शाहीर दादा कोंडके यांचा आज जन्मदिवस
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव – मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या “कृष्णा” ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौर्यांनी दादांनी करीयरला सुरुवात केली.
दादांचे बालपण नायगावच्या – मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोडसाळ असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला……. नायगाव परिसरात – “बँडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.
कलेची सेवा बँड पथकाच्या मार्फत करणार्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले…… १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा…. ‘ चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफल मधून सुटणार्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.
तांबडी मातीने दिला ब्रेक
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या -(१९७१)” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटा नंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली.
स्वत:च्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला. १९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसर्या (बहुदा भालजींच्याच) बॅनर खाली केला.लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केलेहिंदीतून – तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशित केले. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट प्रका्शित केला……
जीवनाचा ‘टर्निंग पाँईंट’
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच ‘नाम्या’ सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे…. चाहत्यांकडून स्वत:च्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत…… कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्घाटनाचे…. पण ‘तांबडी माती’ हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वत:चे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते! त्यांच्या सारखा खरोखरचा ‘डाउन टू अर्थ’ नट मिळणे असंभव !
असा आला शिवसेनेशी संपर्क
वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा….. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. १९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. १९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बाँडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.शाहीर दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला हसविण्याचे
काम केले आणि तितकेच प्रेम रसिकांनी त्यांना दिऊन यांच्या प्रत्येक चित्रपटाला यशस्वी बनविले. सर्वात जास्त सिल्वर जुबली चित्रपट देण्याचा विक्रम ''गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'' मध्ये त्यांच्या नावावर झाला. दादा कोंडके यांच्या जीवनावर ''एकटा जीव'' हे पुस्तक अनिता पााध्ये यानी लिहिले.
दादांनी सेन्सॉर ची कशी जिरवली याचे किस्से पेरले जायचे. अर्थात दादांचा प्रेक्षक वर्ग यामुळे जास्त आतुर असायचा चित्रपट पाहायला..
श्लील अश्लील हे व्यक्ती सापेक्ष असते हेच खरे... दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत आलेल्या प्रेक्षकांना हसवणे हाच दादांसाठी खरा चित्रपटधर्म होता ... उगाच वैचारिक, कलात्मक किंवा वास्तव वादी चित्रपट बनवणे हे दादांच्या दृष्टीने अश्लील होते. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेता सेन्सॉरलाच प्रतिप्रश्न करून हैराण करायचे दादा. ते एका भाषणात म्हणाले होते की सत्तेवर आलो तर सेन्सॉर बोर्डातील सगळ्या म्हाताऱ्या काढून टाकीन आणि हमाल लोकांना नेमेल तिथे
सोंगाड्या सुपर डूपर हिट झाला तेव्हापासून भोळा नायक ही मुख्य शैली दादांनी सुरु ठेवली. पुढे लक्ष्मीकांत बेर्डे आणि गोविंदा सुद्धा हीच शैली वापरत होता.‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा ट्रेडमार्क असणार... आणि ती आई पण अतिशय भक्कम व्यक्तिमत्त्व असणार हे ठरलेले... दादांच्या चित्रपटातील आई कधीच तुम्हाला रडकी, लेचीपेची दिसणार नाही.. गावाशी, समाजाशी भांडणारी, खमकी दिसणार.
दादांनी जी चड्डीची फॅशन रुजवली.. ती भालजी पेंढारकर यांच्या थ्री फोर्थ वरून आलेली आहे. (भालजीबाबांवर स्वतंत्र आर्टिकल आणि कधीतरी) दादा आणि चड्डी हे समीकरण एवढे रूढ झाले आहे म्हणूनच पोस्ट सोबत मुद्दाम सुटा बुटातला फोटो टाकला आहे. आंधळा मारतो डोळा मध्ये डबल रोल करताना शहरी पॉलीश्ड माणूस भारी केला आहे दादांनी.
जब्बार पटेल आणि दादा यांचे चित्रपट म्हणजे अगदी विरोधी टोके.. मात्र दादांनी त्यांना खूप मदत केली आहे.. घाशीराम मुळे जब्बार पटेल यांच्यावर प्रभावित होऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केला. सिंहासन, उंबरठा हे चित्रपट दादांचा कॅमेरा भाड्याने घेऊन पूर्ण केले आहेत. दादांनी मुद्दाम कॅमेऱ्याच्या भाड्याचे निम्मेच पैसे घेतले होते. "दादांचे ‘बाई केळेवाली मी राया,’ हे गाणे पहिल्यांदा मीच ऐकले होते. तसेच ‘गगन सदन तेजोमय,’ हे गाणे त्यांनी डोळे मिटून ऐकले होते. हे गाणे हिट होईल, अशी दादही दादांनी दिली होती." अशी आठवण जब्बार पटेल सांगतात.
त्यांच्या चित्रपटातील खास शेतकऱ्यांचे मित्र बैल, कुत्रा, गाढव, मेंढरू यांच्यावर त्यांनी गाणे लिहिली
१.जोडी बैलाची खिल्लारी (चित्रपट: मला घेऊन चला)
२.चल रे वाघ्या रडू नको (चित्रपट तुमचं आमचं जमलं)
३.अडला नारायण धरी गाढवाचे पाय (चित्रपट आंधळा मारतो डोळा)
४.माणसा परीस मेंढरं बरी (चित्रपट एकटा जीव सदाशिव)
-----------------------------------------------
विशेष म्हणजे त्यांच्या मराठी चित्रपटात (पांडू हवालदार (१९७५) ते वाजू का (१९९६) नॉन मराठी गायक महेंद्र कपूर यांनी गायली, हिंदी चित्रपटात (आगे की सोच) किशोर कुमार यांनी गाणी गायली, आणि गुजराती चित्रपट (चंदू जमादार) मोहम्मद रफी यांनी गाणे गायले.
यारोंका यार दादा.. उपकारकर्त्याची पण आजन्म जाणीव ठेवायचे मग ते बाळासाहेब ठाकरे असो किंवा भालजी पेंढारकर. स्टार असताना आणि स्वत चा सगळा सेट अप असताना पण दादांनी भालजीबाबांच्या "गनिमी कावा" या चित्रपटात काम केले. भालजी पेंढारकार ह्यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडियो होता तो त्यांनी काही कारणामुळे लता मंगेशकरांकडे गहाण ठेवला होता तेव्हा दादा कोंडकेंनी लताबाईंकडुन विकत घेउन भालजी पेंढारकारांना द्यायचा ठरविल होत. मात्र समोरून प्रतिसाद न मिळाल्याने प्रश्न निकाली निघाला नाही.
शिवसेनेच्या प्रचारासाठी दादांनी केलेली मेहनत सगळ्यांना माहीत आहेच. १९९५ साली सत्ता आली तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मंत्रिपद देऊ केले होते. मात्र जेव्हा त्यांना समजले की बाळासाहेब स्वतः मंत्री पद घेणार नाही. "शिवसेनाप्रमुख" याच पदी राहणार.. तेव्हा दादांनी पण सांगितले ते आजन्म "शिवसैनिक" हेच पद भूषवतील. सच्चा शिवसैनिक...
दादांनी जशी दोस्ती केली तशीच दुष्मनी पण अगदी दिलसे...व्ही शांताराम आणि दादा यांचे वॉर खूप गाजले. शांतारामांचा एवढा दबदबा होता की त्यांचा चित्रपट रीलिज होत असेल तर दुसरे निर्माते आपले चित्रपट पुढे ढकलत. पण हा नियम दादा कोंडकेनी मोडला म्हणून शांतारामांचा राग. मोठ्या लोकांचा मोठा ईगो...
या दोघांच्या वादाचे खरे खोटे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र आधी चांगल्या बाबी घेऊ. व्ही शांताराम यांनी दादांना चॅलेंज दिले की पांचटपणा सोडुन एक तरी चांगले गीत वा भजन लिहुन दाखवा. त्यावर दादांनी "अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान" हे गाणे लिहीले जे प्रचंड गाजले. तेव्हा शांताराम बापू दादांना म्हणाले की "लय भारी मर्दा". चंदनाच्या पाटावर या गाण्यासाठी देखील शांताराम यांनी दादांचे जाहीर कौतुक केलं होत म्हणतात.
दादांशी पंगा घेणे ना सेन्सॉर बॉर्ड प्रमुख शांता शेळके यांना शक्य झाले.. ना व्ही शांताराम यांना.. कारण दादा म्हणजे एकदम रांगडा माणूस..दादांच्या पातळीवर येणे यांना शक्य नव्हते.. दादा तर बदनामी ला अजिबात न घाबरणारे... संध्या ला संध्या"काळी" म्हणायला त्यांना काय वाटतं नव्हते.
आंधळा मारतोय डोळा हे टायटल शांताराम यांना उद्देशून होते. व्ही शांताराम यांनी दादा कोंडकेच्या सोंगाड्याची टर उडवायला पिंजरा मधील गाण्यात काही ओळी घातल्या. "दाजिबा गावात होईल शोभा आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा" (दाजिबा आणि बत्ताशा ही सोंगाड्यातील दादा कोंडके आणि निळू फुले ह्यांची नावे). दादांनी पांडू हवालदारला गटारात पिंजरा सापडतो असा प्रसंग दाखवून बदला घेतला. शांतारामांनी "असला नवरा नको ग बाई" काढल्यावर दादांनी "ह्योच नवरा पाहिजे" काढला.
'सोंगाड्या' मध्ये निळू फुले तर 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी अशोक सराफ यांच्यासोबत एकदाच काम केले म्हणून त्यांच्यावर आरोप केला जातो की सहकलाकार भाव खाऊन जाईल असे रोल दादा ठेवायाचे नाहीत. मात्र त्यांच्या टीम वर्क चे विशेष कौतुक..दादांचा चित्रपट म्हणाला की नायिका, गायिका, संगीतकार आणि बाकीचे सगळे सहायक फिक्स राहिले आहेत. पहिला चित्रपट ते शेवटचा.. title वर काम करायला नकोच.
"एकटा जीव सदाशिव" चित्रपट गाजवणारे दादा आयुष्यात प्रेमाच्या बाबत मात्र खरच "एकटा जीवच". लग्न केलं आणि लवकरच घटस्फोट देखील झाला. पत्नी नलिनी आणि तेजस्विनी नावाची कन्या वेगळी राहत होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रेम प्रकरणे झाली. एकटा जीव सदाशिव या त्यांच्या आत्मचरित्र मध्ये अनेक त्याचे उल्लेख आहेत. ( मोठी नावे आहेत आणि तुमच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळी प्रतिमा आहे. तुम्ही स्वतः वाचा.. विश्वास ठेवायचा तर ठेवा.. नाण्याची ही केवळ एक बाजू असू शकते म्हणून नावे इथे मुद्दाम देत नाही)
कारण काही का असेना.. दादा जनमानसांत नेहमी अविवाहित म्हणून वावरले.
त्यांनी आपल्या चित्रपटातून भोंदूगिरीचा यथेच्छ समाचार घेतला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा दादांवर प्रभाव असावा. त्यातही दादांचा भविष्यावर लय राग.. लहानपणी एका जोतिषानी दादांना सांगितले होते "तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही. तुझ काय खर नाही.." पण हा कामगार चाळीमध्ये जन्मलेला पोरगा दादरच्या शिवाजी पार्क मध्ये मोठ्या बंगल्या पर्यंत पोहचला.
मार्च १४, १९९८ रोजी याच बंगल्यात त्यांना हृदयविकाराचा अटॅक आला..आणि मराठी भाषेचा गोडवा वाढवणारा आणि मराठी चित्रपटाची दहशत हिंदीवर गाजवणारा कलाकाराच्या आयुष्याचा सिनेमा समाप्त झाला..
दादांना माणसांचे व्यसन होते. दादांना भेटायला कुणी आले असेल तर त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो काढ, चित्रपटातील संवाद म्हणणे हे त्यांच्या आवडीचे.. बालपणाच्या सवंगड्यासोबत तर आजन्म दोस्ती निभावली. मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण असो वा दुकानाच्या उद्घाटनाचे दादा त्यांच्या आनंदात सहभागी होणारच. सुपरस्टार झाल्यावरही दादा आपल्या जुन्या चाळीकडे चक्कर मारत व जुन्या मित्र मंडळीत रमत.
ज्या मातीतून उगवून सुपरस्टार झाले, दादांनी स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते....
आहे