पंढरपुर : रूक्मिणीमातेचा आगळा वेगळा नवरात्र सोहळा

पंढरपुर : रूक्मिणीमातेचा आगळा वेगळा नवरात्र सोहळा 


________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________

पंढरपूर येथे श्रीरुक्मिणी मातेच्या मंदिरात हा उत्सव खूप उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. वारीच्या निमित्ताने जगभर श्री विठ्ठलरुक्मिणीचे नाव पोहोचले आहे. वारीप्रमाणे इथला नवरात्र सोहळाही खूप आगळा वेगळा आहे. भूवैकुंठ पंढरपूर हे अलौकिक स्‍थान निर्माण झाले आहे ते रुक्मिणीमातेमुळे. हा चैतन्याचा गाभा पंढरपुरापर्यंत आला तो रुक्मिणीमातेमुळे, तो स्थिरावला भक्त पुंडलिकामुळे. पण त्याच्या इथे येण्याचे निमित्त मात्र रुक्मिणीमाता आहे.
विठ्ठलमंदिरात विठ्ठलाच्या मागच्या बाजूस रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर आहे. श्री रुक्मिणीची मूर्ती अत्यंत रेखीव, गंडकी शिळेची बाहे. ती उंच सिंहासनावर पुर्वाभिमुख आहे. चेहऱ्यावर विलक्षण असे स्मितहस्य आहे. दृष्टी समचरण आहे. श्री विठ्ठलाप्रमाणे मातेची मूर्तीही विविध चिन्हांकित आहे. त्यामुळे महापूजा झाल्यावर जेव्हा ही चिन्हे पहावयास मिळतात तेव्हा श्री विठ्ठलाचे वर्णन मस्तकापासूप पायापर्यंत केले जाते रुक्मिणी मातेची चिन्हे पायापासून सांगितली जातात.

मातेच्या पायावर कुंकुमवलय आहेत. पायामध्ये जोडवे, तोडे, पैंजण आदी अलंकार आहेत. कमरेच्या पट्ट्यामध्ये वस्त्राच्या निऱ्या खोचलेल्या आहेत. दोन्ही हात कटेवर ठेवलेले आहेत. सौभग्याची खूण म्हणून हातात कुंकवाचा करंडा आहे. बोटांमध्ये अंगठ्या, हातांत बांगड्या, तोडे, मंगळसूत्र, कपाळावर मळवट व कानात गुजराथी तानवडे आहेत. माताव्दारकेहून रुसून आल्याची ती खूण आहे. डोक्यावर मुद्राखडी आहे. पाठीवर वेणी आहे. चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव आहेत. अतिशय देखणी, नयनमनोहर अशी रुक्मिणी मातेची मूर्ती पाहून आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात.
द्वापारयुगात व्दारकेला श्रीकृष्ण वास्तव्य करत असता कृष्णाच्या मांडीवर राधा येऊन बसल्यामुळे रुक्मिणी रागावून, रुसून भीमेच्या काठी दिंडीरवनात आली. तिचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण गायी-गोपाळांसह आले. विष्णूपदावर सहभोजन केले. गाई गोपाळ गोपाळपुरात सोडून एकटेच रुक्मिणीला भेटायला आले. एकनाथ महाराज म्हणतात,

धरुनिया राधासीस । देव येती पंढरीस ।

रुक्मिणी सुसली । दिंडीरवनात ती आली ।

तया मागे मोक्षदानी । येता झाला दिंडीरवनी ।

रुक्मिणी त्याला झिडकारले. त्यामुळे तो परत एकटाच निघाला. वाटेत पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता. त्याला भेटण्यासाठी त्यानेच दिलेल्या विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला.
श्री रुक्मिणी मातेचा नवरात्र उत्सव भक्तांच्या अलोट गर्दीत साजरा केला जातो. अश्विन शु. प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पवमान पंचसूक्त अभिषेक करून घटस्थापना होते. नवरात्रात दस‍ऱ्यापर्यंत रोज सकाळी सहा ते आठ या वेळेत रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली जाते. ही कथा ऐकण्यासाठी भाविकांची, विशेषत: स्त्रियांची खूप गर्दी होते. त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण होते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत महाराष्ट्रातील महिला भजनी मंडळं, वेगवेगळ्या संप्रदायाची कीर्तनकार आपली सेवा मातेच्या चरणी रुजू करतात. संध्याकाळी सात वाजता धुपारती व गोंधळ असतो. रात्री उत्पात मंडळींची भजने, पंचमी ते अष्टमी नाथ महाराजांची भारूडे सादर केली जातात. दस‍‍ऱ्याला श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होतो.

नवरात्री प्रत्येक दिवशी मातेला निरनिराळ्या पोशाखांनी सजवले जाते. त्या त्या दिवशीचे पोशाख ठरवलेले आहेत. प्रतिपादेला नऊवारी साडी, व्दितीयेला मारवाडी घागरा ओढणी असा पोशाख असतो. या दिवशी तिचे रुप अनोखे दिसते तृतीय व चतुर्थीला बैठक म्हणजे बसलेल्या स्वरुपात पूजा बांधतात. ललित पंचमीचा पोशाख विशेष पाहण्यासारखा असतो. या दिवशी रुक्मिणीला फुलापानांची साडी, दागिने घालतात. गाभारा पानाफुलांनी सजवतात. पुण्याहून नारायण माळी व त्यांचे सहकारी दरवर्षी येऊन मातेला असा पोशाख करतात. सप्तमीला देहूडाचरणी पावा वाजवणाऱ्या कृष्‍णाचे रुप मातेला देतात. सप्तमीला कन्याकुमारी व अष्टमीला संपूर्ण पांढराशुभ्र पोशाख व मोत्यांचे दागिने यांनी सजवले जाते. नवमी दिवशी सोन्याची साडी नेसवतात. ही साडी नऊवारी असून पाहण्यासारखी आहे. दसऱ्याला सोन्याची जर असलेली पैठणी, हिरे, जडावाचे दागिने घालतात.

मातेची मूर्ती खूप लहान आहे. तरीही तिला नऊवारी साडी अतिशय व्यवस्थित नेसवली जाते. निरनिराळे पोशाख करण्यात उत्पात मंडळी निष्णात आहेत. मातेच्या खजिन्यात मौल्यवान दागिने आहेत. त्यातील काही दुर्मिळ व अमूल्य आहेत. धुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाने पौर्णिमेला नवरात्र उत्सवाची समाप्ती होते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম