नरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह मंदिर
सांगली जिल्ह्याच्या वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात नरसिंहपूर हे श्री नृसिंहाचे स्थान आहे.
इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात आडवे धरल्यामुळे नदीचे दोन प्रवाह निर्माण झाले व रामाचे आन्हिक निर्विघ्नपणे पार पडले! बहे या गावाचा ‘श्रीगुरुचरित्र’ पोथीत ‘बाहे’ असा उल्लेख आढळतो.
नरसिंहपूर येथील मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा शिलालेख भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर दगडात कोरलेला आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी एकावेळी एक व्यक्ती जाऊ शकेल असा वेडावाकडा मार्ग भुयारातून आहे. प्रत्यक्ष मूर्ती कृष्णा नदीच्या जलस्तरावर प्रतिष्ठित असून ती अखंड काळ्या शाळिग्रामामध्ये कोरलेली आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकशपूस आडवे घेतले असून त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्ती सुबक आहे. नृसिंहाच्या हातावरील रेषाही दृष्टीस पडतात. हिरण्यकशपूच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती आहे.
नृसिंहमूर्तीला ‘ज्वाला नृसिंह’ असे म्हणतात. भुयारात जेथे नृसिंहाची मूर्ती आहे त्याच्या वरील बाजूस तुळशी वृंदावन असून, खाली भुयारात जाता येत नाही असे वृद्ध, अशक्त भक्त वरून त्या तुळशीवृंदावनासमोर भुयारात असलेल्या मूर्तीला वंदन करतात. तुळशीवृंदावनातून निघालेला एक छोटा मार्ग मूर्तीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. तुळशीवृंदावनातील लहानशा मार्गातून भाविक वरून देवासमोर पैसे ठेवतात. तो मार्ग भिंतीत अशा तऱ्हेने तयार केला आहे, की वरून टाकलेले पैसे-सुपारी खाली नृसिंहाच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडतात!♍
Tags
धार्मिक