निपाणीत राहुन मराठी भाषेला समृध्द करणारा अवलिया
पुणे-बंगलोर महामार्गावर असलेल्या निपाणी हे कर्नाटकातील तालुक्याचे गाव,गावातील सटवाई गल्लीतल्या पिठाच्या गिरणीत तुम्ही गेलात तर पिठाच्या पांढ-याफटक लेपाने माखलेला एक माणूस तुमच्यासमोर येईल. या माणसाने भन्नाट कथा लिहिल्या आहेत, १५ कथासंग्रह आणि १८ कादंब-या त्याच्या नावावर आहेत, हे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणा-याला मूर्खात काढाल. पण हे खरे आहे आणि त्याहून अधिक खरे हे आहे की हे सगळेच्या सगळे साहित्य बावनकशी आहे. मराठी वाङ्मयाला फार पुढे नेणारे आहे.कन्नड मुलखात राहूनही आग्रहाने मराठीतून लिहिणारे.
❏ महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणि कर्नाटकात निपाणी येथे राहून मराठी भाषेला समृध्द करणारा अवलिया म्हणजे महादेव मोरे.
१९६० नंतरच्या काळातील एक महत्वाचे ग्रामीण साहित्यिक म्हणून महादेव मोरे ओळखले जातात.
मराठी साहित्याला तंबाकू कामगार, तंबाकू महिला कामगार, ड्रायव्हर, क्लिनर, गॅरेजवाले, मोटार कामवाले, दलित महिला, वेश्या, जोगते-जोगतीणी आणि हायवेवरील संस्कृतीचं विदारक चित्रण मराठी साहित्यात प्रथम महादेव मोरे यांनीच आणलं. यासाठीच मराठी समीक्षकांनी तंबाकूच्या वासाची कथा म्हणून त्यांच्या कथेचा गौरव केला गेला. गरीब मजूर आणि वंचित घटकांची नवी दुनिया मराठी साहित्यात आणणार्या महादेव मोरे यांनी कर्नाटकातील निपाणी ( जि. बेळगाव) येथे राहून मराठी भाषेचा झेंडा अविरत उंचवत ठेवला आहे. या अशा प्रतिभावन माणसांनं श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, आनंद यादव यांच्या बरोबरीनं लेखन केलं आहे.
महादेव मोरे यांनी १९५८-५९ पासून मराठी कथा, कांदबर्या लिहण्यास प्रारंभ केला. सध्याच्या काळातील वाचकांना, अभ्यासकांना हा साहित्यिक समाजावा, त्यांनी कोणत्या परिस्थितीत राहून ही साहित्यनिर्मिती केली आहे. हे वाचकांना, अभ्यासकांना समाजावे यासाठी पीठक्षराची निर्मिती केली असल्याचे ते सांगतात.मराठी भाषा टिकावी, ती समृध्द व्हावी, नवनवे संशोधन व्हावे, मराठी शाळांचा विकास व्हावा याबाबतीत सरकार प्रयत्न करीत असते. महादेव मोरे यांनी मात्रते प्रयत्न स्वत:कडूनच सुरू ठेवले. कर्नाटकसारख्या कन्नड भाषेच्या प्रदेशात राहून मराठी भाषेची सेवा अविरत चालूठेवली आहे.
महादेव मोरे यांनी मराठी साहित्यात महत्वाची अशी वाङ्मय निर्मिती केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती निपाणीसारख्या प्रदेशात राहणार्या मोरे यांनी कथा, कादंबरी, आणि ललित गद्य अशा विपुल प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. मराठी वाङ्मयीन संस्कृतीने त्यांच्या लेखनाला अदखल केल्याची कारणे वाङ्मयाच्या प्रभुत्व संबंधात शोधावी लागतात. मोरे यांनी त्यांच्या साहित्यात अनोखे प्रदेश आणले. परिघावरील माणसांचे जग साहित्यात आणले आहे. तंबाखू व्यवसायातील स्त्री-पुरुष कामगार, मजुरांचे जग व हायवे वरील ड्रायव्हर, क्लिनर, मेस्त्रीचे जग पहिल्यांदाच मराठी साहित्यात त्यांनी आणले. त्यांनी चाकोरीबाहेरील माणसांच्या संघर्ष कहाण्या मांडल्या आहेत. वास्तव, गंभीर आणि लोकप्रिय वाड्मयाच्या खुणा त्यांच्या लेखनात सापडतात. मत्तीर, ईगीन, येडचाप,एकवीसावी जात अशा वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतीतून वेगळ्या जगाचे दर्शन त्यांनी घडवून दिले ओहे. चाकोरीबाहेरील समाजदर्शन आणि सीमावर्ती बोलीच्या नकाशाने त्यांच्या साहित्याला वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त करून दिली आहे.त्यांचे साहित्य भावणारे आहे. म्हणूनच न्यायमूर्ती नरेंद्रचपळगावकर यांच्यासारख्या माणसांनी त्यांची मत्तीर कांदबरी बावीस वेळा वाचल्याचा दाखला देतात. महादेव मोरे यांच्या साहित्यातील बारकावे, माणसांबरोबर, माणसांच्या भावभावना, त्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचं समर्थ चित्रण त्यांच्या साहित्यात येते.
बेळगाव-महाराष्ट्र सीमाप्रदेशात अलीकडच्या काहीवर्षांमध्ये अस्तित्वात आलेले भाषिक संघर्ष भाषेचे आरोग्य बिघडवणारा आहे. शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि व्यवहारातून मराठी हद्दपार व्हावी यासाठी सीमाप्रदेशात जाणीवपूर्वक काम केले जात आहे. जी. ए. कुलकर्णी, कवी कृ. ब. निकुंब, इंदिरा संत यांनी मराठीची सेवा केली आहे तर, महादेव मोरे यांच्यासारखे अनेक साहित्यिकसीमाप्रदेशात राहून मराठीची उत्तम सेवा अविरत करीत आहेत. त्यांना कधीही भाषिक जाच सहन करावा लागलेला नाही. उलट त्यांच्या साहित्याचा सर्व बाजूने सन्मान झाला. महादेव मोरेंना निपाणी नगरपरिषदेने घर बांधणीत मदत केली. आमदार फंडातून मदत मिळाली. परंतु, भाषेचे राजकारण होऊ लागल्यानंतर तेथील परिस्थितीपालटू लागली आहे. मराठीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. त्यामध्ये मराठीचेच नुकसान आहे, याचे भानसीमाप्रदेशातील मराठी भाषिकांच्या लक्षात यायला हवा.
महादेव मोरे यांनी सीमाभागातील मोलमजुरी करणार्या महिलांच्या जगण्याचे विदारक चित्र साहित्यात मांडले आहे. मराठी साहित्यात कर्नाटक सीमाभागातील जगणं, माणसांचं वावरणं काय असते, त्यांच्या जीवन जगण्याचा संघर्ष काय आहे याचे वास्तव चित्रण महादेव मोरे यांनी आपल्या कथा, कांदबर्यातून मांडले आहे. त्यांच्यामुळे मराठी साहित्याला नव्या विषयाची, आशयाची एक भरीव देणगी मिळाली आहे.मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, आदिवासी, नागर, स्त्री वादी हे प्रवाह निर्माण झाले असले तरी महादेव मोरे यांनी याप्रवाहात कधी स्वत: बांधून घेतले नाही. त्यांनी मांडलेल्या साहित्यातून नेहमीच वैविध्यपूर्ण साहित्याचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला आहे.📖✍📖