पिवळया रंगाचे दुर्मिळ कासव
ओडिशामध्ये बालेश्वर जिल्ह्यातील सुजानपूर या गावात स्थानिक लोकांना पिवळ्या रंगाचे दुर्मीळ कासव आढळून आले. त्याला लोकांनी वनविभागाच्या अधिकार्यांकडे सोपवले. वाईल्डलाईफ वॉर्डन बी. आचार्य यांनी म्हटले आहे की हे एक अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे कासव असून आपण आतापर्यंत असे कासव पाहिलेले नव्हते.
सर्वसामान्यपणे कासवं करड्या रंगाची असतात. पिवळ्या रंगाचे कासव पाहण्यात येणे कठीणच असते. सुजानपूरमध्ये वासुदेव महापात्रा नावाच्या शेतकर्याच्या शेतात हे कासव आढळले. त्यांनी या कासवाला पकडून घरी आणले. त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. त्यानंतर वासुदेव यांनी हे कासव वनविभागाला सुपूर्द केले. काहींनी हे कासव अल्बिनो असावे असे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे अल्बिनो प्राण्यांचे डोळे लालसर असतात व या कासवाचे डोळेही असेच आहेत. मात्र, अल्बिनो जीव हे शक्यतो सफेद रंगाचे असतात. हे कासव चमकदार, पिवळ्या रंगाचे आहे.
अल्बिनो म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे प्रजातीच्या जीवातील रंगाचा बदल. हे सापांमध्ये अधिक दिसून येते. ट्विटवर एका वापरकर्त्याने सांगितले की या कासवला अल्बिनो इंडियन फ्लॅपशेल म्हणतात आणि तो 10,000 कासवांपैकी एक असतो. जगण्याची शक्यताही खूप कमी आहे.
Tags
नवल