दिलखुलास व्यक्तिमत्व,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस चांदोलीचा"शामादा"
शामराव वक्टे अंबाईवाडी उखळु |
"शामादा" म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व, त्यांचे स्मितहास्य ही त्यांची ओळख. कमालीचा नम्रपणा, समोरील व्यक्तिचा वयोगट कुठलाही असो, पण त्याना वाटणाऱ्या आदरांचे प्रमाण हे नेहमी समानच. भरपूर उंची, प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि मधुर वाणी ही त्याच्यातील असलेली ठळक वैशिष्ट्य. या सर्व गोष्टींचा संयोग फारच मोजक्या लोकांमध्ये पाहण्यात येतो आणि अशाच काही लोकांमध्ये "शामराव वक्टे" पण येतात.शामादाला एकदा माणुस भेटला कि तो त्याचा मैतर झालाच म्हणुन समजा.समाजातील काही व्यक्तिमत्वही अशी असतात की, लांबून अंदाज बांधणे फार अवघड होते. मग उगाचच न बोलता एका शब्दाचाही संवाद न होता जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात. निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच आहे.चुकीचे वाटले तर जरुर समजावुन सांगणार.एखाद्या क्षणी त्यांच्या पध्दतीने व्यक्तही होणार.परंतू मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे."शामादाला" अख्खा चांदोली परिसर आोळखतो.कोणी आजारी असो, कोणाचे तटलेले काम असो, कि कधी मयताचं असो शामादाला हाक मारा न मारा मदतीला धावून येणारच असा स्वभाव.चांदोली धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्त असलेल्या लोंकाची सतत शासन दरबारी काही ना काही काम असते.अशिक्षित लोकांना काही कळत नसल्याने अर्ज असो वा कोणतेही काम प्रत्येकजण शामादाला काम सांगणार.मध्यंतरी शामादाने चारचाकी घेतली होती.या आडरानात वाहन मिळणे मुश्कील.कोल्हापूर, कराडला जायचे म्हटले की "आरळे" गाव गाठावे लागते.एखादी आडलेली बाई असो, किंवा आजारी माणुस असो.शामादा कोणालाच नाही न म्हणता पदरचे पेट्रोल टाकून दवाखान्यात नेणार.
(शामादाच्या अंगणातील झाडावरचे फणस) |
शामादा आणि माझी प्रथम भेट.२०१७ साली झाली.पहिल्यांदा मी चांदोलीला गेलो होतो सोबत बंडा सुर्यवंशी होता.त्याने मला प्रथम शामादाची अोळख करून दिली.चांदोलीच्या निसर्गरम्य परिसरातील "अंबाईवाडी" हे शामादाचे गांव.गाव तसं आडवळणी आहे.जवळच असणाऱ्या "अंबाईदेवीच्या" नावावरून या गावाला हे नाव पडले आहे.हे गाव अभयारण्य क्षेत्रात येते.शासनाकडुन दुर्लक्षित असणाऱ्या या गावात लोकसंख्या तशी कमीच.चांदोली धरणाच्या "उखळु"गावा पासुन वर डोंगरात असणाऱ्या या गावात जायचे म्हणजे जंगलातुन जायला लागायचे. आता काल परवा रस्ता झाला आहे.कोकणातल्या सारखी लांब लांब अंतरावर घरे सभोवती डोंगर,व अभयारण्य क्षेत्र शामादा राहत्याला घराकडे जायला धड रस्ताही नाही.शेताच्या बांधाबांधावरून वडयावघळीतनं चालत जायला लागतय.
(शामादाची आई चुलीवर भाकरी करताना) |
घरी शामादाची आई म्हणजे मुर्तिमंत वासल्याचे रूप.घरी गेल्यावर आदबीने पाहुणचार करणारी मावशी.(मी तिला मावशी म्हणतो) गेल्या बरोबर बसायला घोंगडे टाकुन पाणी देणार.विचारपुस करतच चुल पेटवुन आधणाला चहा ठेवणार. की लगेच हातात काळा चहा देणार.(येथे दुध मिळत नाही सगळीच काळा चहा पितात) अघळपघळ आदरातिथ्य, पाहुणचार त्यांच्याकडेही पाहायला मिळतं.शामादाचे वडील म्हणजे किती बोलु किती नको करणारे व्यक्तिमत्त्व.
(शामादाच्या अंगणातुन दिसणारा चांदोली अभयारण्य परिसर) |
मी उन्हाळ्यात शामादाच्या घरी गेलो होतो. आंब्या फणसाच्या दाट झाडीत त्याचे घर होते.सभोवती घराजवळच डोंगर,आोढा व शेतवडी.मी आलो म्हटल्यावर शामादाच्या वडिलांनी लगेच जेवणाची तयारी केली होती.पण बराच वकुत झाल्याने त्यांनी लगेच खुराडयातली कोंबडी तोडली.अघळपघळ गप्पा मारत आम्ही अंगणात चांदप्रकाशात बसलो होतो.दुरवर चांदोली धरणावरील लाईट दिसत होती. बोलण्यातुन समजले की येथुन जवळच छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांचा "प्रचितगड" जवळच आहे.मी लगेच शामादाला म्हटले की उदया आपण गड पाहायला जाऊ या का? तर तो म्हणाला, प्रचितगड आता धरणक्षेत्र अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने पुर्वी प्रमाणे जाता येत नाही.जायचे झाले तर खाली कोकणात संगमेश्वरला उतरून जावे लागेल, खुप मोठा पल्ला असल्याने मन खट्ट झाले.की लगेच मावशीची हाक आली जेवायला या म्हणुन.आत घरात गेल्यावर मावशीने ताटे वाढली.एकच घास खाल्ला, व्वा मावशीने काय जेवण केले होते म्हणुन सांगु. अप्रतिम चव होती.कोणताही मसाला न घालता केलेला कोंबडीचा रस्सा लाजबाब होता.मावशीच्या हाताला एवढी चव होती की फाईव्ह स्टार हॉटेलचे जेवण फिक्के पडेल.लालभडक रस्सा भरभरून वाटया पिलो.मावशीने हातावर गोल फिरवुन केलेली व चुलीच्या इंगळावरील मोठी खरपुस भाकरीची चव बेस्टच होती.
आम्ही चांदोलीला विशेषतः शामादाकडे जातो जंगल पहाणे म्हणजे केवळ वन्यप्राण्यांचे दर्शन इतकेच नसून हजारो वनस्पती ,फळझाडे, फुले, मळलेल्या पायवाटा,देवराई ,पाणथळ जागा आणि प्राण्यांचे पायाचे ठसे, छोटे छोटे कीटक, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा हा कधीही न संपणारा विषय आहे हे आम्हाला त्यावेळी समजले. संपूर्ण जंगलाचे अचूक वाचन करणारा शामादाचे लहानपणापासूनच या परिसरात भटकणाऱ्या शामादाचे व वन्यप्राण्यांचे जणू अतूट नातेच निर्माण झालेले आहे समाजातील वाडी वस्तीतील गरीब - गरजू लोकांना सर्वतोपरी मदत सहकार्य करणे हा या कुंटुबाचा स्थायी स्वभाव आहे. .
अधिकारी, मित्र मंडळी निसर्गप्रेमी यांच्यासोबत त्यांचा सततचा वावर असल्याने प्रत्येक वनस्पती ,प्राणी, कीटक यांची न अडखळता नाव सांगणारा हा अवलिया. रात्री-अपरात्री जंगलात भटकंती करताना आपण थोडे फार घाबरतो. परंतु शामाला परिसरातील कोणीही हाक मारूदे की आलाच मदतिला.चांदोली परिसरातील जंगलात शेकरू ,रानडुक्कर, गवा, घोणस, हरणटोळ, बिबट्यापासून ते पट्टेरी वाघाचे दर्शन आम्हाला घडवून आणणारा शामादा कोणता वन्यप्राणी कोणत्या परिसरात, केव्हा त्याचा वावर, किती वाजता पाणी पिण्यासाठी अथवा खाद्य शोधण्यासाठी येतो हे शामादा आजही सांगू शकतो. "शामादा" आता सोशल मिडीयावर पण असल्याने त्याची मित्रसंख्या वाढत आहे.
अशा या अगत्यशिल प्रेमळ शामादाच्या गावाकडे परत परत जाऊ वाटते.पण दोन वर्षे कोरोना मुळे जाता आले नाही.
-पत्रकार अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
30/04/2022