गावातील पिक्चर.(आठवण)


गावातील पिक्चर


फेसबुक लिंक https://bit.ly/3iFgk6m
 तो ७०-८० चा काळ होता. त्यावेळी करमणुकीची जेमतेमच साधनंअसायची.सिनेमा,नाटक,तमाशा,रेडिआो,सोंगी भजनं,नि सर्कस. पैकी सिनेमा म्हणजे लोंकाच्या उडया.त्यावेऌी मराठीत दादा कोंडके,अशोक सराफ,सुषमा शिरोमणी,निऌु फुले यांचे सिनेमे म्हणजे आमी हरकुन टुम्म व्हायचो. गावात सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाचा सण असायचा. या गणेशोत्सवाच्या दरम्यान मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम असायचे यापैकी  एक म्हणजे गल्लीत चित्रपट दाखवणे. हल्ली  पायलीला पन्नास चॅनल आणि त्यावरील विविधढंगी कार्यक्रम हे फावल्या वेळेचे मनोरंजनाचे साधन आहे..पण पुर्वी तसे नव्हते. या बाबतीत रेडिओ (नंतर दुरदर्शन) हाच  एकमेव सखा होता आणि तोही सर्वांना सहजसाध्य नव्हता. अशा परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवात दाखवण्यात येणार्या चित्रपटाचे खूप आकर्षक आणि कौतुक असायचे. जेवढे मंडळ मोठे तितका पिक्चर भारी, नवीन असायचा. याची तयारी गणपती आल्याआल्या सुरू व्हायची. मंडळातील वरिष्ठ लोक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पिक्चरच्या वाटाघाटी ठरवायची. एकदा का चित्रपट फायनल झाला का मग त्याची जाहिरात सुरू व्हायची....अमक्या दिवशी रात्री ठिक नऊ वाजता मस्त मराठी/हिंदी रंगीत चित्रपट अशी जाहीरात दिवसभर माईकवर कलकलायची. रंगीत पिक्चर हे त्या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्ट्य असायचे.कारण त्यावेळी बरेच चित्रपट हे ब्लॅक अँड व्हाईट असायचे. पिक्चरमधील कलाकारा पासून ते फायटिंग पर्यंत चर्चा रंगायची. त्यावेळी  फायटिंग हा चित्रपटांच्या यशस्वीततेचा निकष असायचा. एका मंडळाच्या तारखेनुसार दुसरी मंडळे तारखेचे नियोजन करायची. दहा दिवसांच्या या उत्सवात बरेच चित्रपट पहायला मिळायचे. प्रत्यक्ष पिक्चरदिवशी घरोघरी तयारी व्हायची. गुरांच्या धारा जरा लवकरच व्हायच्या. तिन्हीसांजेलाच चुली पेटायच्या.
गावातील पिक्चर.

     पिक्चरच्या तयारीचा महत्वाचा भाग म्हणजे पिचरची पेटी. मुक्कामाच्या
गावातील पिक्चर.(आठवण)

गाडीने पेटी गावात यायची.मंडळाची पोर आधीच एस टि स्टॅंडवर हजर असायची. शेवटची गाडी पेटीवाल्या माणसाला घेऊन यायची.  पेटीवाला गाडीतून उतरला की पोर एस. टी. वाल्याकडे मोठ्या कृतज्ञतेने बघायची. फिट पॅन्ट ,रंगीबेरंगी  शर्ट आणि पांढर्या रंगाची चप्पल हे सहज ओळखता येणार पेटीवाल्याच रूप असायचा.
गावातील पिक्चर.

