श्रीमंत छत्रपती राजाराम कोल्हापूर

 श्रीमंत छत्रपती राजाराम कोल्हापूर 

(नागोजीराव पाटणकर)

फेसबुक लिंक http://bit.ly/3trAdT3
कोल्हापूर संस्थानात छ.शहाजी महाराज (तिसरे) उर्फ बुवा साहेब यांचा १८३८ मध्ये मृत्यु झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजी (तिसरे) हे गादीवर आले.त्यांना मुलगा नव्हता.त्यांचा कार्यकाळ २८ वर्षाचा होता.त्यांना मुलगा नव्हता म्हणून त्यांनी आपला भाचा (बहीण आऊबाई पाटणकर ह्यांचा मुलगा ) नागोजीराव पाटणकर (जन्म एप्रिल १३,१८५०) ह्यांना १ ऑगस्ट १८६६ रोजी दत्तक घेतले.तिसरे छ शिवाजी ४ ऑगस्ट१८६६ रोजी मृत्यू पावल्यानंतर ते "छत्रपति राजाराम" (दुसरे)ह्या नावाने गादीवर बसले.छत्रपति राजाराम अल्पवयीन असल्याने कोल्हापुरातील तकालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी. एस. ए. ऍंडरसन ह्यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट ह्यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक होऊन छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.त्यांनी संस्थानात शैक्षणिक,शेती विषयात विविध प्रयोग राबवुन उत्तेजन दिले.अंमल जरी इंग्रजाचा असला तरी रयतेला त्यांनी वारयावर सोडले नाही.१८७० मध्ये छत्रपतींनी इंग्लंडचा दौरा करण्याचे ठरविले. त्याला गवर्नर कडून संमति मिळाल्या वर छत्रपति स्वत:, कॅ.वेस्ट, पारसी शिक्षक आणि अन्य ११ जण असे इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले. १४ जूनला ते लंडनला पोहोचले आणि १ नोवेंबरला इंग्लंड सोडेपर्यंत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड मधील अनेक गावे आणि प्रेक्षणीय स्थळांना तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, क्यू गार्डन्स, वूलिच ऍकॅडमी, क्रिस्टल पॅलेस अशा शैक्षणिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.,दोनतीन वेळा पार्लमेंट मध्ये कामकाज पाहिले. स्वत: विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅडस्टन, डिजरेली अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला होता.स्थलदर्शनाचा प्रवास संपवून १ नोवेंबरला सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. पुढचा मुक्कम ब्रुसेल्स-वॉटर्लू असा झाला.तेथून कलोन ते फ्रॅंकफुर्ट ते म्यूनिक असे मुक्काम घेत घेत सर्वजण १३ नोव्हेबंरला इन्सब्रुकला पोहोचले.येथे आल्यानंतर छत्रपतींची तब्येत अचानक बिघडली.ते अशक्त झाले,चालता फिरता येईनासे झाले.अशाच परिस्थितीत प्रवासी वेनिसला पोहोचले आणि छत्रपतींनी खुर्चीतूनच तेथे डोजचा राजवाडा, सान मार्कोचा चौक अशा प्रेक्षणीय जागा पाहिल्या.पुढचा मुक्काम फ्लॉरेन्स येथे झाला.तेथील दोन इटालियन डॉक्टरकडून छत्रपतींची तपासणी झाली आणि त्यांच्या औषधांचा सुपरिणाम दिसत आहे असे वाटत असतांनाच ३० नोवेंबर १८७० ह्या दिवशी सकाळी छत्रपतींचे अचानक निधन झाले.झाले.आजाराचे निश्चित निदान अखेरपर्यंत झाले नाही.इंग्रज वकिलानी इटली सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांच्या दहनाची संमती मिळवली.व कश्शीना ह्या मैदानात,आर्नो नदीच्या काठी, जेथे तिला मुन्योने नावाची छोटी नदी येऊन मिळते,तेथे त्यांना हिंदू पध्दतीने दहन करण्यात आले.नंतर अस्थि गोळा करून कलशात घालून त्या हिंदुस्तानात आणल्या गेल्या आणि गंगा नदीत त्यांचे विधिवत् विसर्जन करण्यात आले.नंतर कोल्हापूर संस्थानात   छ राजाराम महाराजांचे फ्लॉरेन्समध्ये स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूरच्या प्रजाजनांकडून एक कोश निर्माण करण्यात आला आणि त्यामध्ये जमलेल्या पैशातून दहनाच्या जागी स्मारक उभारण्यात आले. त्याचा आराखडा मे. चार्ल्स मॅंट ह्या आर्किटेक्टने तयार केला.इंडो-सारासीनिक शैलीच्या छत्रीखाली अर्धपुतळा असे हे स्मारक आहे. अर्धपुतळा चार्ल्स फ्रान्सिस फुलर ह्या फ्लॉरेन्सवासी ब्रिटिश शिल्पकाराने बनविला आहे. तो छत्रपतींच्या इंग्लंडात काढलेल्या छायाचित्रा वरूनच बनविलेला आहे.
कोल्हापूरात असणारे "नागोजीराव पाटणकर हायस्कूल" त्यांच्या स्मारकाच्या रूपात ऊभे आहे.

अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
संदर्भ : https://books.google.ca/books?id=0yUyAQAAIAAJ&hl=en

Photo इटली येथील स्मारक

श्रीमंत छत्रपती राजाराम स्मारक इटली

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম