छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण ५ एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. १४ एकर ५गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.आणि विशेष म्हणजे पाण्याखाली तटबंदी बांधली.हे एक आश्चर्य आहे.
एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. हि भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला.
किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला.
जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा!
दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.किल्ला पाहयला एक दिवस सहज लागतो.किल्ला पाहताना देहभान हरपुन जाते.निसर्गरम्य कोकणातील या किल्याला एकदातरी भेट दयायला हवी.