किल्ले निवती
फेसबुक लिंक http://bit.ly/3urvkLf
निवती गावाच्या नावावरून या किल्याला निवतीचा किल्ला म्हणतात. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून जवळच निसर्गरम्य कोकणाच्या पार्श्वभुमीवर निवती गाव आहे.या गावाजवळ असलेल्या समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते.
किल्याचा इतिहास
सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. या किल्यावर पोर्तुगीजांचा डोळा होता.१७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करुन तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी हा किल्ला जिंकला.१८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.किल्यावर काय पहाल
किल्यावर असलेल्या लालभडक चिरेबंदी दगडी पायर्यांच्या वाटेने गड चढतांना आपल्याला प्रथम पायर्र्यांच्या दोंन्ही बाजूस असलेला खोल खंदक दिसतो. सध्या तो झाडीने झाकलेला आहे.काही ठिकाणी तो मुजुन गेला आहे. याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आहेत, पण प्रवेशद्वारा पुढील मार्ग तुटल्या मुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. समोर जाणार्या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो. या बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरुन पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूरवर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. येथे एक खड्डा व त्यात उतरणार्या कातळात खोदलेल्या पायर्या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असण्याचा संभव आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारा पाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला खंदक खोदून संरक्षित केलेला आहे. बालेकिल्ल्याची प्रवेशव्दारे, देवड्या, तटबंदी अजूनही शाबूत आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. बालेकिल्ल्यात जुन्या वास्तूंचे चौथरे आहेत.निवती किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था कुठेही दिसत नाही, ती किल्ल्याखाली केलेली आहे त्याला स्थानिक लोक ‘शिवाजीची तळी‘ या नावाने ओळखतात. ती पाहाण्यासाठी किल्ला उतरतांना सरळ रस्त्याने गावात न जाता, उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणार्या रस्त्याने खाली उतरावे. येथेच ‘शिवाजीची तळी‘ नावाची पाण्याची टाकी आहेत. पुन्हा मुळ रस्त्याने निवती किनार्यावर गेल्यास छोटीशी पुळण व त्यावरुन समुद्रात घुसलेला २० फूटी खडक पाहायला मिळतो. याला ‘जुनागड‘ म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते. निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदीर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.किल्ला फिरून झाल्यावर लक्षात येते की हा किल्ला समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला आहे.समुद्रावर पोर्तुगीज,डच लोंकाचा होणारा उपद्रव याला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या किल्याचा जोडीला असे लहान किल्ले बांधले असावेत.सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर शिवप्रेमीनी हा किल्ला आवर्जून पहावा. अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
Tags
गडकिल्ले