किल्ले भरतगड

     किल्ले भरतगड 

फेसबुक लिंक http://bit.ly/3nkwq8H

                     
                                                                        

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या दक्षिण व उत्तर काठावर भरतगड व भगवंतगड हे दोन किल्ले उभे आहेत. ५ ते ६ एकरवर पसरलेला भरतगड मसुरे गावातील टेकडीवर उभा आहे. गडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायर्‍या बांधून काढलेल्या आहेत. भरतगडावर खाजगी मालकीची आमराइ असल्यामुळे गड साफ ठेवला गेला आहे. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोनही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत.

  किल्याचा इतिहास :
मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहिर खोदायला सुरुवात केली २२८ फूट खोल खोदल्यावर विहीरीला पाणी लागले. त्यानंतर १७०१ साली किल्ला बांधून झाला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर फोंड सावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहीले त्यामुळे चिडून तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर १७४८ साली हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच सावंतांनी गड परत ताब्यात घेतला. सन १७८७ मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला पण नंतर त्याचा ताबा सावंतांकडेच दिला. १८१८ मध्ये कॅप्टन हर्चिसनच्या नेत्वृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, त्यावेळी त्याला गडावरील विहिर कोरडी आढळली. गडावर झालेल्या तोफांच्या मार्‍यामुळे विहीरीच्या तळाला तडे जाऊन विहीरीतील पाणी नाहीसे झाले. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या.

किल्ले भरतगड

किल्यावर काय पहाल
चिरेबंदी पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचायला ५ मिनीटे लागतात. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजुचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली २० फूट खोल व १० फूट रुंद खंदक आहे; दाट झाडीमुळे तो झाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदी जवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पांणी साठवण्यासाठी खोदलेले"साचपाण्याचे तळे" असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला यावे. गडाच्यामध्ये उंचावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज व १० फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापूरूषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारु कोठार, धान्य कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणे कडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.
कसे जाल
भरतगड मसुरे गावात आहे. मालवण - मसूरे अंतर १६ किमी असून, मसूर्‍याला जाण्यासाठी बसेस व रिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मसुरे गावातील तलाठी ऑफिस समोरुन व मशिदीच्या बाजूने जाणारी चिरेबंदी पायर्‍यांची वाट आपल्याला ५ मिनीटात गडावर घेऊन जाते.
गडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते

_____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম