गावाकडच्या लग्नाची पंगत
फेसबुक लिंक http://bit.ly/3cYFxbZ
गावाकडील लग्न म्हणजे आगळेवेगळेच...
लग्नाच्या मांडवात "पावणे मंडळी नि मित्र मंडळीनी जेवणा शिवाय जाऊ नये"... लग्नाच्या अक्षता पडल्या कि स्पीकरवरून हमखास सुचना वजा ताकीद दिली जाते.ताडपत्री पूर्ण गोळा करून मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे असते.... जेणेकरून "तदेव लग्नम सुजनम तदेव ताराबलम चंद्रबलम" ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे असतात.... पहिली पंगत !!!!
गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी चौरंगाभोवती गिरक्या मारे मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो । (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट) या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असतात त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागतात.
पत्रावळी ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नाही. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागते. कशीबशी पत्रावळ सेट केली तर वारा येतो आणि ही बया इकडेतिकडे उडू लागते. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागतो. पत्रावळी स्थानापन्न झाल्या की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा इसम येतो आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा , बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडतो. या इसमाना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असतात दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाते पण यांना जेवणाऱ्याची दयामाया येत नाही मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येतात.दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असतात. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावतात. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली मागून येते. वरण वाढणारी बहुतेक मंडळी बिनडोक वर्गातले असतात. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असतात. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जातो. वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत हुसळीची बादली नाचत येते. हुसळीत घुसवलेले वर्गाळे तर्रर्रर्ररी (कट)सकट बाहेर येते आणि पत्रावळीवर उताणे होते. या एका वर्गाळयामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होतात.काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असतो. तिच्या फटीमधून वरण आणि हुसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो....
एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो.. त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर...गम्मत नका विचारू.....शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालावलेल्या भातावर येऊन बसतात. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा " वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारतो. बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागते त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स मिळत नाही. आणि मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणावाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतुन पळूनही जातो..काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागतो. आधीच बुंदी आणि हुसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधी सावळा विठठल बनतो हेही कळत नाही..... बारा वाजेचे लग्न अडीचला लागलेले असते त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करतात.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवतात आणि पाण्याच्या हौदाकडे किंवा बॅरलकडे धावतात.पहाटे कधीतरी भरून ठेवलेले पाणी एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असते. प्लास्टिकच्याच(जर्मन ग्लास आता नाहीत)रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागतात.दुसऱ्या बाजूला रंगीत कपड्यातले बहाद्दर पहिल्या पंगतीला जेवायला बसलेले असतात - हे ते बॅंडवाले ! त्यांना कुणाचा काहीएक पडलेलं नसत ! बिदागी आणि जेवण हाणल की झालं !
आता दिवस सरले. दारात मंडप घालून लग्न होत नाहीत. आता लग्न मंडप पण नाही आणि त्या पंगती पण नाहीत.पळसाच्या पत्वराळीची जागा आता प्लॅस्टिक कागदी पत्रावळीने घेतली आहे. याची जागा आता लग्नकार्यालय नि बुफेनी घेतलीय ती पंगतीची मजा आता नाही
अनिल पाटील पेठवडगाव
Tags
BLOG

