प्रति पंढरपूर : नंदवाळ
कोल्हापुर पासुन १४ कि. मी राधानगरी रोडवर वाशी गावाजवळ "नंदवाळ" गाव आहे. करविर महात्म्य मध्ये या गावाचा उल्लेख "नंदग्राम" म्हणुन येतो. नंदवाळचा प्राचीन उल्लेख नंदग्राम असा आहे. त्याजवळचे वासुदेवाचे गाव म्हणजे वाशी असेही मानले जाते.
या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासने साठी याठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय करवीर माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो. त्यामुळे या ठिकाणास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
या नंदवाळला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आधी नंदग्राम, नंतर नंदापूर व आज नंदवाळ अशी या नंदवाळ गावची ओळख. येथे विठ्ठलाचे देवस्थान अतिशय प्राचीन व प्रसिध्द आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून विठ्ठल, राई (सत्यभामा) व रखुमाबाई अशा तीन मूर्ती एकत्र असल्याने हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. मूळ मंदिर अतिशय प्राचीन हेमाडपंथी असून या मंदिराला अनेक शतकांचा इतिहास आहे.
द्वारकेचा राणा करवीरात का आला यांच्या दोन कथा हरिवंश पुराण आणि करवीर माहात्म्य ग्रंथात आहेत. हरिवंश पुराणाप्रमाणे भगवंत कालयवन वधासाठी कोल्हापूरात आले. तर करवीर माहात्म्या प्रमाणे एकदा कालयवन वधासाठी तर एकदा स्वस्त्रीयांच्या पापनिष्कृतीसाठी श्रीकृष्ण करवीरात आले. पुण्य पावन भीमा कात्यायनीच्या भीमाशंकरच्या पायापाशी प्रवाहित होत नंदवाळ ला येते.
कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या सगुण-निर्गुण विठुरायाचे चराचरात वास्तव्य आहे. क्षेत्र पंढरपूर तर जगविख्यात आहे पण फार कमी लोकांना विठ्ठलाचे मूळ स्थान असलेल्या नंदवाळची ख्याती माहिती आहे. पंढरपुरात येण्याआधी ३२ युगामाजी पांडुरंग आपल्या भक्त पुंडलिकासाठी येथेच अवतरला होता.पंढरपुरात विठ्ठल येण्याची जी कथा सांगितली जाते तीच घटना येथे सर्वात आधी घडली आणि पुन्हा पुंडलिक पंढरपुरात गेल्यावर त्याला दर्शन देण्यासाठी विठुरायांचे अवतरण पंढरपुरात झाले.
करवीर महात्म्यात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या नंदग्रामी अर्थात नंदापूर,(नंदवाळ) या ठिकाणी श्री कृष्ण आपले माता-पिता यशोदा-नंद यांबरोबर इथे वास्तव्यास होते त्यांचे लिलास्वरूप म्हणून इथे त्यांचे चरणकमल उमटले आहेत. कृष्ण येथे वास्तव्यास असल्याचे कळताच देवकी व वासुदेवही येथे आले ते स्थान म्हणजे "वाशी". येथे आजही वासुदेवाचे मंदिर आहे. रामावतारात वनवासात असताना राम-लक्ष्मण-सीता याठिकाणी आले. त्यांची कुटी आणि काही दगडी कुंपण आजही इथे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अगस्ति आणि लोपामुद्रा यांनी येथे त्रिरात्र वास्तव्य केले होते. नंदवाळ गावात हे विठ्ठलाचे जागृत मंदिर आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा या ३ मुर्त्या आहेत. मंदिराबाहेर श्री विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे.
नंदवाळ पासून पुढे काही अंतरावर भीमाशंकर मंदिर आहे.येथेच गुप्तरूपात भीमा नदीचा उगम झाला. हेच श्रीकृष्णाचे लिलाक्षेत्र... जवळच पुंडलिकाचे मंदीर आहे.
नंदवाळमध्ये आषाढी वारीच्या आदल्या दिवशी रात्री विठ्ठल भगवंत मुक्कामी असतात आणि ते आषाढी वारी दिवशी सकाळी पंढरपूरला जातात अशी आख्यायिका आहे. या ठिकाणाला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आषाढी एकादशीला या नंदवाळमध्ये ४ ते ५ लाख भाविकांचे पाय लागतात. सगळा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांच्या महापुराने ओसंडून वाहत असतो.
खर्या अर्थाने नंदवाळ हे प्रति पंढरी आहे. पंढरीला जे बघायला मिळते तेच इथे आहे. तशीच चंद्रभागा नदी आहे. (भीमाशंकर येथील गुप्त नदी) आत तलाव आणि मंदिर आहे. तसेच येथे स्वयंभू पिंडही आहे. या पिंडीला कान लावताच पाण्याचे नाद ऐकायला मिळतात, असे म्हटले जाते.
देवाच्या समोरच गावाच्या मध्यभागी पुंडलिकाचे मंदिर असून, प्राचीन काळातील पंढरपूरप्रमाणे येथेही गाईमूख आहे. त्याच्या समोर गोपाळ कृष्णाचे मंदिर आहे. या ठिकाणच्या नोंदी करवीर महात्म्यातही आहेत.
आषाढी एकादशीच्या अगोदर अंबाबाईच्या मंदिराची नगरप्रदक्षिणा करून दिंड्यांतून भाविक नंदवाळकडे रवाना होतात. याचा रिंगण सोहळा सकाळी ११ ते १ च्या दरम्यान पुईखडी येथे होतो. हा ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा असतो. या ठिकाणी पंचक्रोशीतील भजनी मंडळे, वारकरी, दिंड्या यांच्या स्वागतासाठी सपूर्ण गाव उत्सुक असतो. राधानगरी ते नंदवाळ व कोल्हापूर ते नंदवाळकडे येणार्या दिंड्यांना प्रसादाचे वाटप ठिकठिकाणी सेवा म्हणून केलेले असते.
विठ्ठल नामाच्या गजरात भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ मृदूंगाचा ठेका आणि देहभान विसरून तल्लीन झालेला वारकरी नंदवाळ येथे दाखल होतो. "जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम" सारख्या भजनांच्या तालावर जागोजागी महिला, वारकरी फुगडीचा फेरा धरतात. या उत्साही आणि चैतन्यमयी वातावरणात प्रति पंढरीत आषाढीचा सोहळा संपन्न होतो.
Tags
धार्मिक