चक्रेश्‍वरवाडीचे प्राचीन शिवमंदिर

 चक्रेश्‍वरवाडीचे प्राचीन शिवमंदिर   

फेसबुक लिंक https://bit.ly/32OEKnr
दाजीपूर वन्यजीव अभयारण्य आणि विपूल निसर्ग सौंदर्य यामुळे प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्याला चक्रेश्‍वरवाडी येथील प्राचीन शिवमंदिरामुळे राज्याच्या  नकाशावर स्थान मिळाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरमाथ्यावर असणारे चक्रेश्‍वर मंदिर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. भोगावती नदीपासून नऊशे मीटरवर डोंगरावर असणार्‍या या देवस्थानाजवळ असणारी पवित्र पाण्याची गंगबाव हे आश्चर्यच असून हा डोंगरमाथा खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनाही खुणवत असतो.
चक्रेश्वरवाडी नाव कसे पडले?
राधानगरी तालुक्याला सह्याद्रीच्या डोंगररांगा लाभल्या आहेत. तालुक्याच्या पूर्वेकडे असणार्‍या डोंगरमाथ्यावर चक्रेश्‍वरवाडी ही सुमारे हजारभर लोकसंख्येची छोटीशी वाडी वसली आहे. मात्र या ठिकाणी असणार्‍या प्राचीन शिवमंदिरामुळे या वाडीला मोठे धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. या वाडीला चक्रेश्‍वरवाडी हे नाव कसे पडले? याबाबतची माहिती रंजक आहे. या गावाच्या प्रवेशद्वाराच्या पूर्वेला असणार्‍या टेकडीवर एक शिवमंदिर आहे. या मंदिरावर अनेकदा छत करूनही ते उध्वस्त होते अशी आख्यायिका आहे.
या मंदिराच्या परिसरात चक्राकार असलेले विशिष्ट आकारांचे शेकडो पाषाण आहेत. प्रत्येक पाषाणावर चक्राकार कोरीव आकार आहे. त्यावर ओम सारणी व कंकाळ अशी चक्रे आढळतात. त्यावरूनच या वाडीला चक्रेश्‍वरवाडी हे नाव पडले असावा अशी आख्याचिका आहे. या टेकडीच्या माथ्यावर सुमारे दहा बाय दहा  फूटांचा उंचवटा (शिळावर्तूळ) असून हे शिलावर्तूळ म्हणजे अश्मयुगातील सामुहिक दफनभूमी असावी असे संशोधकांचे मत आहे.
या टेकडीच्या उजव्या बाजूला गंगापूर माळ नावाचे शेत आहे. आजही येथे शेतीची मशागत करताना जुन्या काळातील दळणाचे जाते, फुटकी भांडी सापडतात. त्यामुळे या ठिकाणी पूर्वी एखादे नगर गाडलेले असावे असा संशोधकांचा अनुमान आहे. या ठिकाणी असणार्‍या शिलावर्तुळासारखी वर्तुळे नांदूरमध्यमेश्‍वर माहुरझरी व नागपूर परिसरासह राज्यात सुमारे दिडशे ठिकाणी आढळतात. त्यामुळे या टेकडीलाही प्राचीन इतिहास असल्याचे स्पष्ट होते.
प्रवेशद्वारावरच तीन नंदी गणेशमूर्ती
येथील चक्रेश्‍वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या समोर मोठी दीपमाळ तर उजव्या बाजूला गैबीचा दर्गा असून या दर्ग्यावरही छत राहत नाही. हा छोटासा दर्गा आजही पडक्या अवस्थेतच आहे. या दीपमाळेवर महाशिवरात्री दिवशी दीप पाजळले जातात. मंदिराचा उंबरठा ओलांडताच प्रवेशद्वारातच श्री. गणेशाची भव्य बैठी मूर्ती आहे. गणेशमूर्तीच्या बरोबर पाठीमागे एकमेकाला लागूनच बसलेल्या तीन नंदीच्या मूर्ती असून गणेशमूर्ती दीपमाळेकडे पहात आहे. तर तिन्ही नंदी मुख्य मंदिरातील शिवलिंगाकडे पहात आहेत. तीन नंदी असणारे हे एकमेव शिवमंदिर असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.
या तिन्ही नंदी समोरच गर्भगृह अथवा मुख्य गाभारा असून या गाभार्‍यात शिवलिंग रूपातील पिंडी आहे. या पिंडीवर पितळेचे मोठे मुखलिंग असून त्यावर नागमूर्ती आहे. गाभार्‍यासह त्याच्या पुढील भागात हेमाडपंथी शैलीचे कोरीव खांब त्यावर चक्रे व टप्प्याटप्प्यांचा मंडप आहे. येथील बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून ते खिद्रापूर येथील कोपेश्‍वर मंदिराशी मिळते जुळते आहे.
मंदिर १५ व्या शतकातील?
या मंदिराच्या निश्‍चित कालावधीतबद्दल मत मतांतरे आहेत. मात्र मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराच्या मंडपात एक शिलालेख आहे. त्यावर विक्रम सवत १४२९ म्हणजे इ. स. १४९९ अशी अक्षरे स्पष्ट दिसतात. मात्र या शिलालेखाचे पूर्ण वाचन करणारा उपलब्ध नाही. मंदिराच्या प्रवेशद्वार उंबरठ्यानजीकही काही अक्षरे कोरली आहेत. मात्र त्यांचा अर्थ लागत नाही. या मंदिराला प्रति करवीरही म्हटले जाते. कारण या मंदिरात महालक्ष्मी महाकाली व महासरस्वतीच्या पाषाणमूर्ती असून महालक्ष्मी मूर्ती कोल्हापुरच्या मंदिरातील मुर्तीप्रमाणे हुबेहुब आहे. याशिवाय मंदिरात सप्तमातृकाच्या मूर्ती आहेत. रंकभैरव, भैरवी, कार्तिकस्वामी, महाविष्णू, महिषासूर, मर्दिनी, नरसिंह या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या कोपर्‍यात भैरव मूर्ती असून ग्रामस्थ त्याला खोकलोबा म्हणतात.
चक्रेश्‍वराचे महत्व 
कोल्हापूरच्या अंबाबाई इतकेच असून करवीर क्षेत्राची प्रदक्षिणा करताना दक्षिण द्वाराच्या चक्रेश्‍वराचे दर्शन घ्यावे अशी आख्यायिका आहे. गाभार्‍यातील शिवलिंगामध्ये मानवी उत्कांतीतील सर्व टप्पे पहावयास मिळतात. सुरूवातीचे सयोगी शिवलिंग, मानूष लिंगयुक्त पिंडी, मुखलिंग आणि सद्याचे शिवलिंग असे प्रकार येथे आढळतात. मंदिर परिसरात विविध देवतांची छोटी मंदिरे असून येथे शिवलिंगासह विविध प्रकारच्या भग्न पाषाणमूर्ती आढळतात.
बोटावर उचलणारी दगडी गुंडी
या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. त्यादिवशी हजारो भाविक येतात. त्याशिवाय श्रावण सोमवार व अमावस्येदिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराच्या पूजा अर्चेचे काम सात घराण्यातील गुरव कुटूंबांकडेच आहे. ही गुरव मंडळी देवाची यथाविधी पूजा, अभिषेक करतात. या मंदिराच्या पुर्वेला ग्रामदैवताचा मांड आहे. या ठिकाणी असणारी सुमारे दिडशे किलो वजनाची दगडी गुंडी विज्ञानाला आव्हानच आहे. ही नवसाची गुंडी म्हणून ओळखली जाते. या गावातील जत्रेचा मांड जागवताना रंगपंचमी व धूलीवंदन अशा तीन वेळा गुंडी उचलण्याचा कार्यक्रम होतो. या ठिकाणी नवस बोलण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. नवस पूर्ण होणार असेल तर ही गुंडी पुजार्‍यासह पाच जणांच्या प्रत्येकी दोन अशा केवळ दहा बोटांवर अलगद दोन तीन फूटवर उचलली जाते. नवस पूर्ण होणार नसेल तर ही गुंडी जागेवरून हलतही नाही हे वैशिष्ट्य आहे.
मंदिर शिखरावर घुमट व अर्थचंद्राकृती

या मंदिराला ऐतिहासीक वारसाही आहे. हिंदूच्या प्रत्येक मंदिरावर कळस असतो. मात्र या मंदिरावर कळसाच्या जागी घुमटाकृती असून त्यावर अर्धचंद्राकृती आहे. एखाद्या  मशिदीवर असणार्‍या चिन्हासदृश्य ते आहेत. या गोष्टीचा उलगडा होत नाही. मात्र त्याबाबत पुढील आख्यायिका आहे. आौंरगजेब ने करवीरवर स्वारी केली असता तो हिंदू मंदिरे उध्वस्त करत होता.रांगणा किल्यावर जाताना त्याचा तळ मंदिरापासून चार पाच किलोमिटरवर तुरंबे येथे होता. त्यामुळे आौंरगजेब येऊन मंदिर उध्वस्त करेल अशी भिती होती. परिणामी मंदिराच्या रक्षणासाठी पुजार्‍यांने कळस काढून त्याजागी घुमटाकृती व त्यावर चंद्रकोर बसवली तसेच प्रवेशद्वाराशेजारी गैबीच्या छोट्याश्या दर्ग्याची स्थापना केली व मंदिराचे रक्षण केले अशी आख्यायिका आहे.
तपसा आणि प्राचीन गुहा
या मंदिराची नदी तळापासूनची उंची नऊशे मीटर आहे. मात्र एवढ्या उंचीवरही मंदिराशेजारीच गोड्या पाण्याची विहीर असून तेथे वर्षभर पाणी असते. हे वैशिष्ट्य आहे. पुर्वेकडील टेकडीवर ही गंगबाव नावाची विहीर असून तिच्या पाण्याचा रंग दरतीन वर्षांनी बदलतो. मात्र ही गंगबाव आता मूजत आली आहे. या शिवाय मंदिरापासून दोन किलोमिटरवर तपसा नावाचा पवित्र कुंड (कोडबाव) असून या कुंडात स्नान केल्यास चर्मरोग नाहिसे होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आजही महाशिवरात्रीच्यावेळी तपश्यावर पवित्र स्थानासाठी भाविकांची मध्यरात्रीपासून गर्दी असते. या तपशा जवळच एक प्राचीन गुहा आहे. या गुहेची वाट सात आठ किलो मीटरवर भोगावती नदीपर्यंत जाते असे म्हणतात. या गुहेवर संशोधन होणे गरजेचे आहे.
खगोलशास्त्राच्या अभ्यासाला संधी
मंदिराच्या पुर्वेला असणार्‍या शिखर टेकडीभोवती सर्वत्र चक्राकार पाषाण आढळतात. हे ठिकाण खगोलशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त आहे. येथील शिलावर्तुळावर उभे राहिले असता संपूर्ण अवकाशगोल दृष्टीपथात येऊन अदभूत अशा ब्रम्हशांतीचा अनुभव येतो. या ठिकाणी चार वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या खगोलशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पाहणीही केली होती. या ठिकाणी अवकाश निरीक्षण यंत्रणा उभारल्यास खगोल शास्त्र अभ्यासकांना पर्वणीच उपलब्ध होणार आहे.
मंदिराच्या विकासाचा श्रीगणेशा
या मंदिरापासून कोल्हापूर शहर ३५ किलोमीटरवर आहे. सकाळी १० वाजता रंकाळा कोल्हापूर बस स्थानकावरून थेट एसटी बस येते. कोल्हापूर गारगोटी मार्गावरून शेळेवाडी येथून तसेच कोल्हापूर राधानगरी मार्गावरून परिते फाटा येथून येण्यास वाहनांची सोय आहे. या मंदिराचा विकास रखडला होता. मात्र मंदिराचा आता ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश झाला असून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विविध विकास कामांना सुरूवात झाली असून मंदिराच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता विकास करण्याची ग्रामस्थ व भाविकांची मागणी आहे.

चक्रेश्‍वरवाडीचे प्राचीन शिवमंदिर



चक्रेश्‍वरवाडीचे प्राचीन शिवमंदिर
                    Linknewsindia link https://bit.ly/3brLY4C
                        फोटो: नामदेव कुसाळे सर
____

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম