आवर्जून वाचलेच पाहिजे असे पुस्तक - "पालखी"
खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्याच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले. एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरा साठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!"
मोकाशी रूढ अर्थाने वारकरी किंवा भक्त नव्हेत. किंबहुना वारी किंवा तीर्थक्षेत्रेच नव्हे तर समाजात सर्वच ठिकाणी चालणार्या अनिष्ट प्रथांबाबतची नाराजी त्यांनी त्यांच्या कथांमधून सौम्य रीतीने व्यक्त केली आहे. त्यांच्या कथांमधूनही त्यांची पुरोगामी वैज्ञानिक दृष्टी ठळकपणे दिसते. ही वारी करण्याची कल्पना पालखीची आकडेवारी काढावी अशी होती. वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व थरांतले व प्रांतातले लोक एकत्र येतात. त्यांना दिलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून समाजाचाच एक आरसा दिसेल अशी मोकाशींची कल्पना. वारीसोबत जाणार्या चिवडा विकणारे, केशकर्तन करणारे, बांगड्या विकणारे यांसोबतच आपला व्यवसाय वारीच्या निमित्ताने चालू ठेवण्याचे ठरवत मोकाशी वारीत सामील झाले.
हातात प्रश्नावलींचे कागद व गळ्यात कॅमेरा लटकवल्याने इतर वारकर्यांपेक्षा वेगळ्या दिसणार्या मोकाशींना आपल्या शांत,सौम्य,प्रसन्न व सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने अनेक वारकर्यांशी खुलून संवाद साधता आला. प्रश्नावली बाजूला ठेवून सुपारी-तंबाखूच्या साथीने मोकाशींनी वारकर्यांशी मारलेल्या गप्पांमधून वारीचे अंतरंग प्रकट झाले आहेत. वारीमध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी येणारे वारकरी आपल्या सांसरिक व्यथा चिंता सोबत वागवत येतात हे मोकाशींना खटकते. मात्र वारीच्या कालावधीतच पुराने थैमान घातलेल्या पुण्याची बातमी कळताच कुटुंबाची काळजी वाटून पुण्याकडे परत धाव घेतल्याचे मोकाशी प्रांजळपणे मान्य करतात. घरच्या माणसांना "धडा शिकवण्याच्या" उद्देशाने पालखीत येणारे वारकरी इथे आहेत तर पालखीच्या वाटेवरच देह ठेवण्याचा निश्चय करणारे नव्वद वर्षे ओलांडलेले काही वारकरी इथे आहेत.
दीडशे मैलाच्या पायपिटीतील सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद-पुणे-फलटण-बरडगाव-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-शेगाव-वाखरी-पंढरपूर अशा प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी मोकाशींना आलेले अनुभव, त्रयस्थ दृष्टीकोणातून वारीकडे पाहत त्यांनी केलेली टिपणे, लहानसहान प्रसंगात पालखीतील वारकर्यांच्या वर्तणुकीचे अर्थ लावण्याचे त्यांचे कौशल्य "पालखी" मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
शेगाव येईपर्यंत वारीमध्ये आलेल्या अनुभवांवरूनही वारकर्यांप्रती असलेली मनाची ओल कायम ठेवणार्या मोकाशींच्या मनातील वारकर्याच्या प्रतिमेला शेगावमधील लाह्यांच्या व फुगडीच्या प्रसंगानंतर खरा धक्का बसतो. वाखरीमध्ये भेटलेला एक म्हातारा या भंग झालेल्या प्रतिमेला अधोरेखित करणारी संत तुकारामांची कथा त्यांना सांगतो आणि आयुष्याबद्दल तारतम्य आलेल्या एका खर्या वारकर्याची त्यांना ओळख पटते. पालखीत सोनोपंत दांडेकर, धर्मप्रसार करण्यासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी, जैतुनबाई सारख्या मुसलमान वारकरी बाई मोकाशींना भेटतात. फुगड्या, रिंगण यासारख्या विजोड प्रथांसोबत कृष्णलीला करणारे एक बोवाजींशीही मोकाशींची भेट होते. आणि हे पुस्तक पालखीचे दर्शन न राहता जीवनाच्या वारीचेच दर्शन होऊन जाते. मोकाशींच्या लेखणीला प्रिय असलेली संथ गती पुस्तकाला आहे. क्वचितच असलेला सौम्य विनोद पुस्तकाच्या प्रकृतीशी पूरक आहे.
इथे टंकावे लागेल. पण तरीही मला आवडलेला एक उतारा देतो.
"चित्रपटातला देखावा बदलावा तसा सगळा परिसर बदलला आहे. खडूसचा ओढा टाकला नि रस्ते सरळ आकाशापर्यंत धावत गेले आहेत. रस्त्याला वळण येतं ते सुद्धा केवढं पसरट! पालखीची दोन मैलांची मिरवणूक संपूर्ण दिसते आहे. इतकी लांब की डोळ्यांत मावत नाही. पावसानं काळपटलेल्या मातीवर स्त्रीपुरूषांची रंगीत रांग रांगोळीसारखी वाटत आहे.
रस्त्याच्या रुंदीत वारकरी आता मावत नाहीत. सासवडहून निघताना एका रांगेत चार वारकरी होते. आता बारापर्यंत गेले आहेत. उदार हातांनी माप भरावं तसं पालखीनं वारकर्यांचं माप पृथ्वीवर भरपेट ओतलेलं आहे. चालताना उभं राहणं जड जात आहे. बाजूच्या शेतांतून लगबगीनं वारकरी चालत आहेत. पालखी रंगात घुमू लागली आहे. खरं पाहता मी भाबडा झालो आहे. यातले खरे वारकरी किती, ढोंगी किती, आयुष्यभर दुसर्यांना लुबाडत राहून देव-देव करायला आलेले किती - असलं काही मनात येत नाही. तसंच, बाहेर स्पुटनिक उडताहेत, लढायांच्या तयार्या सुरू आहेत नि इथं हे काय चाललं आहे - असंही मनात येत नाही.
मी एकदम मागील काळात जातो. आत्ता आत्ता माणूस केवळ जगण्यासाठी एकमेकांना फाडून खात होता आणि आज इथं माझ्या डोळ्यांसमोर गुण्यागोविंदानं भजन म्हणत हजारो माणसं एकत्र चालली आहेत. केवढा भव्य देखावा हा! केवढी प्रगती ही!"
आता थोडेसे पुस्तकाच्या सजावटीविषयी. पुस्तकाचे लक्षवेधक मुखपृष्ठ आकर्षक आहे. शिवाय पुस्तकाच्या मलपृष्ठावरील आणि पुस्तकाच्या आतील रविमुकुल यांनी काढलेली वारकर्यांची रेखाचित्रे सुरेख आहेत. पुस्तकाच्या प्रारंभी असलेल्या मोकाशींच्या रेखाचित्रातून "किंचित कुरळे व उलटे फिरवलेले केस, स्नेहाळ डोळे, जाडसर जिवणी व गोलसर चेहरा ही प्रथमदर्शनी अनुकूल ग्रह करणारी" त्यांची आकृती समोर उभी राहते. पुस्तकासाठी वापरलेला कुरूकुरू वाजणारा कागदही उत्तम. त्यामुळे पुढील पानावरील अक्षरे मागील पानावर फारसा गोंधळ घालत नाहीत.
📖 १९६१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मौज प्रकाशनाच्या या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. किंमत १०० रुपये.