आज बरोबर ५९ वर्षे पुर्ण होतील....
⚡⚡ पानशेत धरण फुटलेले...⚡⚡
१२ जुलै, इ.स. १९६१ रोजी महाराष्ट्रातील
पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
मुठा नदीच्या अंबी व मोशी या दोन उपनद्यांवर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव येथे मातीची धरणे बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने १९५७ मध्ये मुक्रर केली. पानशेत धरणाच्या कामास त्याच वर्षी सुरुवात होऊन धरणाचे काम १९६२ मध्ये पूर्ण करण्याची योजना होती; परंतु १९६० मध्ये संबंधित योजना बदलून १९६१ मध्येच धरण पूर्ण करण्याचे ठरविले गेले. बरेच काम मोठ्या घाईगडबडीने शेवटच्या वर्षी पूर्ण करण्यात आले. काही काम अपुरेच राहिले, तरीही १९६१च्या पावसाळ्यात धरणात पाणी अडविण्यात आले. पाण्याची पातळी व लाटांचा मारा यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली; परंतु धरण भरण्याचा निर्णय एकदा घेतल्यानंतर प्राप्त संकटाचा स्वीकार करण्याविना गत्यंतर उरले नाही. दहा जुलैपासून पानशेतची परिस्थिती गंभीर होत गेली आणि अखेर १२ जुलै रोजी सकाळी पानशेतचे मातीचे धरण फुटले.
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ , नारायण पेठ , कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.
पार्श्वभूमी.......
११ जुलैपर्यंत धरण व्यवस्थित असल्याचे सरकार जाहीर करत होते. एवढेच नव्हे, तर १२ जुलैच्या वर्तमानपत्रांत सरकारने धरण फुटले नाही. फुटणार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय व ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पानशेत धरणाला पावसामुळे धोका निर्माण झाला असल्याचा संदेश दोन दिवस आधी मिळाला होता; परंतु त्याबाबत पुरेशी सावधगिरी बाळगली गेली नसल्याचा ठपका न्या. नाईक चौकशी अहवालात संबंधित उच्च अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. मात्र, सरकारने त्यांच्यावर शेवटपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे लोक निर्धास्त होते.पण,,, १२ जुलै १९६१ हा दिवस भीषण काळरात्र ठरला. त्या दिवशी पानशेत धरण फुटले. संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. एकूण ७५० घरे उद्ध्वस्त झाली. तब्बल २६ हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. दहा हजार कुटुंबे बेघर झाली.