🔹 गाण्याची पुस्तके 🔹
ही पुस्तके आणुन चालीप्रमाणे गुणगुणणे हा वेगळाच आनंद असे.रेडिआोवर एेकलेली गाणी पुस्तकात बघुन म्हणणे तो एक वेगळाच फील होता.
सिनेमांची माहिती पुस्तिका, जुन्या काळातल्या सिनेमांच्या गाण्यांची पुस्तके, काही तिकिटं अनेकांच्या संग्रही आहेत.आता आधुनिक काळात विविध गाणी थेट मोबाइलवर ऐकायला मिळतात. इंटरनेटच्या माध्यमातून हिंदी, मराठी वा आवडीची गाणी डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पण ज्या काळात सिनेविश्वाला आधुनिकतेचा स्पर्शही झाला नव्हता तेव्हा हिंदी सिनेमांचे कथानक व गाणी असलेल्या पुस्तिका मिळत असत.
आठ आण्यापासून ऐंशी पैशांपर्यंत
जुन्या हिंदी सिनेमांतील गाण्यांची पुस्तके त्या काळी रस्त्यावर विकत मिळायची. पेपर स्टॉलवर मिळायची.पाॅकेट बुक आकाराची ही छोटी पुस्तिका लक्ष वेधुन घेत असे. "बिनाका गीत माला" ची पुस्तिका सुध्दा मिळत असे. अनेकजण आपल्या आवडत्या चित्रपटातील गाणी गुणगुण्यासाठी हमखास हि पुस्तिका निवडत.कोल्हापूर एस.टी.स्टॅण्डच्या पेपर स्टॉल वर मी अनेकदा या पुस्तिका खरेदी केल्या होत्या. चित्रपट प्रमाणेच ठरविक गायकांच्या पुस्तिका सुध्दा मिळत असत.
"रफी की याद मे" , "सदाबहार लता के नगमे" , " मुकेश के नगमे" अशी त्या पुस्तिकेची नावे असत. तेव्हा ही पुस्तिका अगदी नाममात्र किमतीला मिळत असे. आठ आण्यापासून ऐंशी पैशांपर्यंत गाण्याच्या या पुस्तिका मिळत असे.चित्रपटाच्या या ब्लॅक व्हाईट पुस्तकामध्ये पहिल्या पानावर चित्रपटाचे नाव, कलाकारांचा फोटो तसेच दिग्दर्शक, कथा, संगीतकार यांचे नावाचा उल्लेख असायचा. पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर चित्रपटाचा सारांश लिहिलेला असायचा आणि मग मुख्य गाण्यांची सुरवात असायची. या चित्रपटांमधील गाणी अर्थपूर्ण असल्याने श्रोते हि गुणगुणत असत. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.
9890875498
Tags
BLOG