स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा जेजुरी गडावरचा दरोडा
. 📯 दि. ९ फेब्रुवारी २०२० 📯
फेसबुक लिंक http://bit.ly/3rEVusa
१९४२ चा काळ, सर्वत्र इंग्रजी शासनाविरूध्द असंतोष पसरला होता.तो असहकार,चलेजाव आंदोलनाचा काळ.स्वांतत्र्य मागुन ही मिळत नव्हते.यासाठी काही क्रांतीकारानी इंग्रजी सत्तेविरूद्ध शस्त्र उगारण्याचा निर्णय घेतला होता.हे सर्व क्रांती कारक जहाल गटाचे मानले जात. क्रांती करणेसाठी आर्थिक पुरवठा कमी पडत होता.अशावेळी काहीनी देवाचे पैसे या योजनेसाठी वापरावयाचे ठरवले. पण ते मागुन मिळणार नव्हते.श्रध्देचा विषय होता.
कोल्हापुर सांगली सातारातील काही तरुण क्रांती कारानी चळवळ सुरु केली. याचे नेतृत्व करत होते रत्नाप्पा कुंभार.
शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे रत्नाप्पा कुंभाराचा जन्म झाला होता.कोल्हापुरात लिंगायत बोर्डिंगमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शेतकरी चळवळीशी झाली. तेव्हा माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. या सभांमुळे रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. व भूमिगत झाले.कोल्हापुरात परतल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.या भूमिगत कार्यकर्त्यांचे मुख्य केंद्र मिरजेजवळच्या दंडोबाच्या डोंगरावर होते.रत्नाप्पानी मालगावच्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात आपली गुप्त कचेरी स्थापन केली होती. ब्रिटीश सत्तेला जर भारतातून घालवायचे असेल तर छोट्या छोट्या गावापासून त्यांना मागे हटवावे लागेल हे सूत्र प्रत्येक क्रांतीकारकांच्या मनात घट्ट बसले होते. रत्नाप्पांचे कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन्स जाळणे, गाव चावड्या ताब्यात घेणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया सुरु केल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया होत असत.पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. यातूनच रत्नाप्पा कुंभार व त्यांच्या साथीदारांनी बार्शीला जमणारी टपाल ट्रेन लुटली. हे सगळे क्रांतिकारक भारतमातेला स्वतंत्र करायचं या एकाच भावनेने पछाडले होते.
यात कोणाच वैयक्तिक नुकसान करायचा त्यांचा तीळमात्रही हेतू नव्हता.तिकडे साताऱ्यातील नाना पाटलांच्या पत्री सरकारची दहशतदेखील वाढली होती.
सगळी सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.अखेर क्रांतिकारकांनी निर्णय घेतला की जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटायचा.२७ जुलै १९४४ रोजी रात्री खंडोबारायाच्या जेजुरी देवस्थानावर असाच दरोडा टाकण्याचे ठरले. नेहमीप्रमाणे रात्री १२ वाजता देवस्थानाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता.शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली.खंडोबाच्या देवळाचे सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काठय़ांचा मारा सुरू झाला. पाहतात तो समोर उंचपुरे दहा-बारा जण तोंडाला काळी फडकी बांधून समोर उभे. त्यांच्या हाता काठय़ा, बंदुका होत्या. त्यांनी सगळ्यांना एकत्र करून लांबवर बसवले. पुजाऱ्याकडून तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुडय़ा, माणिकाचे खडे, पानडय़ा, लाकडय़ा, कंठी, मोत्याचे तुरे, छऱ्यां, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोटय़वधी किमतीचे सोन्याचे दागिने होते. तो घेऊन दरोडेखोर पळून गेले.त्या काळात (१९४२) दुसरे महायुद्ध सुरू होते. साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री (प्रति) सरकार स्थापन झाले होते. ‘छोडो भारत’ची चळवळ जोरात सुरू होती. सारे पोलीस खाते कामाला लागले. पण जेजुरी दरोडय़ाचाही पत्ता लागत नव्हता. एके दिवशी बेचाळीसच्या चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांची गुप्त बैठक सदाशिव पेठेत, टिळक रोडजवळच्या ‘मंगल भुवनात’ असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. रात्री ११ वाजता पोलिसांनी धाड टाकली. हा छापा राजकीय होता. पण झडतीत पत्रव्यवहार हाती लागला तो जेजुरी दरोडय़ासंबंधीचा. त्यावरून नगर, सोलापूर, कोल्हापूर, या ठिकाणी धाडी टाकून संबंधितांना अटक करण्यात आली. रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते.जानेवारी १९४५ मध्ये पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. तेव्हा साक्षी पुराव्यावरून लक्षात आले की राजकीय कारणासाठी देवस्थानाची लूट करण्यात आली होती.
१७ जानेवारी १९४६ रोजी न्यायाधीश दलाल यांनी मे. कृ. पटवर्धन, शं. द. माने, य. म. कुलकर्णी, द. गो. तांबट, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ आदी बारा जणांना तीन वर्षे अधिक एक वर्ष अशी शिक्षा ठोठावली. एक आरोपी शि. गो. उपाळेकर सराफ यांचा दरोडय़ाशी काही एक संबंध नसल्याचे आढळून आल्याने त्यांना दोषमुक्त ठरवून सोडून देण्यात आले.
हे क्रांतकारक दरोडेखोर नव्हते पण त्यांना भारतमातेला परकीय जोखडातून मुक्त करायचे असल्याने दरोडयाचे पाऊल उचलावे लागले
༺━━━━━━━━━━━━━━━༻
Tags
माहिती
