🔹क्राईम डायरी🔹

आषाढवारी

 (क्राईम डायरी)

  तरण्या पावसानं जोर धरला होता. साध्या खापरीची घरं आता पाणी झिरपू लागली होती. दमदार पावसानं अनेक घरांच्या भिंती पडत होत्या.
पडलेल्या भिंतीना काहीजण कागद लावत होते. पावसाचा जोर वाढतच होता. नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गावात पसरत होतं. म्हातारी माणसं पाठीवर इरलं घेऊन पूर बघत होती. पण वाढत्या पाण्यामुळे काही कुटुंबांना प्रशासन इतरत्र हलवत होतं. तासभरात पांडूनानाच्या घरात पुराचं पाणी शिरणार हे निश्चित होतं. त्यामुळे घरातील सामान इतरत्र हालविण्याचे काम सुरू होतं. पांडूनानाची पोरं बाहेर काढण्यात आली.♍
सायंकाळी सहाला पाणी नानाच्या घरात शिरलं तसा नाना घाबरला. कच्च्या मातीच्या भिंती वाडवडिलांनी बांधलेल्या. चार पोरींचे लग्न करण्यातच नानाचं आयुष्य गेलं. घर काय बांधता आलं नाही. आता भिंती कोसळणार याच विचारानं नानाला वेढलं होतं. अंधार पडला होता. पाऊस वाढतच होता. तसा नानाचा जीव खालीवर होत होता.
अंधाराच्या रात्रीत गावातील वीजही गायब झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते तसा नाना पुन्हा पाण्यातून आपल्या घरात आला अन् त्याला धक्काच बसला. एका तरुणाचे प्रेत नानाच्या घरात अडकून बसलं होतं. नानाचं काळीज पडलं हे काय नवं झेंगट म्हणून त्यानं प्रेत हलविण्याचा प्रयत्न केला. तसा कुजका वास त्याच्या नाकात घुसला. तसा तो मागे झाला. अन् सरळ सरपंचाच्या घरी जाऊन वार्ता दिली. तसे सरपंच व पोलिसपाटील यांनी पोलिसांना बोलावून घेतले. रात्रीची वेळ, धुवाँधार पाऊस अशा स्थितीमध्ये हवालदार ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले. रात्र फार झाल्याने प्रेत घरातच पुराच्या पाण्यात ठेवून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी फौजदार रावबहाद्दूर आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. प्रेताचा पंचनामा करून प्रेत कुजल्यामुळे जागेवरच पीएम करण्यात आले.
आता दमदार पावसात प्रेताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांना अवघड झाले होते. खबर्यांनाही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, महापुरातून नेमके कोणत्या गावातून प्रेत वाहून आले असेल हे कळणे अवघड होते. भर पावसात पोलिसांनी ओळख पटविण्यास सुरुवात केली. परंतु, पांडूनानाच्या गावातील किंवा शेजारच्या गावातील ही व्यक्ती नव्हती. मग मयत व्यक्ती कोण? हा प्रश्न पडला होता.
पोलिसांनी दोन दिवस गावे पालथी घालूनही ओळख पटत नव्हती. शिवाय कोणत्याही जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला बेपत्ता व्यक्तीची नोंद नव्हती. डॉक्टरांनी अहवाल दिला. त्यामध्ये चाकूचे पोटावर वार करून खून करण्यात आल्याचे डॉक्टरांनी अहवालात लिहले होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे हे आता वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे मयत व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय तपास करणे फौजदार रावबहाद्दूर यांना कठीण झाले
होते.
चौथ्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंड्या रवाना झाल्या होत्या. पांडूनानाच्या गावातूनही दिंडी रवाना झाली होती. जवळपासच्या नदीकाठच्या दहा-बारा गावातून फेरफटका मारत पोलिस तपास करत होते. हावलदार ठोंबरे ठोसर गावात आले. गावच्या पाराजवळ जुनी मंडळी बसली होती. पुराच्या बातम्या काही मंडळी वाचत होती. तेवढ्यात हावलदार ठोंबरे तिथे पोहोचले. त्यांनी मयताचे फोटो त्यांना दाखविले. त्याबरोबर एकजण उत्तरला, ‘आ! हे शिंद्याचं विष्ण्या’ त्याबरोबर ठोंबरेनी पारावरच बसकान मारलं. कोतवालाला बोलावून घेण्यात आलं. त्यानं विष्णू शिंदेचं घर ठोंबरेना दाखवलं. विष्णूची पत्नी रेणुकाला फोटो दाखविताच तिने हंबरडा फोडला. तशी गल्लीतील माणसं गोळा झाली. काय झालं म्हणून प्रत्येकजण चौकशी करू लागला.
विष्णू शिंदे पंढरपूरला दिंडीतून गेला अन् मग हा फोटोतला कोण? असा प्रश्न जो-तो करू लागला. पांडूरंगानं माझ्या धन्याला कसा नेला? असं म्हणून रेणुका ऊर बडवून रडू लागली. प्रेत ताब्यात घेण्यासाठी जबाबदार माणसे घेऊन ठोंबरे पोलिस स्टेशनला पोहोचले. प्रेत बघताच सर्वांना प्रेताची ओळख पटली. प्रेत विष्णूचेच होते. सोपस्कार पूर्ण करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रेताची ओळख पटल्यामुळे फौजदार रावबहाद्दूर यांनी तपासाचा वेग वाढविला. नातेवाईक व ग्रामस्थही तो दिंडीतून आषाढवारीला गेला असे म्हणत होते. मग त्याचं प्रेत पांडूनानाच्या घरात पुरातून कसे आले? हा प्रश्न पोलिसांना सोडवायचा होता. पोलिसांनी ठोसर गावची दिंडी जिथे असेल तिथे जाण्याचा निर्णय घेतला. गावातून दिंडीचा मार्ग विचारून घेतला. पोलिसांची गाडी दिंडी तपासात पुढे जात होती. पंढरीपासून दोन मुक्काम
अंतरावर एका शाळेत ठोसरची दिंडी
उतरली होती. फौजदार रावबहाद्दूर तिथे पोहोचले.
दिंडी प्रमुखाला त्यांनी बाजूला बोलावून घेतले. सगळे दिंडीतील लोक घाबरले. कोणालाच कळेना नेमके काय झालंय ते. सगळेजण पोलिसांकडे पाहू लागले.
‘साहेब विष्णू शिंदे दिंडीत आलाच नाही तर त्याच्याबद्दल आम्ही काय सांगावं.’ तसं सगळ्यानीच विष्णू दिंडीत आला नसल्याचं सांगितलं. तसा पोलिसांना प्रश्न पडला. बायको म्हणते व ग्रामस्थही म्हणतात विष्णू दिंडीतून गेला. परंतु इथं तर उलटे आहे पोलिस तिथून पुन्हा ठोसर गावात आले.
गावात विष्णूच्या बायको-रेणुकाविषयी चौकशी केली. तर अतिशय सोज्वळ चेहरा म्हणून ती प्रसिद्ध होती. कुणाशीही वैर नाही, वागणं अत्यंत नम्र, चरित्र्यसंपन्न. त्यामुळे पोलिसाना पुन्हा पेच पडला. पोलिसांनी पुन्हा पोलिस स्टेशनला गाडी घेतली. गाडी गावातून जात असताना पोलिसांना पाहून एक मुका माणूस काहीतरी खुणा करत असल्याचे फौजदार रावबहाद्दूरांनी पाहिले. तशी काहीतरी डोक्यात चमक येऊन त्यांनी ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगितले. गाडी पुन्हा मुक्याजवळ आली. रावबहाद्दूरांनी मुक्याला गाडीत घेतलं. त्याला पोलिस स्टेशनला आणलं.
