बारा ज्योतीर्लीगांपैकी एक त्र्यंबकेश्वर
.
---------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
---------------------------------
त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ असलेले केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे.भारतातील बारा ज्योतीर्लीगांपैकी एक असलेल. महाराष्ट्रातील नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे स्थान आहे. दक्षिण गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते.
या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.
सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे.
मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे. या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते.
मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात♍
Tags
धार्मिक