पंचपक्वानाचा असा होता "पेशवाई थाट"

 

 पंचपक्वानाचा असा होता "पेशवाई थाट" 


"पेशवाई थाट" शब्द ऍकल्याबरोबर आपणास नजरेपुढे येते राजेशाही जेवणाची पंगत नि पंचपक्वानाचे जेवण.आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन "पेशवाई थाट" असा सहज करतो. पण प्रत्यक्षात "पेशवाई थाट" एवढा सोपा नव्हता!
कसा होता "पेशवाई थाट"?

पेशवाईतील भोजन व्यवस्थेचा थाटमाट ...

    पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात . लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत .नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात.

पंचपक्वानाचा असा होता "पेशवाई थाट" ,Panchpakwana was like "Peshwai That

 पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत.त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात,कागदा सारख्या पातळ पाटवड्या , पुरणपोळ्या , रंगीबेरंगी मिठाया , भाज्या , चटण्या , कोशिंबिरी , केळीच्या पानावर वाढल्या जात.
पानाच्या बाजूला द्रोणात दूध , तूप ,ताक , दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे .
पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत . दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत.
वाड्यातील पंगत (पाट मांडून जेवणाची पद्धत) पेशवे काळात स्वयंपाक घराची पद्धत वेगळी होती. अन्नपूर्णेचा मिळालेला वरदहस्त आणि स्वयंपाक करणाऱ्यांचे ओतपोत भरलेले प्रेम.स्वयंपाकघराच्या भिंतीत कपाटे, ताकाचा खांब, चुलीजवळ खिडकी, घागरींचा कट्टा, गाडग्या उतरंडीचा कट्टा, पिंपाचा कट्टा, चुलीजवळ राख ठेवायला खड्डा, स्वयंपाक करताना चुलीतील गरम राख बाहेर काढत रहायचं अन त्या गरम राखेवर कायम दुध, भाजीचे पातेल ठेवायचे. त्यामुळे कुठल्याही वेळेला गरमागरम स्वयंपाक मिळायचा. चुळा भरायला पायावर पाणी घ्यायला कोपऱ्यात दगडी मोरी. स्वयंपाकघरातील ओला कचरा एका ठराविक ठिकाणी साठवला जाई. हया कचऱ्यावर केळी, अळू अशी पिके वाढवत असत.
 धूर कोंडू नये म्हणून छताला उजेड येण्यासाठी आणि चुलीचा धूर जाण्यासाठी सानं असतं. . लसूण खोबऱ्याची चटणी, दाण्याचे कुट, शेंगदाण्याची चटणी, बनवण्यासाठी उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई. 
अतिशय कलात्मकरित्या सजवलेल स्वयंपाकघर, बैठी जेवणाची बैठक व्यवस्था.जेवणाच्या पंगतीत एक शान असायची. जेवतांना चित्तवृत्ती प्रफुल्लित असावी म्हणून बसायला लाकडी पाट, जेवण्यासाठी समोर चौरंग. चौरंगावर तांब्या पितळेची ताटवाटी, ताटाच्या बाजूला तांब्या फुलपात्र, पाटाभोवती रांगोळी, उदबत्त्यांचा घमघमाट. कोनाड्यात लावलेले दिवे, पितळी समईच्या मंदप्रकाशाने वातावरण उजळून टाकले जाई. 
यजमानांनी वदनी कवळ घेता ची सुरुवात केली आणि सर्व अतिथीनी त्या आवाजात आवाज मिळवला की जेवणाला सुरवात झाली हे स्वयंपाकघरात कळायचे
सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाह प्रसंगी भोजन समयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली .
पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ , मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या , कोशिंबिरी , लोणची , पापड , भजी , कुरडया व खीर पुरण असे.मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या , आमट्या , सार , सांबार , व पक्वान्ने ,पानाच्या मध्यभागी पोळ्या , पुऱ्या व भाताचे प्रकार .
    ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान , दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण , पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट , चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी ) , पानात
१० भाज्या त्यात तोंडली , परवरे ( पडवळ ) , वांगी या भाज्या नित्य असत . तुरीचे वरण,२ प्रकारची सांबारे ,आमटी , १० प्रकारची लोणची ( त्यातील एक साखरेचे गोड ) असे.३-४ प्रकारच्या फेण्या , साधे वडे , वाटल्या डाळीचे कढीवडे , साजूक तूप , माध्यम गोड मठ्ठा , २ प्रकारच्या खिरी ( शेवयाची व गवल्याची ) ,
सपिठाच्या पूर्ण पोळ्या ( पुरण पोळ्या ) , खिचडी , ओले हरभरे , पापड , सांडगे , चिकवड्या , मिरगोंडे ( मिरगुंडे ) , फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या ,
२० प्रकारच्या कोशिंबिरी , फळभाज्या , पालेभाज्या , उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड , तळवडे , पंचामृत , रायती , ताकाची कढी , चाकवताचे सांबार , मसालेदार वांगी , सुरण , पांढरा भोपळा ,मेथी किंवा आंबाडीची भाजी , चटण्या , कोशिंबिरीत कोथिंबीर लसण  , आले , लाल मिरच्या , तीळ , जवस , कारले , आमसुले , हरभऱ्याची डाळ , लिंबे याचा वापर करीत .
तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे .
घीवर , आमरस , श्रीखंड.बासुंदी , केशरी साखरभात , जिलेबी लाडू , पुरणपोळी 
भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी  विडा दिला जाई . 
हे सर्व वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की,या जेवणावळीला  "पेशवाई थाट" का म्हणत असत.त्याकाळच्या भक्कम माणसाला असाच भक्कम आहार लागत असे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

______________________________________________


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম