"देवमाणूस" मालिकेतील सरू आजी - रूक्मिणी सुतार

 "देवमाणूस" मालिकेतील सरू आजी - रूक्मिणी सुतार 



घेणं ना देणं गावभर फिरून येणं यांसारख्या अनेक म्हणींमुळे झी मराठी वरील ‘देवमाणूस’ ह्या मालिकेतील सरू आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. सरू आज्जीमुळे जुन्या म्हणींना पुन्हा वैभव प्राप्त होत आहे.

सरू आजी - रूक्मिणी सुतार

‘देवमाणूस’ या मालिकेतील सरु आजी तशी म्हटलं तर खासचं आहे. 'मुडदा बशीवला तुझा' अशा कोल्हापुरी शिव्या हासडणारी आणि एकापेक्षा एक म्हणींचा वापर करणारी आजी 'देवमाणूस'मध्ये खास भूमिकेत आहे. बारा लुगडी अन्‌ सदा उघडी, रंग झाला फिका अन् कोणी देईना मुका, आपलीच मोरी अन्‌ धुवायची चोरी, पळणाऱ्याची एक वाट अन्‌  शोधणाऱ्यांच्या बारा वाटा, घेणं ना देणं आणि गावभर फिरून येणं, वेळ न वखत आणि गाढव चाललंय भूकत, नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता अन्‌ येळेला घाली लाथा, चावडीवर बोलायचं अन्‌ कुणाला सांगू नको म्हणायचं, जिकडं गुलाल तिकडं उद उद अन्‌ खोबरं तिकंड चांगभलं, बांधला मनी अन्‌ झाला धनी, शेंबूड जाईना नाकाचा अन्‌ शब्द मात्र टोकाचा, आपलं नाय धडं अन्‌ शेजाऱ्याची कड, या भन्नाट म्हणींमुळे आणि बोलण्याच्या लकबीमुळे सध्या आजी धुमाकूळ घालत आहे.
आपण फार कधी न ऐकलेल्या जुन्या म्हणी ती मालिकेत म्हणताना दिसते. तिला डोळ्यांनी दिसत नाही. पण आरशामध्ये पाहून आपले केस मात्र विंचरताना दिसते. आरसा कुणी काढून घेतला तरी तिला बरोबर दिसतं की, तिची छेड कोण काढतंय. हे सर्व तिला अगदी सहजपणे कळतं. डोळ्यांना दिसत नसतानाही नवं लुगडं नेसून 'समदी माझ्याकडं कशी बघत होती' हे सांगणारी, डॉक्टर अजितकुमारला कम्पाऊंडर म्हणत शिव्याशाप देणारी; आतून प्रेमळ मात्र वरून कोल्हापुरी शिव्या देणारी सरु आजी लय भारीचं आहे.
या सरु आजीचं खरं नाव आहे रुक्मिणी सुतार. वयाच्या ७० व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल, अशी कामे त्या करतात. अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या अभिनय क्षेत्रात १० वर्षे असून त्यांनी 'मिसेस मुख्यमंत्री,' 'लागीरं झालं जी,' 'दुर्गा' यांसारख्या मालिका केल्या. तर 'होम स्वीट होम,' 'पोशिंदा,' 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर,' 'जाऊ द्या ना बाळासाहेब,' 'बघतोस काय मुजरा कर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रुक्मिणी आज्जी सिंचन विभागात नोकरी करायच्या. त्यावेळी सुट्टीच्या दिवशी त्या कुटुंबियांपासून , पतीपासून लपुनछपुन त्या नाटकात भाग घ्यायच्या. या आज्जींनी ‘दबंग’ चिटपटात सलमान खान सोबतही काम केल आहे. परंतु, त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली ती ‘देवमाणूस’ या मालिकेतून. यामध्ये त्यांची 'सरु आजी'ची भूमिका सरस ठरली आहे.

‘देवमाणूस’ या मालिकेतील डॉक्टर अजितकुमार, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि सरु आजी या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম