हाडाचा खलनायक राजशेखर

 हाडाचा खलनायक राजशेखर 



मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे राजशेखर.
राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर. त्यांचे वडील गणपतराव गोविंदराव भूतकर यांचा ‘टेलरिंगचा’ व्यवसाय होता आणि त्यांना ‘कलाकारीची’ आवड होती.त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम.आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले.
हाडाचा खलनायक राजशेखर

राजशेखर यांना अभिनयाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळालं. वडिलांना नाटकांमध्ये काम करताना पाहून, आपणही अभिनेता बनायचं असं त्यांनी ठरवलं. १९५० साली गडहिंग्लजहून कोल्हापूरला ते निघून आले. कोल्हापूरला आल्यावर नाना जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. आपणही केंव्हातरी हा रंगमंच गाजवू ही आस उराशी बाळगत, नाना जोशींच्या नाटकांमधून ते ‘प्राँप्टरची’ भूमिका बजावू लागले.

१९५८ साली भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टरची छोटी भूमिका रंगवली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची हीच सुरुवात होय. त्यानंतर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते भालजींच्या कंपनीत दाखल झाले. त्या काळात अभिनेते जयशंकर दानवे खलनायकाच्या भूमिका करत असत. त्याच्याबरोबर राजशेखर यांनीही खलनायक म्हणून काही चित्रपटांतून काम केले. त्यानंतर ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ‘साधी माणसं’ (१९६५) या भालजींच्याच चित्रपटात त्यांनी फक्कडराव ड्रायव्हरची भूमिका केली तसेच, या चित्रपटाचे साहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. ही भूमिका लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला.
ओठांवर तलवार कट मिश्या, हातात पेटती सिगरेट, नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद, ओठांवर मधुर वाणी पण वृत्ती कट्-कारस्थानी! अशी ही ‘छक्कडरावाची’ भूमिका अख्या महाराष्ट्राला वेड लाऊन गेली. आणि मराठी सिनेसृष्टीला मिळाला एक हाडाचा खलनायक. उंच बांधा, देखणा चेहरा, बोलके डोळे आणि धार-दार नाक अशा या देखण्या खलनायकाची प्रत्येक भूमिका ही वेगळी असायची. त्यांना पडद्यावर खलनायक म्हणून स्वतः चे अस्तित्व दाखवण्या करता कधी गेट अप किंवा स्पायसी डायलॉग्स ची गरज भासली नाही.
त्यांचा अभिनय अप्रतिम होता. लोक त्यांना घरी बोलवायला देखील घाबरत असत. त्यांच्यासोबत यायला किंवा जेवण करायला देखील टाळायचे. बायका त्याच्याशी बोलायलाही घाबरायच्या, त्याला पाहून लपून बसायच्या. 

हाडाचा खलनायक राजशेखर

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच अनेक नाटकांतही त्यांनी काम केले. ‘आज इथं तर उद्या तिथं’, ‘बेबंदशाही’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘चोर सोडून संन्यासी’ या नाटकात त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या आणि ‘रिश्ते-नाते’, ‘छोटे बाबू’, ‘युगांतर’ या दूरदर्शन मालिकांतूनही काम केले. त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात खलनायक साकारला. रंगभूमीवर, छोट्या पडद्यावरही ते आभिनय करत राहिले.
‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (१९८२), ‘जोतिबाचा नवस’ (१९७५), ‘वारणेचा वाघ’ (१९८४) अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला. याच दरम्यान ‘संगोळी रायण्णा’ या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला, तसेच ‘दो ठग’, ‘नेत्रहीन साक्षी’, ‘दो छोकरी’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.
रसिकांच्या मनावर अनंत काळापर्यंत अधिराज्य गाजवत राहील यात काहीच शंका नाही. राजशेखर यांचे २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली! 

अनिल पाटील पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম