क्राईम डायरी : काम फत्ते

 क्राईम डायरी  

काम फत्ते(?). 

रामा वॉचमन म्हणून एम. आय. डी. सी. मध्ये कामाला होता. दुपारी चारला कामावर आलेला आता रात्री 12 ला ड्युटी संपवून तो घरी जाण्याच्या गडबडीत होता.

‘सकाळी लवकर उठून नदीजवळ जनावरांसाठी वैरण आणायला जायला पाहिजे, नाहीतर 50 रुपये दंड भरावा लागेल’ या विचारातच तो होता. त्याने गाडी कंपनीतून बाहेर काढली. किक मारून तो गाडी घेऊन तो फाट्यापर्यंत आला. लघुशंकेसाठी त्याने गाडी थांबवली. रस्त्याच्या बाजूला तो गेला. आज रात्रीचा अंधार अधिकच दाटून आला होता. या रस्त्यावर वाटमारी होते हे तो ऐकून होता. त्यामुळे आपले आवरून तो निघणार एवढ्यात समोर त्याला काहीतरी दिसलं, तशी त्यानं गाडी सुरू करून गाडीचा लाईट त्यावर पाडला अन् तो दचकला. जवळ जावून बघतोय तर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
तो वाचमन म्हणून ड्युटी करत असल्याने व निवृत्त सैनिक असल्याने त्याने प्रथम जवळच्या पोलिस स्टेशनला फोन केला. घटनेची खबर मिळताच हावलदार ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. रामाकडून माहिती घेऊन त्याला जाऊ देण्यात आले. रामा गाडी चालवित होता. परंतु, त्याने पाहिलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
रात्र भरपूर झाल्यामुळे घटनेची खबर हावलदार ठोंबरेंनी वरिष्ठांना देऊन रात्रभर प्रेताजवळ पहारा दिला. सकाळीच फौजदार रोहिणी सुतार या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातच पावसानंही आज जोर धरला होता. दोन पंचासमक्ष पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टेमला पाठविण्यात आले. फौजदार सुतार यांनी मयताची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक कारखान्यात पोलिसांना पाठवून दिले. मात्र, प्रत्येकजण ही व्यक्ती आमच्याकडे नव्हतीच असेच सांगत होते. त्यामुळे मयताची ओळख पटणे कठीण झाले होते.
आता खून होऊन चार दिवस झाले तरी मयताची ओळख पटत नव्हती. वृत्तपत्रात बातमी व मयताचा फोटो दिल्यानंतर पाच दिवसांनी एक हॉटेल मालक फौजदार रोहिणी सुतार यांना भेटण्यास आला.
‘मॅडम, आज पेपरला आलेला मयताचा फोटो पाहून आलोय. त्याबरोबर पोलिसांनी त्याला बसण्यास खुर्ची दिली. आता बोला,’ या सुतार यांच्या वाक्याने तो पुढे बोलू लागला. ‘मॅडम, मयत तरुण हा माझ्या हॉटेलात कामाला होता. परंतु, चार दिवसांपासून तो कामालाच आला नाही. आता पेपरमध्ये फोटो बघून आलोय, मात्र तो कोठून आलाय हे माहीत नाही. बहुतेक तो बिहार भागातील असावा.’ ओळख पटत होती. मात्र बाकीचे धागेदोरे लागत नव्हते. मयताचे नाव रामनरेश होते. एम. आय. डी. सी. सोडून तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करत होता. मग इकडे कसा आला हा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलिसांनी एम. आय. डी. सी. मधील ज्या ज्या कारखान्यात परप्रांतीय कामगार आहेत तिथे चौकशी केली; परंतु काहीच धागा हाती लागत नव्हता. त्यामुळे मयत तरुण कुठला अन् त्याचा खून कोणी केला असावा? याचा अंदाजच फौजदार सुतार यांना येत नव्हता. एम. आय. डी. सी. मधील एकही परप्रांतीय तरुण मयत रामनरेशला ओळखत नव्हता.
आठवडा उलटला तरी मयत तरुणाची चौकशी करण्यासाठी कोणीच आले नव्हते. ज्या हॉटेलमध्ये तो काम करत होता तिथे पोलिसांनी तपास करण्याचा निर्णय घेतला. साध्या वेशामध्ये पोलिस हॉटेलमध्ये बसले होते. चार तास बसूनही हावलदार ठोंबरेंच्या हाती काहीच लागले नव्हते अन् अचानक काऊंटरजवळ ‘रामनरेश आया था क्या?’ असा प्रश्न हॉटेल मालकाला एक तरुण करत होता. त्याबरोबर हॉटेल मालकांनी पोलिसांना इशारा केला, त्याबरोबर बाजूला बसलेल्या चार पोलिसांनी त्या तरुणाला पकडले. पोलिस स्टेशनला आणून त्याची चौकशी सुरू केली.♍
‘मॅडम, हम बिहार से आये है, मैं गाँव गया था, लेकिन चार दिनसे रामनरेश नहीं मिला था, आज सुट्टी थी इसलिए मिलने आया था’ त्याच्याकडून माहिती घेऊन एक पथक बिहारला पाठविले. दुसर्या दिवशी बिहारहून आलेल्या नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देण्यात आले. बिहारमध्ये हावलदार ठोंबरेंनी कसून चौकशी केली. कारण गावठी कट्ट्यामधून गोळ्या झाडून रामनरेशचा खून करण्यात आला होता. त्यामुळे खुनी हे बिहारमधीलच असावेत, असा पोलिसांना संशय होता. मात्र बिहारमध्ये रामनरेशचे कुणाशी वैर नव्हते. मग मात्र खुनी हे एम. आय. डी. सी. विभागातीलच असावेत असा अंदाज बांधून पोलिसांनी बिहार सोडले. शिवाय बिहारमध्ये रामनरेशचे पोलिस रेकॉर्ड नव्हते. वेगवेगळ्या अँगलनी तपास करूनही पोलिसांना यश येत नव्हते. खून होऊन 12 दिवस उलटून गेले होते. त्यामुळे तपास लागणार की, रेंगाळणार असे प्रश्न वृत्तपत्रातून झळकत होते.
एम. आय. डी. सी. विभागात येणार्या प्रत्येक ट्रकवाला व कंपनीच्या कामगारापासून चहाच्या टपरीवाल्यापर्यंत कोणीच रामनरेशला ओळखत नव्हते. मग हा त्या माळावर कशासाठी अन् का गेला? हा प्रश्न सुटल्यास खुनाचा गुंता सुटणार होता. मात्र, हाच गुंता सुटत नव्हता.
20 व्या दिवशी मात्र पोलिसांना एक धागा मिळाला. मयत रामनरेश हा एका कंपनीत काम करणार्या कृष्णकुमारच्या घरी नेहमी जायचा. या खबरीने मात्र पोलिसांना संजीवनी मिळाली. पत्ता शोधत पोलिस कृष्णकुमारच्या घरी पोहोचले. दरवाजा ठोठावताच एका महिलेने दरवाजा उघडला. ‘मॅडम, आप रामनरेश को पहचानते हो क्या?’ या प्रश्नावर ती थोडीशी बावरली व ओळखत नाही असे उत्तर दिले. बाहेर अंगणात दोन लहान मुले खेळत होती. हावलदार ठोंबरेंशी गप्पा मारत तेथेच थांबले. हावलदार प्रकाश यांनी बाहेर अंगणात खेळणार्या मुलांकडे मोर्चा वळविला.
‘मुलांनो, रामनरेश काकांना ओळखता का?’ या प्रश्नावर दोन्ही मुलांनी मान हलवली अन् मग पोलिसांना हायसे वाटले. कृष्णकुमार घरी नव्हता. त्यामुळे पोलिस माघारी फिरले. रात्रीच्या वेळी पोलिस दबा धरून बसले. रात्री 12 च्या दरम्यान कृष्णकुमार घरी आला. पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली. मात्र ‘रामनरेश माझा मित्र होता, मी त्याचा खून का करू?’ हे पालूपद त्याने लावले होते. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. तरीसुद्धा कृृष्णकुमारच्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली.
एके दिवशी दुपारी दोघेजण कृष्णकुमारच्या घरी शिरले. हावलदार ठोंबरेंनी ताबडतोब फौजदार सुतार यांना माहिती दिली अन् ताबडतोब ठोंबरेंनी त्या दोघांना कृष्णकुमारच्या घरातच पकडले. पोलिस स्टेशनला आणून रामकुमार व प्रेमनाथला पोलिसांनी बदडून काढले.♍
मग मात्र पोलिसांचा मार असहाय्य झाल्यामुळे दोघांनी तोंड उघडले, ‘साल्याला आम्हीच मारलं मॅडम, गेला साला नाहीतर आणि कुणाच्यातरी बहिणीची अब्रू त्यानं लुटली असती मॅडम’ असे ते म्हणू लागले.
बिहारमधल्या एका खेड्यात आम्ही राहत होतो मॅडम, मी रामनरेश, रामकुमार व प्रेमनाथ असे तिघे मित्र होतो. त्यामुळे प्रत्येकाचे घरी नेहमी येणंजाणं असायचं. अशीच माझी (प्रेमनाथची) बहीण रानात-जंगलात जळण आणण्यासाठी गेली होती. मात्र त्या हरामखोर रामनरेशनं 12 वर्षांच्या माझ्या बहिणीची अबू्र लुटली मॅडम. जात पंचायतीमध्ये केस गेली. तीन महिने माझी बहीण अंथरुणाला खिळून होती. तिचं मन हरवलं होतं. जात पंचायतीनं त्याला गाव सोडण्यास सांगितलं, पण तो मुंबईला आला अन् या तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलात काम करू लागला. कृष्णकुमारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली होती. परंतु कृष्णकुमारला आम्ही काहीच कळू दिले नाही. त्या दिवशी आम्ही कृृष्णकुमारला भेटण्यासाठी आलो होतो. त्या दिवशी परत जाताना चौकातील एका लॉजमधून कृष्णकुमारची पत्नी व रामनरेशला बाहेर पडताना पाहिले अन् आम्ही निर्णय घेतला, ‘हा सुधारणार नाही.’ दुसर्या दिवशी गावाकडे जावून गावठी कट्टा आणला. हा रामनरेश कृृष्णकुमारच्या घरी वारंवार येणार हे आम्हाला माहीत होतं. एका मोटारसायकलवरून हा येत होता. रात्रीचा अंधार होता अन् त्या अंधारातच चाप ओढला. काम फत्ते झालं. मोटारसायकलवाला पळून गेला अन् आम्ही इथेच राहिलो.’ रितसर खटला चालून दोघांनाही शिक्षा झाली♍

. क्राईम डायरी  _  काम फत्ते(?)

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম