५०० वर्षापुर्विचा पुल अजुनही उभा

५०० वर्षाचा पूल अजूनही दिमाखात उभा



नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या व सध्या औद्योगिकीकरणामुळे प्रकाशझोतात असलेल्या नागोठणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
नागोठण्यात असलेल्या विविध वास्तूंपैकी येथील अंबा नदीवरील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पूल आजही दिमाखात उभा आहे. नागोठण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या ऐतिहासिक पुलाकडे सध्या पुरातत्त्व व बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची गरज नागोठण्यातील इतिहासप्रेमी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
नागोठण्याचा पूर्वेतिहास पाहता गुजरातच्या महमंद बेगडाने इ.स. 1495 च्या सुमारास नागोठण्यात लष्करी तळ ठोकून आपले सैन्य रेवदंडा आणि चौलवर पाठविले होते. 1530 मध्ये नागोठण्यात गुजरातच्या सुलतानची सत्ता होती. त्यानंतर हे गाव पोर्तुगीजांनी हस्तगत केले; परंतु त्यांनी या गावाचा ताबा निजामाकडे दिला. त्यामुळे नागोठणे 1666 पर्यंत निजामाकडे होते. नागोठण्यात छत्रपती संभाजी महाराज व कान्होजीराजे आंग्रे यांचे आरमार होते. गावात शिवकालीन नाण्यांची टांकसाळही होती. त्यामुळे गावाचे नाव नागोठणे होते, असाही इतिहास सापडतो. त्याकालीन जुन्या इमारतीचे अवशेष आजही नागोठणे बंदराजवळ पाहावयास मिळतात. गावाच्या नैऋत्य दिशेला मोगलकालीन ऐतिहासिक पूल आहे. 147 मीटर लांब, 6 मीटर उंच व 3 मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूला चबुतऱ्यासह तीन मीटर उंचीच्या कमानी होत्या. त्या चबुतऱ्यात रोज दिवे लावले जात असत. नंतर रोहे तालुक्यातील पडम येथे पेपर मिल सुरू झाल्यानंतर पुलावरून पेंढा घेऊन जाणाऱ्या ट्रकने पुलाच्या दोन्ही कमानी उद्ध्वस्त केल्या. 1989 व 2005 च्या महापुराशी सामना करीत आजही हा पूल ताठपणे उभा आहे

५०० वर्षाचा पूल अजूनही दिमाखात उभा

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম