चित्रपटातील नक्षत्राचं लेणं-जयश्री गडकर

 चित्रपटातील नक्षत्राचं लेणं- जयश्री गडकर


 

जयश्री गडकरांचा जन्म मार्च २१, १९४२ रोजी सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी गावी, कारवार जिल्ह्यात (आताचा उत्तर कन्नड जिल्हा) झाला.शिक्षणाची आवड असूनही त्यांना फार शिक्षण घेता आले नाही.मुंबईला आलेनंतर ताल-सुरांचे उपजत ज्ञान होते आणि गळाही गोड होता. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या.
चित्रपटातील नक्षत्राचं लेणं- जयश्री गडकर

१९५० - १९५४ या काळात हौशी रंगभूमीवर कामे केली. याच काळात त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या. जयश्री गडकर यांनी सुरुवातीच्या काळात राजकमल कलामंदिरात नोकरी केली.
याच काळात व्ही. शांताराम यांना आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटासाठी एका समूहनृत्यात सहनर्तिका हव्या होत्या. संध्या या चित्रपटाची नायिका होत्या. व्ही. शांतारामसारखे दिग्दर्शक आणि सप्तरंगी हिंदी चित्रपट या आकर्षणामुळे त्यांनी या चित्रपटात समूहनृत्यातून आपली नृत्यकला सादर केली. या नृत्याने त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात एका नृत्यासाठी काम मिळाले. मात्र केवळ नृत्य करण्याइतकी भूमिका करायची नाही, असे त्यांनी या चित्रपटानंतर ठरवले. यानंतर ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना प्रथमच भूमिका मिळाली.व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला. . राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी सतत पुढेच पावले टाकली. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली.तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले.
नंतर ‘चेतना चित्र’चा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटात जयश्री गडकर यांनी तमासगिरिणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला सर्वात जास्त चालणारा चित्रपट ठरला. त्यातल्या ‘बुगडी माझी सांडली गं...’ या लावणी नृत्याने जयश्री गडकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून कायमचे स्थान मिळाले. चित्रपट रसिकांना ही लावणी अजूनही भुरळ घालते. पुण्यात विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १३२ आठवडे चालला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने. याच चित्रपटातल्या भूमिकेने जयश्रीबाईंना ‘रसरंग फाळके पुरस्कार’ मिळवून दिला. 
जयश्री गडकर चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा अनेकांना वाटत होते की, ही अपऱ्या नाकाची, साध्या सरळ भांगाची काकू म्हणूनच जमा होणारी पोरगी नायिका म्हणून प्रभाव तो काय पाडणार, पण जयश्री गडकर सुरुवातीपासूनच सहजी हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या कलाजीवनाची वाटचाल ‘रुपेरी’ होती, तितकीच ती ‘काटेरी’देखील होती. त्यांना अनंत यातना भोगाव्या लागल्या, पण कामावरच्या निष्ठेमुळे त्या त्यातून सहीसलामत  बाहेर पडल्या.
त्यांनी ‘सवाल माझा ऐका’, ‘साधी माणसं’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘घरकूल’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘पाटलाची सून’, ‘अवघाची संसार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ इ. महत्त्वाच्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. उपजत साधेपणा, सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनयातील सहजता यांमुळे या सर्व भूमिका एकापेक्षा एक सरस ठरल्या. चित्रपट क्षेत्रातल्या त्यांच्या लोकप्रियतेबरोबर याच चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले. १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानिनी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. 
१९७५ साली बाळ धुरी यांच्याशी विवाह केल्यावरदेखील त्यांनी चित्रपटातून भूमिका करणे सुरूच ठेवले. त्यांनी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’त त्या अशोककुमार यांच्या नायिका होत्या. ‘तुलसी विवाह’, ‘बलराम श्रीकृष्ण’, ‘किसान और भगवान’, ‘श्रीकृष्ण लीला’, ‘बजरंग बली’, ‘अमिरी-गरिबी’ अशा किती तरी हिंदी चित्रपटांतून त्यांनी लहान-मोठय़ा भूमिका साकारल्या. विविध प्रकारच्या पुरस्कारांनी हे ‘नक्षत्र लेणं’ विकसित झाले. चित्रपट रसिकांचे त्यांना भरभरून प्रेम लाभले.
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने गडकर यांनी तब्बल अर्धशतक मराठी मनावर राज्य केले. तमाशा प्रधान चित्रपटांपासून ते अगदी शहरी नायिकेपर्यंत आणि ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकेपासून पौराणिक देवदेवतांच्या भूमिकेपर्यंत त्यांच्या अभिनय प्रतिभेचा कॅनव्हास विस्तीर्ण होता. मराठीशिवाय हिंदी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. रंगभूमी आणि दूरदर्शनवरीलही त्यांच्या भूमिका गाजल्या. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 
आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५० चित्रपटांतून भूमिका केल्या. स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीचा सूड, स्त्रीची माया-ममता अशा सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर संवेदनशीलपणे जिवंत केले. याचबरोबर चित्रपट क्षेत्राशी निगडित असणार्‍या ध्वनी, संकलन, चित्रीकरण, प्रकाशयोजना या तांत्रिक बाबीही त्या शिकत गेल्या. हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तेलगू या भाषांतील चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय केला. शहरी तसेच ग्रामीण, मराठमोळ्या मराठी बोलीभाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. 
३० एप्रिल २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला. त्यापूर्वीही १९९८ साली ‘गदिमा पुरस्कार’, २००१ मध्ये ‘झी अल्फा गौरव पुरस्कार’, २००४ साली जनकवी पी. सावळाराम स्मरणार्थ ‘गंगाजमुना पुरस्कार’, २००५ मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अँड टीव्ही आर्टिेस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार यासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले.
२९ आॅगष्ट २००८ मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले. 
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম