नेपाळची तुळजाभवानी

 नेपाळची तुळजाभवानी ! 


फेसबुक लिंक http://bit.ly/3aEPKsa
तुळजाभवानीचा हा महिमा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर थेट विदेशात पसरलेला आहे. नेपाळच्या अशाच एका मंदिरात आपल्याला आपली तुळजाभवानी विराजमान झालेली दिसते. तुळजाभवानी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर नेपाळच्या राजघराण्याची सुद्धा कुलदैवत आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे. नेपाळी भाषेत देगू तलेजूभवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधली तुळजाभवानीची परंपरा वैशिष्टय़पूर्ण आहे.

नेपाळची तुळजाभवानी !

छत्रपती शिवराय आणि आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. प्राचीन काळापासून तुळजाभवानीचे अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता. त्यानुसार इ. स. १३२४ ला कर्नाटवंशयीय राजा हरिसिंगाने प्रथम नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे श्री तुळजाभवानीची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला आहे.Ⓜनेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हणतात. नेपाळमध्ये कर्नाट राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे ही नेवारी बांधकामशैलीची आदर्श उदाहरणे आहेत. उतरते छप्पर किंवा पॅगोडय़ाप्रमाणे आकार असणारी तलेजूभवानीची भव्य मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत.
हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर असून हा देश ८०० किमी लांब आणि २०० किमी रुंद आहे. नेपाळमध्ये पूर्वी अनेक छोटी मोठी संस्थाने असल्याने या राजांच्या अधिकारक्षेत्रामुळे नेपाळचा भूभाग विविध संस्थानांत विभागला गेला होता.Ⓜ परंतु २१ डिसेंबर १७६८ साली पृथ्वीनारायण शाहा नावाच्या राजाने नेपाळमधील सर्व राजांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली. त्यानंतर जवळपास २००८ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाहीच होती. यादरम्यान नेपाळमध्ये मल्ल, शाहा आणि राजपूत या घराण्यांनी आपला राज्यकारभार केला. विशेष म्हणजे ही तीही घराणी मूळची हिंदुस्थानातील आहेत. या राजघराण्याबरोबरच नेपाळमध्ये ब्राह्मण, मोर, रजपूत, कायस्थ, मगर, गुरुंग, जरिया, नेवार, मुरची, किरत, लिंबस, लापचा याप्रमाणे अनेक समाजांचे लोक राहतात. हा सर्व समाज हिंदू असल्याने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची ओळख होती. नेपाळवर राज्यकारभार करणारे राजघराणे कुठलेही असले तरी देगू तलेजूभवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झाला आहे. हजारो वर्षांपासून नेपाळने आपली परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापुराप्रमाणे त्याठिकाणच्या देवीच्या प्रथापरंपरा, पुजाअर्चा आणि विधी उपचार केले जातात.

तुळजाभवानी भक्त राजा हरिसिंग –  राजा हरिसिंगदेवाचे मूळ घराणे कर्नाटवंशीय असून त्यांच्या साम्राज्यविस्तार कर्नाटकापासून बंगालपर्यंत आणि त्यानंतर पुढे बिहापर्यंत पसरला होता. राज्यकारभारामुळे या घराण्याच्या राजधान्या बदलल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली तुळजाभवानीची भक्ती कायम ठेवली होती. बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमरौनगढ या ठिकाणी असून मध्ययुगीन कालखंडात या भागाला मिथिला म्हटले जात होते. सध्याच्या बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यत सिमरौा गढचा भाग मोडत होता. या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकाने सिमरौनगढावर आक्रमण केले. तुघलकापुढे हरिसिंगाचा निभाव न लागल्याने त्यांनी आपली पत्नी देवलदेवी आणि पुत्र जयपालदेवसह नेपाळकडे पळ काढला. या वेळी ते आपल्या मुलीला वाचवू शकले नाहीत. कारण घियासुद्दीनने हरिसिंगाच्या मुलीला उचलून नेले होते. हरिसिंग हरले असले तरी त्यांनी देवीवर श्रद्धा ठेवून आपला पुढचा प्रवास चालू ठेवला. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपली कुलदेवता तुळजाभवानीची मुर्ती घेतली होती. आपल्या संरक्षणार्थ या लोकांनी नेपाळ जवळ केला.
नेपाळच्या भक्तपूर भागात त्यावेळी रुद्र मल्ल नावाचा राजा राज्यकारभार करत होता. मल्ल म्हणजे पहेलवान. कधीकाळी कुस्तीच्या जोरावर या घराण्याने नेपाळमध्ये आपली सत्ता  प्रस्थापित केली. मल्ल घराणे मुळचे उत्तर भारतातील अवध या ठिकाणचे रहिवासी असून ते सरजुबंशीयांचे वंशज असल्याने त्यांनी हरिसिंगाच्या कुटुंबाला आश्रय दिला. राज्य गेले, राजा गेला परंतु तरीही हरिसिंगाच्या वंशजांनी तुळजाभवानीची आस सोडली नव्हती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या वंशजांनी पुढेही चालूच ठेवली होती. त्यामुळे आपल्या पदरी असलेल्या तुळजाभवानीच्या मुर्तीचा जप करत या लोकांनी अखेर नेपाळमध्ये राज्याश्रय मिळविला.
नेपालनरेश रुद्रमल्लने हरिसिंगाचा पुत्र जयपालदेवशी  आपली मुलगी नायकदेवीचा विवाहलावून दिला. मल्ल घराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपालदेवच्या हाती आली. साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगाच्या वंशजांची होती. त्यामुळे हरिसिंगाच्या वंशजांनी प्रथमत: नेपाळमधील भक्तपूर♏  या ठिकाणी श्री तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साहजिकच तुळजाभवानी ही राजघराण्याची कुलदेवता बनून नेपाळमध्ये विराजमान झाली. दिवसेंदिवस मल्लांच्या सत्तेचा उत्कर्ष होवुन नेपाळमधील काठमांडू आणि पाटण इथपर्यंत या घराण्याने आपला साम्राज्यविस्तार घडवून आणला.
साम्राज्यविस्तारोबरच मल्लांचा विस्तारही वाढला आणि त्यातूनच या घराण्याचे तीन भाग पडून भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा तीन राजधान्या तयार झाल्या. साम्राज्यविस्तारासोबत तुळजाभवानीचा महिमाही विस्तारित झाला. आणि तुळजाभवानी त्या त्या राजधानीत विराजमान झाल्या. प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इ. स. १५६७ साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडूत तर १६६७ ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि १७३६ ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधली.
तुळजाभवानी ते तलेजूभवानी
नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हटले जाते. मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे अतिशय भव्य असून देगू तलेजूभवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडा आणि त्यासोबत देवी परिवारातील देवदेवतांची अनेक मंदिरे बांधलेली असल्याने देवी मंदिराच्या परिसरात इतर मंदिराची गर्दी झालेली आहे. या मंदिर परिसराला दरबार चौक म्हटले जाते. देगू तलेजू ही नेपाळमधील राजघराण्याची कुलदेवता असल्याने देवीची मंदिरे ही राजाच्या वैयक्तिक मालकीची असल्याने या मंदिरात वर्षभर बाहेरच्या सर्वसामान्य लोकांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. अगदी २००७ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाही असल्याने शेकडो वर्षांपासून यात कुठलाही बदल झाला नाही.
 
रोज सकाळी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राजाच्या पुढील दिनचर्येला सुरुवात होत नव्हती. याकरिता प्रत्येक मंदिरात रोजच्या पूजेची व्यवस्था पाहण्याकरिता विशेष कायमस्वरूपी पुजारी आणि त्याच्या मदतीला इतर सेवेकरी देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे तुळजापुरातील देवीचे पुजारी ज्याप्रमाणे वंशपरंपरेने एकच आहेत त्याप्रमाणे नेपाळमध्येही पूर्वीपासून आतापर्यंत पूजेचा मान एकाच घराण्याकडे आहे. त्यानुसार भक्तपूरमध्ये सिद्यवीर कर्माचार, काठमांडूत उद्धव मानकर्माचार्य आणि पाटणमध्ये विष्णूचंदा मानकर्माचार्य हे वंशपरेने तलेजूची धार्मिक पद्धतीने पूजाविधी करतात. फक्त नावच नाही तर बऱ्याच बाबतीत तुळजाभवानीच्या पूजाविधी परंपरेचे साम्य या ठिकाणी पाहण्यास मिळते. देवीचा पुजारी ब्राह्मण समाजाचा असून इतर सोळा सेवेकरी अन्य समाजांचे आहेत. तुळजापुरातील सेवेकऱ्यांना सोळा सेवेकरी म्हटले जाते त्याप्रमाणे तिथे सोलकास्ट म्हणतात. देवीला स्पर्श करून पूजाविधी करण्याचा मान ज्याप्रमाणे इथे फक्त कदम घराण्याकडेच आहे त्याप्रमाणे तिथे तो मान ठरवून दिलेल्या ब्राह्मणांकडे आहे. तलेजूची पूजाअर्चा ही सोवळ्यात आणि पूर्णपणे वैदिक पद्धतीने केली जाते. याचबरोबर आपल्याप्रमाणे कुठलीही आरती न करता पूजा झाल्यानंतर जोशी संकल्प सोडतो. पूजेकरिता लागणारे पाणी, फुलं, नैवेद्य यांसारख्या सर्व बाबींची पूर्तता मंदिरातच केली जाते. रोज सकाळी पूजाविधी व्यवस्थितपणे संपन्न व्हावेत म्हणून मंदिर परिसरात मोठा बारव, फुले यांसारख्या सेवा कायम करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्य तयार करण्याकरिता मंदिरातच चूल मांडलेली असते. सोलकास्टमधील प्रत्येक जण ठरवून दिलेले काम नियमितपणे करत असतो. त्यानुसार सोलकास्टमधील सेवेकरी आणि त्यांची कामे याप्रमाणे ठरवून देण्यात आलेली आहेत.
१.     जोशी : तिथी मिथी ठरवणे आणि पूजेनंतर संकल्प सोडणे.
२.     मल्लठकुणी : राजाचा खासगी नोकर असून राजाचा प्रतिनिधी म्हणून पूजेला उपस्थित असतो.
३.     प्रधान : मंदिरात तयार करण्यात आलेला नैवेद्य दाखविण्याचे काम करतो.
४.     राजोपाध्याय : राजाकडून आलेला पक्वान्नाचा नैवेद्य दाखविणे.
५.     राजभंडारी :  मंदिरात नैवेद्य बनविण्याचे काम करतो.
६.     महर्जा : बाहेरील कामावर देखरेख ठेवणे.
७.     परिहार : ठरवून दिल्याप्रमाणे नगारा वाजविणे.
८.     डंगोल : पूजाविधी करताना सर्व कामांत मदत करणे.
९.     कुचीहार (मेहतर ) : मंदिर आणि परिसराची साफसफाई करणे.
१०.     दमई (दर्जी ) : देवीचे वस्त्र शिवणे.
११.    कसाई : बलिदान देणे.
१२.    शिगसेन : बलिदानासाठी रेडा (रांगा) आणि बोकड (बोका) आणणे. इतर चार सेवेकरी सर्व कामांत मदत करतात.

नेपाळमधील तलेजूभवानीची मूर्ती १० भुजांची असून पाठीमागे शंकर उभे आहेत. देवीच्या हातात विविध प्रकारची आयुधे आहेत. हातात त्रिशूल घेऊन देवी विजयी मुद्रेने महिषासुराचा वध करताना प्रसन्न दिसून येतात. नवसाने वेगवेगळ्या भागांतील मूर्ती सोन्या चांदीने मढविलेल्या असतात. भक्तपूरमधील देवीची मूर्ती तर १०८ किलो सोन्याची आहे.
देगू तलेजाभवानीची परंपरा-
  ८ व्या शतका दक्षिणेकडील बहुसंख्य प्रांतावर कर्नाट घराण्याची सत्ता असून तुळजाभवानी ही त्यांची कुलदेवता होती. सत्ता संघर्षांत कर्नाट घराण्याची सत्ता दक्षिणेकडून बंगाल प्रांतावर आणि तेथून बिहारमधील चंपारण्य जिल्हय़ात पसरत गेली तरी या घराण्याने तुळजाभवानीची भक्ती कधी सोडली नाही.
१४ व्या शतकात बिहारमधील चंपारण्य जिल्हय़ात सिमरौनगढ या ठिकाणी कर्नाटवंशीय राजा हरिसिंगाची सत्ता असून दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकनने हरिसिंगावर आक्रमण केल्याने हरिसिंगाने नेपाळचा आश्रय घेतला. नेपाळमध्ये गेल्यानंतर भक्तपूर या ठिकाणी हरिसिंगाने तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिसिंगाचा पुत्र जयपालदेवाचा विवाह मल्ल राजवंशातील कन्येबरोबर झाल्याने कर्नाटवंश नेपाळच्या सत्तास्थानी बसला.
मल्ल घराणे आईकडून कर्नाटवंशीय असल्याने त्यांच्यातील तुळजाभवानीची भक्ती कायम असल्याने या घराण्यातील प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इ. स. १५६७ साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडूत तर १६६७ ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि १७३६ ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधून काढली.
नेपाळमध्ये तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हणतात. नेपाळी भाषेतील हा बदल असला तरी तेथील पूजाविधी आणि प्रथापरंपरा अगदी तुळजाप्रमाणेच आहेत. दसऱ्याला दसैन म्हणतात तर अष्टमीला १०८ रेडे आणि बोकडांचे बलिदान दिले जाते. तुळजाभवानीप्रमाणेच तेथेही सोळा सेवेकरी असून ते वंशपरंपरेने नेमून दिलेले काम करतात. राजेशाहीनंतर मंदिराच्या देखभाल दुरुस्तीत शिथिलता आलेली आहे. साहजिकच त्याचा परिणाम मंदिरावर झालेला आहे. नेपाळमधील छोटय़ा-मोठय़ा मंदिरात जाताना पायातील चप्पल किंवा बूट काढले जात नाहीत.
लोकशाही येण्यापूर्वी देवीच्या पूजेकरिता राजा किंवा त्याचा प्रतिनिधी प्रत्यक्ष मंदिरात राहत असे. परंतु राजेशाहीच्या अस्ता बरोबरच पूजाविधीमध्येही मोठी शिथिलता आली. राजाकडून सेवेकऱ्यांना मोबदला दिला जायचा. लोकशाहीमुळे राजाचे अधिकार गेले आणि मंदिरातील प्रशासनव्यवस्था कोलमडून पडली. मंदिराची मालकी सरकारकडे गेली तरी तेच पुजारी कायम असून त्यांना कुठलाही मोबदला मिळत नाही. केवळ भक्ती म्हणून ते देवीचा पूजाविधी करत असले तरी चरितार्थ चालविण्यासाठी त्यांना अन्यत्र रोजगार करावा लागतो. मी स्वत: तीनही मंदिरांच्या पुजाऱ्यांशी चर्चा केली. त्याद्वारे एक निश्चित सिद्धांत मांडता येतो की, नेपाळमधील देगूतलेजूचे.  न  वसतिस्थान हे केवळ नावापुरते तुळजाभवानीचे वसतिस्थान नसून त्यातील प्रथापरंपरेबरोबरच सर्व काही सारखेच आहे.Ⓜ

___________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गा
___________________________



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম