्र-कर्नाटकासह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी पहाटे ४:१० ते ६:२० या वेळेत नाथांची पहिली भाकणूक झाली. वाघापुरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिध्दार्थ डोणे (महाराज) यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली.
आप्पाचीवाडी भाकणूक :भारत हिंदू राष्ट्र बनेल ; जगात जयजयकार चालेल

पाच दिवसांपासून सुरु असलेली ही यात्रा उत्साहात पार पडत आहे. शनिवार या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करुन आशिर्वाद घेतला. उद्या रविवार दि.१२ रोजी सायंकाळी खडक मंदिर येथे उत्सवस्थळी बसलेली पालखी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.
नाथांच्या भाकणुकीतून नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी, विविध परंपरेने आणि जाती धर्माने नटलेला भारत देश अखंड हिंदू राष्ट्र बनेल,जगात जयजयकार चालेल असे भाकित केले. अंडरवर्ल्ड डॉन यापूर्वी इतर देशातील मारले जातील असे भाकीत नाथांनी केले होते. परंतू यावर्षी भारतातील अंडरवर्ल्ड डॉन मारले जातील, तसेच तिसरे महायुद्ध होवून निष्पापांचे बळी जातील अशी नविन भविष्यवाणी करताना चालविन क्रिया चालविन,डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, बांधा आड बांध शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे, मेघाच्या पोटी आजार आहे. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाया, लागलाय दुनिया न्याहळु लागलाय, त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडला आहे. नऊ ते नम, सात ती भोंब बरोबर हाय, वाडी-कुर्लीचा आघात मोठा आहे. जगात झेंडा मिरवल, भोंब पोर्णिमेला माझा सोहळा निघतोय,चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय, कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला ३३ कोटी देवांचा दरबार भरतोय. आप्पाचीवाडी सोन्याची काढी हाय. वाडी-कुर्लीचा आगाद येथे नाथांचा दरबार भरला आहे. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. हालसिद्धनाथांचा त्रिभुनात जयजयकार चालेल, वाडी-कुर्लीच्या पुजारी-मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी-कुर्लीच्या सबीन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला. हालसिद्धनाथांच्या नविन बांधकामाला ३३ कोटी देवांचा आशीर्वाद आहे. अशाप्रकारे भाकणूक कथन केली.

नाथांची नवीन भविष्यवाणी....

भारतातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, टोळीयुद्ध चालेल,धुमसत राहील, भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल.देशात समान नागरी कायदा येईल,बारा बाजार मोडून एक बाजार होईल,लाकूड सोन्याचे होईल, चालता-बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल, सूर्य-चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल, हालसिद्धनाथ तीर्थक्षेत्राच्या नवीन बांधकामासाठी ३३ कोटी देवांचा आशीर्वाद राहील, महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल, जाती-धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल, हाणामारी होतील, भारत-पाक सीमेवर रण धुमेल पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारत मातेचा जयजयकार होईल, आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन, कडधान्य उदंड पिकल,दीड महिन्याचे पीक येईल, जगातील तापमान उच्चांकी वाढ होऊन जंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील, वस्त्रोद्योग अडचणीत येईल, गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील, ऋतुमानात बदल होईल, काँग्रेस पक्षात फूट पडेल, राजकारणात भगवा फडकेल,चीनचा भारतावर हल्ला होईल तर गावातील इडा-पिडा दुर करून रिध्दी-सिध्दी दाखवित बारा बलुतेदारांना सुखी ठेऊन भक्तांची राखण करीन असे सांगत नाथांनी धोक्याचा इशारा देत काही अंशी भक्तांना दिलासाही दिला.

सत्यात उतरलेली भाकणूक.....

विशेष म्हणजे नाथांनी गेल्या दोन वर्षापुर्वी देशात समान नागरी कायदा येईल, असे सांगून एका अर्थाने नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत हालचाली चालवल्या आहेत. यापुर्वी नाथांनी भारतावर दहशतवादी हल्ले होऊन निष्पापांचे बळी जातील असे भाकित केले होते. पहलगाम हल्ल्यांच्या निमित्ताने हे भाकीत खरे ठरले. पाकिस्तान कडून हल्ले सुरुच राहतील भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल हे देखील ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने खरे ठरले.अशी असंख्य नाथांची भाकणुकीतील भाकिते सत्यात उतरत असल्याचे वास्तवात दिसत आहे.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম