न पेटणारी वानरांची लाकडं
हिवाळा आला की हुडहुडी भरते. झोंबणारा गार वारा अंगावर रोमांच उभे करतो.शहरी भागात नसले तरी खेडेगावात लोक शेकोटी पेटवतात. ही उबदार शेकोटी थंडीच्या दिवसात अनेकांना हवीहवीशी वाटते.तशीच माकडाना देखील हवीहवीशी वाटते.
माकडे जंगलातुन लाकडे गोळा करतात व त्यापासून उष्णता मिळवतात.पण प्रश्न असा आहे की माकडे ती लाकडे कशी पेटवत असतील? त्याकरिता "आगकाडी" तरी हवी.ती कुठुन पैदा करत असतील?. पण निसर्गाची किमया म्हणा किंवा आणखी काही म्हणा, माकडे लाकडे जमवुन ती एकावर एक ठेवून त्याभोवती माणसासारखी बसुन त्या शेकोटीची (न पेटवता! )ऊब मिळवतात ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे.विशेष म्हणजे या माकडानी ही शेकोटी करता वापरलेली लाकडे परत पेटत नाहीत हे विशेष.या बद्दल प्रसिद्ध जंगलतज्ञ, साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी त्यांचा हा अनुभव सांगितला आहे तो त्यांच्याच शब्दात 'ऐका
खरेतर ही नवलाईची गोष्ट आहे.वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. व न पेटलेल्या या शेकोटीभोवती अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली? याबद्दल जाणून घेतलं तेव्हा "वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात" यामुळे नंतर ती लाकडे निरूपयोगी होतात असं चित्तमपल्ली यांना आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीत लाकडे तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. चित्तमपल्ली यांनी ती लाकडे एका संशोधन संस्थेकडे पाठवली. त्यांनी त्या लाकडावर पेट्रोल, रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला पण ती लाकडे पेटली नाहीत.हे निसर्गाचे कोडे अजूनही विज्ञानाला सुटलेले नाही.