पेटीवाला रुबाबात खाली उतरायचा. पोर त्याच्याभोवती जमायची. त्याच्या हातात एक अल्युमिनीयमची पेटी किंवा सुटकेस असायची आणि यातच पिक्चरचा खजिना असायचा. या पेटीलाच पिक्चरची पेटी म्हणायचे.  पेटी गावात आली आहे ही आनंदाची खबर संपुर्ण गावात वार्याच्या वेगाने पसरायची.  पेटी आली आहे अशी अधिकृत घोषणा लाऊडस्पीकर वरून व्हायची. पेटीवाल्याची सोय सोसायटीच्या ऑफिसात व्हायची. मंडळाचे कार्यकर्ते त्याच्या  पाहुणचारात रमायचे.
            बाजारात  किंवा मठातल्या मैदानात पांढराशुभ्र पडदा लावला जायचा. भुरभुर पडणार्या पावसाचा किंचित रागच यायचा........गाववाल्यांचा रागरंग बघून तोही थांबायचा. मंडळाच्या कार्यकर्तांच्या उत्साहाला भरत यायच ....आकडा टाकून किंवा कोणाच्यातरी घरून लाईटची व्यवस्था व्हायची. हाॅटेलातल्या टेबलाला मैदानात मध्यभागी उभा राहायचा मान मिळायचा.  माजघर आणि चुलीचा पोतारा आवरून आयाबाया पिक्चरच्या तयारीला लागायच्या. खाली अंथरायला जाजम, खताच रिकामे टिकं किंवा जूने पोते हाताशी घेतलं जायचं. छोट्या लेकरांना स्वेटर टोपी घालून तयार केल जायचं. अंगावर पांघरायला धोतराच धडप नाहीतर जुन दंडाच लुगड असायच. दाराच्या कड्याकुलपांची ओढून तपासणी होऊन सर्वजण पिक्चरच्या दिशेने निघायचे. गल्लीबोळातून माणसांचे लोंढे ठरलेल्या जागी जमायचे. योग्य ठिकाण आणि शेजारी बघून बसण्याची जागा फायनल व्हायची. जमलेल्या लोकांत गरीब-श्रीमंत,  लहान-मोठा, स्त्री-पुरूष असे भेदभाव नसायचे. वेगवेगळ्या जाती धर्माची सर्व मंडळी एकत्र यायची. लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेशोत्सवातील सामाजिक एकी गावकर्यात या पिक्चरच्या निमित्ताने बघायला मिळायची.   
        मधल्या वेळात मंडळाचा इतिहास माईकवरून ऐकविला जायचा. पेटीवाला मोठ्या तांत्रिकाच्या थाटात फोकसची आणि फिल्मच्या रिळाची अॅडजेसमेंट करायचा. मशीनमधून निघालेल्या फोकसच्या वाटेत हात, टाॅवेल अस काहीबाही मध्ये येऊन वेगवेगळ्या आकृत्या पडद्यावर दिसायच्या. मंडळाचे कार्यकर्ते हातातील बागायतदार टाॅवेलच शस्त्र करून उगीच मध्ये उभ राहणाराना खाली बसवून  शिस्त लावत. अंधारात दृष्टी कमी झाल्याने चेहर्याजवळ जाऊन निरखून बघून पोर मित्रांची ओळख पटवून आपपल्या ग्रुपमधी सामील व्हायची. आता दिवसाउजेडी लोक एकमेकांना पाहूनही तोंड वळवून निघून जातात....त्यावेळी अस नव्हत.पेटीची पुजा करून नारळ फोडणे ही उद्घाटनाची औपचारिकता असायची.उद्घाटनाचा मान मंडळांच्या अध्यक्षांना असायचा. माईकवरून अध्यक्षांना उद्घाटनाची विनंती व्हायची. गर्दीत बसलेली अध्यक्षांची मालकीण अभिमानाने लाजायची.अगरबत्तीच्या वासाने आणि नारळाच्या आवाजाने उद्घाटनाची घोषणा व्हायची.  सुरवातीला बाहेरच्या देशातील गव्हाच्या शेतीची किंवा अशीच काहीतरी ट्रायल रिळ असायची.... आणि शेवटी 7,6,...3,2,1 असे उलटे काऊंटडाऊन होउन मूळ पिक्चरला सुरूवात व्हायची.

गावातील पिक्चर
पिक्चरमधील फायटिंग बघून पोरसोर मुठी आवळायची. नव्या नांदत्या सासुरवाशीनी आशा काळेत स्वतःला बघायच्या..  ....तर निळू फुलेचा पडद्यावरील कपटीपणा बघून आयाबाया बोट मोडायच्या. पडद्यावरील देवाला सुध्दा हात जोडायचा निरागसपणा गाववाल्यात होता. पिक्चर ऐन रंगात आला असता अचानक व्यत्यय यायचा. गावातील कोणाचीतरी अडलेली म्हैस अथवा गाय व्यालेली असायची किंवा दावणीचे दावे तोडून पळालेली असायची. म्हशी किंवा गाईच्या मालकाचे नाव घेऊन त्यांला घरी जाण्याची सुचना मिळायची. म्हशीमुळे मालकाचे नाव चारचौघात निघायचे.या अवचित व्यत्ययानंतर पुन्हा नव्याने सारे पिक्चरच्या स्टोरीत शिरायचे. मोठ्या उत्साहाने आलेली लेकर मध्यानानंतर आईच्या मांडीवर झोपायची. अखेर बरीच भावनिक आंदोलने होऊन पिक्चर संपायचा. पेंगुळलेल्या डोळ्यानी आणि भरलेल्या मनानी माणसं घरी परतायची. ...हे मनोरंजनाचे टाॅनिक लोक मनात साठवायची......आता रिमोटच्या बटणावर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर मनोरंजनाची कितीतरी साधने आली, ऐशोरामी सुविधा असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटांची गर्दी उठलीय पण त्यावेळी मोकळ्या आकाशाखाली, खुला मैदानात बघितलेल्या पिक्चरची सर याला येत नाही...............गेले ते दिवस.

अजुन एक आठवण

मिलिटरी कॅम्पातला चित्रपट   

मी त्यावेळी टेंबलाईवाडीत राहत होतो.१९८२-८३ च्या सुमारास टेंबलाई टेकडी जवळच्या मिलिटरी कॅम्प मध्ये जवानासाठी दर शनिवारी रात्री १० वाजता चित्रपट दाखवत असत.

नंतर हा चित्रपट खुला करून फक्त एक रूपयात प्रेक्षकांना दाखवला जाऊ लागला.यासाठी चार दिवस अगोदर शनिवारी कोणता चित्रपट आहे हे समजण्यासाठी कॅम्पच्या दारात बोर्ड लावला जात असे.शनिवारी रात्री ९ पासुन कोणी चालत,कोणी सायकलवरून त्या शांत रात्री रस्त्यावर जाताना पाहायला मिळत.यामध्ये महिला वर्गाचा पण सामावेश असे.अवघा एक रूपया तिकीट असलयाने कोल्हापूरच्या उपनगरातुन चिक्कार प्रेक्षक येत असत.इकडे उचगाव,मुडशिंगी,टेंबलावाडी तर तिकडील रंकाळा,शिवाजी पेठ,मंगळवार पेठ,बावडा ते कळंबा भागातुन प्रेक्षक तो चित्रपट पाहायला येत.

रात्रीच्या शांत व शिस्तप्रिय मिलिटरी कॅम्प मधील वातावरण गंभीर असे,कोणी मवाल्याने दंगा केलाच तर फौज तयारच असे यामुळे हुल्लडबाजी नव्हतीच.टेकडयाच्या उतारावर पार खाली १७ एम एमचा पडदा तर वर फिल्म प्रोजेक्टर असे.महिला व पुरूषाकरिता विभागणी करून ताडपत्रीची बैठक व्यवस्था असे.

मुख्य चित्रपट मिलिटरीचे साहेब आल्यावर चालू होत असे.तोवर फिल्म डिविजनचे लहान चित्रपट दाखवत असे.

या कॅम्प मध्ये मी मेरा गाँव मेरा देश,देशप्रेमी,जिगरी दोस्त,अपनापन,दोस्ताना,सुळावरची पोळी,हिच खरी दौलत,दैवत,देवता असे कितीतरी चित्रपट पाहिले.

चित्रपट चालू असताना रिळ मध्येच तुटली तरी चित्रपटगृहात दंगा करणारे मवाली लोक येथे मात्र चुळबुळ करत शांत बसलेले असत,कारण सभोवती  मिलिटरी जवानाची दहशत असे.

रात्री १२ वाजता घाटगे पाटील कारखान्याचा भोंगा वाजण्याच्या सुमारास चित्रपट सुटत असे त्यावेळी रस्त्यावर बायाबापडे,मुले झोंबता वारा सहन करत,चित्रपटावर गप्पा मारत घर जवळ करीत असत.हिवाळयात तर काही जण थंडीपासून बचावासाठी चादरही आणत असत.

पण १९८६ च्या सुमारास कोणी मिलिटरीचा नवा साहेब बदलुन आला व हा खेळ बंद पडला तो कायमचाच.तोवर नुकतीच कोठे कोठे तुरळक घरावर भलेमोठे टीव्हीचे अॅंटेना दिसु लागले होते.मिलिटरी कॅम्पातल्या पाहिलेल्या त्या चित्रपटाची अजुन आठवण येते.

अनिल पाटील पेठवडगाव

9890875498 


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম