महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही
भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या व्यावहारिक नाडय़ा मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत. त्यात नेहरू-गांधी घराणे अग्रस्थानी आहे. देशाचे पंतप्रधानपद आजवर काही अपवाद वगळता नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिले आहे.
मग ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव असोत. स्थानिक ते राष्ट्रीय राजकारणात वारसांचे राजकारण हे एक प्रमुख अंग, किंबहुना एक वैशिष्टय़च बनले आहे.विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, नीलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते-पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हीना गावित इत्यादी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय उमेदवारांना घराण्याची राजकीय पाश्र्वभूमी आहे.काहींना राजकीय घराणेशाही ही लोकशाहीला मारक वाटते, काहींना ती समाजमनाने स्वीकारलेली अपरिहार्यता वाटते.
तर नव्याने नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांना घराणेशाही हा अडथळा वाटतो. मात्र, ‘घराणेशाही’ या शब्दात अनेक गíभतार्थ दडलेले आहेत. त्यात नकारात्मक अर्थ अधिक आहे. ‘राजकीय कुटुंब’ असा घराणेशाहीला शोभणारा सौम्य अर्थही त्यात आहे.
महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे, पवार, पाटील, चव्हाण, मोहिते अशा मोजक्या कुटुंबांभोवती फिरत असल्याची चर्चा होते. महाराष्ट्रातील कौटुंबिक वारशाच्या राजकारणाला सुरुवात झाली ती सहकारी कारखानदारीचा आरंभ करणाऱ्या विखे-पाटील कुटुंबापासून. साधारण १९७० च्या दशकात बाळासाहेब विखेंचा काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला. तेव्हापासून महाराष्ट्रात घराणेशाहीला आरंभ झाला असे मानले जाते. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखेंच्या सहकाराच्या मॉडेलचा अंगीकार जितक्या तन्मयतेने महाराष्ट्राने केला, त्यापेक्षा अधिक आवडीने त्यांच्या कौटुंबिक वारशाचा अवलंब केलेला दिसतो. ज्या गतीने आणि पद्धतीने विखे संस्थान वाढत गेले, त्या गतीने नसले, तरी त्या पद्धतीचा अवलंब महाराष्ट्रात कमी-अधिक जोमाने झालेला दिसतो. त्यामुळेच विखे हे सहकारापेक्षा घराणेशाहीचे प्रेरणादायी मॉडेल ठरले आहेत असे म्हणावे लागेल.,महाराष्ट्राचे सध्याचे एकंदर राजकारण वरील चार-पाच घराण्यांभोवती फिरते आहे. त्या चार-पाच घराण्यांनी इतर जिल्हास्तरावरील घराण्यांना आपल्याशी एकरूप करून घेतले आहे. शरद पवार कुटुंब राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहे. पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या संस्था त्यांना राजकारणासाठी पूरक ठरल्या. मात्र, त्यापुढे जाऊन राज्याचे नेतृत्व किंवा इतर महत्त्वाच्या भूमिका कुटुंबाभोवतीच राहण्याचा महत्त्वाचा धागा आहे तो ‘संस्था’निकांचे हितसंबंध जपण्याचे काम पवार कुटुंबाने केले आहे. जसे एकेकाळी सहकाराला चालना देण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले आणि त्यातून मराठा-कुणबी वर्चस्व प्रस्थापित झाले. त्याच मराठा-कुणबी नेतृत्वाला संस्थांच्या माध्यमातून पवार कुटुंबाने राज्याचे नेतृत्व करताना बळ दिले. त्यामुळे पवार कुटुंबाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. राजकारण हे समान हितसंबंध सांभाळणाऱ्यांसाठी चांगले क्षेत्र आहे आणि हीच नेमकी गोम या घराण्यांनी हेरलेली आहे.
महाराष्ट्रातील घराणेशाहीचा प्रमुख आधार म्हणजे सहकारी संस्था. सहकारामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात बदलाचे वारे वाहू लागले. त्या प्रक्रियेत सामील झालेल्यांची एक नवी पिढी नवनेतृत्व म्हणून उदयाला आली.
त्यापकी अनेकांना सत्तेची कौटुंबिक पाश्र्वभूमी नव्हती. या नेतृत्वाने सूतगिरण्या, बँका, पतसंस्था, उपसा जलसिंचन योजना, खरेदी-विक्री संघ, पाणीवाटप संस्था, साखर कारखाने इत्यादी संस्थांच्या माध्यमातून राजकीय भरतीची वीण तयार केली. संस्थेची स्थापना करणाऱ्यांकडे मुख्य नेतृत्व राहिले. बाकी विश्वासूंना दुय्यम सत्तापदांवर समाधान मानावे लागले. पुढे याच नेतृत्वाने तालुक्याच्या राजकारणात हात घातला. कारखान्यांचे कार्यक्षेत्र किमान तालुकाभर असतेच. म्हणजेच कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेला पूरक वातावरण तयार करण्यात आले.
आज पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात दोन-तीन कुटुंबं आणि त्यांच्या दहा-बारा संस्था असे चित्र आहे. पुण्यात शरद पवारांची दुसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराणे (पिढी सांगणे कठीण), सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुशीलकुमार िशदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विखेंची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी पिढी, तर मराठवाडय़ात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई-ठाणे पट्टय़ात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी.. अशी ही यादी कितीतरी मोठी होईल.