मुका काहीतरी खाणाखुणा करून मारल्यासारखं दाखवत होता. परंतु, पालिसांना ते कळत नव्हतं. एका मुकबधिर शाळेतील शिक्षकांना बोलवून घेण्यात आले. अन् मग थोडा तपशील उलगडला. मारेकरी एक नव्हे तर मुक्याच्या म्हणण्याप्रमाणे दोन होते. एक बाई व एक वारकरी पुरुष. आता रावबहाद्दुरांना खात्री पटली. विष्णू दिंडीस गेला होता. परंतु दिंडीत येण्यापूर्वी त्याचा खून करण्यात आला होता.
विष्णू अगदी साधाभोळा माणूस. दोन पोरांचा पिता. अतिशय धार्मिक वृत्तीचा. गेली 15 वर्षे तो पायी आषाढवारी करत होता. मुक्याला बोलावून घेण्यात आले. विष्णूची बायको रेणुकालाही पोलिस चौकशीला बोलावण्यात आले. लांबूनच मुक्याला दाखविण्यात आलं. तसं
त्यानं काहीसं प्रात्यक्षिक करून
पोलिसांना दाखविलं. मग मात्र खुनी
कोण? हे रावबहाद्दुरांनी ओळखलं. ताबडतोब रेणुकाला अटक करण्यात आली.
दोन दिवस मार खाऊनही आपण काहीच केलं नाही असं ती सांगत होती. परंतु, मार असह्य झाल्याने तिसर्या दिवशी तिनं तोंड उघडलं. ‘होय साहेब आम्हीच मारलं माझ्या नवर्याला!’ असं म्हणून ती रडू लागली. अन् तिनं नाव सांगितलं ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. ज्याच्याशी पोलिसांनी चर्चा केली तो दिंडीप्रमुख नामदेव महाराजच खुनी निघाला.♍ पंढरपुरातून त्याला अटक करण्यात आली. मात्र, समोर रेणुकाला बघून तो गारच पडला. मुक्याने दोघांनाही ओळखले. अन् मग मात्र महाराजांनी तोंड उघडले.
‘साहेब आम्हीच मारलं विष्णूला. तेही रेणुकाच्या सांगण्यावरून. विष्णू व रेणुका आमच्या शेतात नेहमी कामाला असायची. विष्णू नेहमी पूजाअर्चा -धार्मिक कृत्ये यामध्ये नेहमी पुढे असायचा. त्यामुळे काहीवेळा तो मजुरीवर उशिरा यायचा. त्यावेळी रेणुका व मीच शेतात असायचो. त्या दिवशी मी बांधाला बसलो असताना रेणुकाचा पदर छातीवरून ढळला. अन् मी बघतच राहिलो हे तिच्या लक्षात येताच ती हसली. अन् मग त्या दिवसापासून आमचे प्रेमसंबंध निर्माण झाले.
त्यावेळी रेणुकाला मुल नव्हते. नवीन लग्न होऊनही तो नेहमी भजन कीर्तन यातच रंगलेला असायचा अन् रेणुका मात्र तळमळायची अन् मग तिने माझा आधार घेतला. तिला दोन मुले झाली. तसं त्या दोघांचं बिनसू लागलं. अन् याचा फायदा मी घेतला. दोन्ही मुलं नामदेवचीच म्हणून तो रेणुकाशी आतल्या आत भांडायचा. त्यामुळे रेणुका वैतागली होती. एके दिवशी तिने मला याचा काटा काढा नाहीतर माझ्याकडे येऊ नका? असे सांगितले. परंतु माझ्या व रेणुकाच्या संबंधाची गावात कुठेच कुणकुण नव्हती.♍
त्यादिवशी वारीला सकाळी लवकर म्हणून तो उठला. पाऊस जोरात कोसळत होता. शौचालय नसल्याने तो नदी बाजूला शौचालयास आला. पहाटेचे चार वाजले होते. मी व रेणुकाही पाठोपाठ आलो. मी त्याचे तोंड दाबून धरून चाकूने वार केले. रेणुकाने त्याला कवळ्यात दाबून धरले. पाच मिनिटात तो संपला ते प्रेत वाहत्या महापुरात टाकून देऊन मी अंघोळ करून देवळात आलो. अन् दिंडी घेऊन पंढरपूरला प्रयाण केले. प्रेमात बेभान झाल्याने मला विचारच सुचला नाही साहेब. इथे विचारांवर अविवेकाची मात झाली.’ रितसर खटला चालून नामदेव महाराज व रेणुकाला जेलची हवा खावी लागली.♍

आषाढवारी

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম