दिवाळी : कृषिसंस्कृती परंपरेतील गवळण

 


दिवाळी : कृषिसंस्कृती परंपरेतील गवळण


दिवाळीला ग्रामीण भागात कृषिसंस्कृतीतील वेगवेगळे संकेत चिकटलेले आहेत आणि आजही त्या संकेतांचं पालन केलं जातं.गुरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुराखी खास गायी-गुरांना ओवाळतात. गुराढोरांना ओवाळण्यासाठी लव्हाळीच्या गवतांची दिवटी तयार केली जाते.

दिवाळी : कृषिसंस्कृती परंपरेतील गवळण
आधुनिकीकरणाचे वारे स्पर्शून जात असले तरी सणोत्सवात अस्सलपणा टिकून आहे.दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱया ‘गवळणीं’ची प्रथा ग्रामीण भागात अजूनही जोपासली जात आहे. शेणात हात घालण्यास नाक मुरडणारया  नव्या पिढीतील सुशिक्षित लेकी, सुना पण पंरपरा म्हणुन याकडे पाहत आहेत.ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱया या शेणाच्या गवळणी पाच दिवस घरासमोर  तयार करून कृषिसंस्कृती व लोकसंस्कृतीच्या या ऐतिहासिक ठेव्याची वयस्कर महिलांकडून जपणूक केली जात आहे.
दिवाळी : कृषिसंस्कृती परंपरेतील गवळण

दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱया गवळणी पूर्वी गावांमध्ये भरपूर गायी-म्हैशी असायच्या.त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशी दिवशी पहिली गवळण तयार केली जायची.दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी शेणापासूनच डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी करतात. तर पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव तयार करतात. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवित. लहान मुलीही त्यांना मदत करीत असत. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठय़ा कल्पकतेने या गवळणी बनवितात. छोटे शेणगोळे बनवून त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जातो. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाटनगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाते. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असे. पाचव्या दिवशी पांडव केले जात.अंगणाचा कोपरा शेणाने सारवण्यात येतो. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविण्यात येतो. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दाखविले जाते. बळीचं राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचं राज्य. कारण दिवाळी हा परंपरेनं चालत आलेला अनागर संस्कृतीतील कृषिउत्सवच आहे.दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव तो नंतर झाला आहे.काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचे तवे दाखवून भाकऱया करीत असलेले दाखविले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई.काही ठिकाणी गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवित.तर एक हात कमरेवरील घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरील घागरीवर धरलेल्या दाखवत.काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात. काही गवळणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गायीगुरे हिंडविताना दाखविल्या जायच्या. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱया गवळणी असत. डोंगर चढणाऱया, जेवण वाढणाऱया, ताक घुसळणाऱया अशा नानाप्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात. 

दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हशींचे पूजनही केले जाते. वर्षभर त्या शेतकर्‍याला दूध देत असल्याने कृतज्ञता त्याद्वारे व्यक्त केली जाते.घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांची तोरणं लावतात.अवघं घर फुलांनी सजवलं जातं.ग्रामीण भागातील फराळामध्ये सहसा चिवड्याचे विविध प्रकार, रव्याचे लाडू, करंजी(कानवले),चकली,चिवडा,अनारस,तयार केले जातात.

 थंडीच्या काळात येणारी दिवाळी शेतकऱयांच्या जीवनात आनंदमय वातावरण घेऊन येत असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीचा हंगाम सुरू होतो आणि खळय़ा दळय़ाची रास पुजून शेतकऱयाच्या हातांमध्ये पै-पैसा येतो. लक्ष्मीच्या रूपाने ऐन दीपावलीच्या दिवशी प्रकाशमय वातावरणात धार्मिक विधी म्हणून ’लक्ष्मीपूजन‘ केले जाते. 

ग्रामीण भागात आजही या गवळणीची परंपरा टिकुन आहे. 

-अनिल पाटील, पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম