खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का

खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का ?
  .......................................................
 ओठी हासू नयनी पाणी
               स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
            खरंच साय्रा मानव जातीला जन्म देणारी स्त्री ही प्रत्यक्षात साऱ्या विश्वाची आई आहे. ती एक देवता आहे. जिला आपण रणरागिनी म्हणतो, महिषासुरमर्दिनी म्हणतो, एक पेटती मशाल म्हणतो, एक तळपती तलवार म्हणतो. पण प्रत्यक्षात आज ती तशी आहे का ? आपण प्रत्यक्षात तसा तिला न्याय देतो का ?  की केवळ शब्दांचे बुडबुडे देतो ?  याचा विचार केला तर मनाला खूप वेदना होतात. केवळ शब्दांच्या फुलांनी तिचं कौतुक करायचं. तिला देवता मानून मखरात बसवायचं. आणि काही क्षणातच हे सारे विसरुन तिच्यावर अनन्वित अत्याचार करायचे.  
                   एखाद्या सरड्या प्रमाणे क्षणाक्षणाला आपले रंग बदलणाऱ्या पुरुषाचे, माणसाचा पशू होणाऱ्या या सैतानाचे, पाशवी अत्याचार सोसत त्यांच्याच दावणीला आपलं जीवन बांधलेलं पाहिलं की साऱ्या स्त्री जातीचं मन कसं आक्रंदुन उठतं ! मग मनात विचार येतो की देवानं  आम्हाला का म्हणून स्त्रीच्या जन्माला घातलं ?  हे सारं सोसण्यासाठी की एक सबला असूनही अबला म्हणून जगण्यासाठी. काहीच कळत नाही.
 आमचा पेला दुःखाचा
         डोळे मिटुनी प्यायाचा  या केशवसुतांच्या काव्यपंक्ती प्रमाणे स्त्री जन्माला आल्यापासून जन्माच्या अंतापर्यंत सारं दुःख आणि दुःखच  भोगते आहे. लहानपणी पिता, तरुण पणी नवरा, आणि वार्धक्यात मुलगा ऐकून काय संपूर्ण आयुष्यच शेवटी पुरुषाच्याच दावणीला बांधून घेत पुरुषांच्याच जाचक बंधनात राहून तीला आपलं जीवन जगावं लागतं. एवढंच नव्हे तर जन्माला येताना सुद्धा मुलगी म्हटली की तिला गर्भातच मारलं जातं आणि वंशाचा दिवा म्हणून मुलग्यालाच मानाचं पान वाढलं जातं. पण आज वृद्धाश्रमांची वाढती लोकसंख्या पाहिली की वंशाचा दिवा म्हणून टेंभा मिरवणार्‍या पुरुष प्रधान संस्कृतीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून नियतीने उगवलेला तो सूडच आहे. पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर आईबापावर जिवापाड माया करणारी केवळ मुलगी आणि मुलगीच असते. 
मुलांच्या लग्ना पर्यंत
               आई-बापच अनभिषिक्त सम्राट असतात
लग्नानंतर मात्र त्या साम्राज्याला
             हळूहळू हादरे.... बसतात.... 
              उपरोक्त चारोळी प्रमाणे मुलं लग्नापर्यंतच आईबाबाची असतात. लग्नानंतर मात्र ती पूर्ण बदलतात. पण मुलगी लग्न होऊन जरी सासरी गेली तरीही 
   घार हिंडते आकाशी
              चित्त तिचे पिलापाशी
              या उक्तीप्रमाणे ती सासर मध्ये असली तरी तिचे चित्त सदैव आपल्या आई-बाबा जवळच रेंगाळत असते. त्यांच्याच काळजीनं ती व्याकूळ होत असते. कन्या रुपी रोपट्याचा सासर मध्ये वटवृक्ष झाला तरी आपल्या आई बापाला मायेची सावली देण्याचा आयुष्यभर प्रयत्न करते ती मुलगीच. मुलगा मात्र लग्नानंतर आणि त्यातही त्याला मुले झाल्या नंतर तर तो आई बाबाला फारसं मनावर घेत नाही. त्यांचं दुखलं-खुपलं तर फारसं मनावर घेत नाही. याउलट मुलीला मुलं झाली तरीही आपल्या मुलांना सांभाळत आपल्या आई वडिलांच्यावरही ती जीवापाड माया करते. आणि असं करणारी केवळ मुलगी आणि मुलगीच असते. 
                आज वर्तमानपत्र हातात घेतले की बातम्या वाचताना प्रत्येकाचा हात जणू थरथरतो. कारण
माझ्या शिवबाच्या राज्यातच
               कुस्करली जाते एकेक कळी
दररोजच्या अमानुष अत्याचारात
                 जातोय इथं हजारो नारींचा बळी
              ही आजची अत्यंत भयानक परिस्थिती आहे
               असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी स्त्रीवर अत्याचार झाल्याची बातमी पेपर मध्ये नसते. 
               आज आपण चंद्रावर पोचलो. मंगळावर पोचलो. एवढेच नव्हे तर सूर्याला सुद्धा गवसणी घालू पाहत आहोत. या चंद्र - मंगळ मोहिमेत स्त्रीचा पुरुषा इतकाच बहुमोल सहभाग असतो.  मागील दोन वर्षात भारताच्या चंद्रयान मोहिमेचे   नेतृत्व दोन कर्तबगार महिलांनीच केले होते. आपण चंद्रावर पोचलो. मंगळावर पोचलो. पण आपली स्त्री मात्र युगानुयुगे पुरुषप्रधान संस्कृतीलाच बांधलेली आहे. युगानुयुगे ती  आहे तिथेच आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कणखर बनून जीवनातील संघर्षाच्या  विरोधात ती लढा देते. पण तिचं दुय्यम स्थान, तिचं कनिष्ठ स्थान आज पर्यंत कमी झालं नाही. बदलणं हा निसर्गाचा नियम असला तरी तो निसर्ग नियम स्त्रीच्या बाबतीत मात्र अपवादच ठरला. तिच्या वेदनांच्या मध्ये काहीच बदल झाला नाही. स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणून बघण्याच्या दृष्टीत विज्ञानाच्या प्रगतीतही बदल झाला नाही. *ती आदिशक्ती आदिमाया आहे. या विश्वाची ती जननी आहे. पण हे सारं कथा कादंबरी आणि चित्रपटा पुरतच मर्यादित आहे .आणि मग काही वेळा प्रश्न पडतो की
भयचकित नमावें तुझं रमणी
            जन कसे तुडवती तुज  चरणी ? 
उपरोक्त काव्य पंक्तीतून तिचा दर्जा काय ? तिचं महत्त्व काय ? हे सारं समजून येतं. पुरुषापेक्षा तिचं श्रेष्ठत्व दिसून येतं. पण तरीही तिला दुय्यमच ठरवलं जातं. मग अगदी कातर स्वरात पापणीच्या ओंजळीतून तिच्या गालावर ओघळलेले तिचे अश्रूच   पुटपुटतात........   
असं कसं झालं
           माझ्या कपाळी आलं
निसर्गाशी स्पर्धा करणारा आणि आपली तुलना साक्षात परमेश्वराशी करणारा हा मानव पाशवी जनावरां पेक्षाही हिंस्त्र  कसा काय बनू शकतो ? त्याच्या हिणकस बुद्धीमत्तेची अक्षरशः कीव येते. मानवी शरीरातला हा पाशवी सैतान आज एकविसाव्या शतकात सुद्धा स्त्रीला माणूस मानण्यास तयार नाही हा एक दैवदुर्विलास आहे 
                स्त्रीला एक भोगवस्तू मांनणाऱ्या, तिला बरोबरीचे स्थान न देणाऱ्या पुरुषाला हे माहीत नाही का  ?  कुस्तीत साऱ्या विश्वात नांव कमावणाऱ्या फोगट भगिनी, एका मुलीनं कसं जगावं याचं आदर्शवत उदाहरण अबोली, क्रीडाक्षेत्रात चमकणाऱ्या पी. टी. उषा, तेजस्विनी सावंत, अंजली भागवत, सानिया मिर्झा, साईना आणि सिंधू , राजकारणातील सर्वोच्च नारीरत्नं इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, नीलम गोरे, अवकाशातील कल्पना चावला,  पोलीस जगतातील किरण बेदी, मीरा बोरवणकर, गायन क्षेत्रातील स्वर कोकिळा आणि साय्रा विश्वाचं एक अनमोल रत्नं लतादिदी, आशा, उषा, अध्यात्मातील मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई चौधरी, प्राचीन काळी ज्यांच्या अफाट बुध्दीमत्ते पुढं सारं विश्व नतमस्तक होत असे त्या नारी रत्नं गार्गी आणि मैत्रयी अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 
                     आज तर  विविध क्षेत्रातील उत्तुंग शिखरे जिंकण्यात मुलांच्या पेक्षा मुलींच मोठ्या संख्येने आहेत. तरी सुद्धा पुरुष जणू आपल्याला हे माहितच नाही असं म्हणून संपूर्ण स्त्री जातीला दुय्यमच स्थान देत आहे. आज एकही क्षेत्र असं नाही की जेथे स्त्रीने आपलं पाऊल उमटवलेले नाहीत. तरी सुद्धा पुरुष तिला बरोबरीचं स्थान देण्यास तयार नाही. हे पाहिलं की पुढारलेल्या पुरुष मनाची कीव करावीशी वाटते.
गर्भातील चिमुरडीला मारण्याची
                प्रत्येकालाच असते घाई
मारु नका गर्भात तिला
                तीच असते आपली उद्याची आई
                हेच जणू पुरुष प्रधान संस्कृती विसरलेली आहे. म्हणूनच तर गर्भातील स्त्रीभ्रूण हत्येने अक्षरशः कळस गाटलेला आहे.  यामुळे दिवसेदिवस मुलींची संख्या घटते आहे. आज आपल्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींचं प्रमाण पाहिलं तर सुमारे शंभर मुला पाठीमागे  875 मुली असं प्रमाण आहे. म्हणूनच तर हजारो तरुण मुलं आज लग्नाविना फरफटत आहेत. अडतीस, चाळीस वर्षे झाली तरी मुलांचे लग्न होत नाही.  हे सारं पुरुषांनीच केलेल्या पापाचं प्रायचित्त आहे.
                    छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलं की आपली मान आदराने झुकते. वीरश्रीने आपले बाहू स्फुरण पावतात. पण त्या मराठमोळ्या अनमोल रत्नाला जन्म देणारी जिजाऊ माता एक स्त्रीच होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर औरंगजेबाला 27 वर्षे झुंज देणारी, आणि त्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडणारी महाराणी ताराबाई ही महिषासुरमर्दिनी एक स्त्रीच होती, संपूर्ण जगाला नतमस्तक करायला लावणारी आणि अनेख वर्षे भारताच्या  सर्वोच्च पंतप्रधानपदी विराजमान होणारी आणि जगातील महासत्ताना सुद्धा  हादरवून सोडणारी इंदिरा गांधी ही एक स्त्रीच होती. अशी किती उदाहरणे देता येतील. यातून एकच सिद्ध होतं की स्त्री ही एक दुर्बल अबला नसून तेजाने, आपल्या पराक्रमाने तळपणारी प्रबळ  रणरागिनी आहे. सुईच्या  टोकावर मावेल एवढ्या कणा एवढीही ती पुरुषापेक्षा कमी नाही.
               परवा एका मुलाखतीत पाश्चात्त्य लष्करातील एका महिला ऑफिसरने, "लष्करा मध्ये महिला सैनिकांचा एक भोग वस्तू म्हणून वापर केला जातो " असा आक्रोश व्यक्त करीत आपल्या भावनांना तीने वाट मोकळी करुन दिली. स्त्रीविना पुरुषा अपुरा आहे. स्त्रीच्या साथीने दिग्गज उंची गाटणारा पुरुष परत त्याच स्त्री जातीवर अनन्वित अत्याचार करतो आहे. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, राजकारण असो, कलाक्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र असो जगातल्या कोणत्याही क्षेत्रात आज स्त्री खरोखरच सुरक्षित नाही. हे कटू आहे पण धगधगतं सत्य आहे. आणि हेच स्त्रीच्या जन्माचं दुर्दैव आहे. म्हणूनच माझ्या  ओठांच्या पाकळ्यांतून हळुवार शब्द सांडतात..........
एक स्त्री म्हणोनी मी
             किती युगे अन्याय सोसू
 सांग नारे देवा मला
              केव्हा पुसणार आमचे आसू......... 
               आमचे आसू........ 
 .....................................

     पत्रकार -  रामचंद्र सुतार (सर)
                       चांदेकरवाडी 
                    8888818631
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম