विठ्ठलाचे मुस्लिम वारकरी

 विठ्ठलाचे मुस्लिम वारकरी

संत शेख महमंद व मुस्लिम वारकरी   


सर्व महाराष्ट्री सुफी संतांमध्ये सर्वात जास्त प्रभाव मराठी मनावर अजूनही टीकून आहे तो शेख महंमद यांचा. शेख महंमद यांनी आपल्या सुफी कादरी परंपरेचा वारकरी संप्रदायाशी संयोग घडवून आणला आणि एक सुंदर अशी साहित्य निर्मिती झाली.   

विठ्ठलाचे मुस्लिम वारकरी
ज्ञानयाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेका’ अशी एक सुंदर म्हणच आहे.चांद बोधलेंचे दूसरे शिष्य म्हणजे शेख महंमद.

 शेख महंमद हे वारकरी संप्रदायातील संतकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण हे मुलत: सुफींच्या कादरी परंपरेतील आहेत. शेख महंमदांचे मुळ घराणे बीड जिल्ह्यातील धारूरचे. शेख महंमद यांच्या लिखाणात वारकरी संप्रदायातील अद्वैतमत, नाथ संप्रदायातील योगसाधना आणि सुफीमत असा तिन्हींचा संगम आहे. शेख महंमदांच्या रचनांचा अभ्यास वारकरी मंडळीत होत राहिलेला आहे. 

मुसलमानात होऊनिया पिरू ।

मराठियांत म्हणती सद्गुरू ।

तोचि तारील हा भवसागरू ।

येर बुडोन बुडविती ॥

अशा सुबोध प्रसादिक शब्दरचनेत आपले मनोगत शेख महंमदांनी मांडून ठेवले आहे. ज्ञानेश्वरांची तत्त्वज्ञान सांगण्याची परंपरा एकनाथांनी चालवली, नामदेवांच्या काव्यगुणांचा वारसा तुकारामांमध्ये सापडतो त्या प्रमाणेच कबीराच्या निर्गूणाची परंपरा शेख महंमद मध्ये आढळते.

शेख महंमदांनी आपल्या काळांतील मुसलमान राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे हिंदू मंदिरांचा विद्धंस केला त्यावर अतिशय परखडपणे कोरडे ओढले आहेत. ते लिहीतात


अनिवार पंढरी । अविनाश श्रीहरी ।

वाहीन अंतरी । व्यापुनि अलिप्त ॥

मूर्ती लपविल्या । अविंधी फोडिल्या ।

म्हणती दैना जाल्या । पंढरीच्या ॥

अढळ न ढळे । ब्रह्मादिकां न कळे ।

म्हणती आंधळे । देव फोडिले ॥

चराचरीं अविट । गुप्त ना प्रकट ।

ओळखावा निकट । ज्ञानचक्षे ॥

हरि जित ना मेे । आले ना ते गेले ।

हृदयांत रक्षिले । शेख महंमद ॥

या शेख महंमदांची समाधी श्रीगोंदा येथे आहे.

जून्या हैदराबाद संस्थानात गुलबर्गा रायचूर बीदर हे कर्नाटकातील तीन जिल्हे समाविष्ट होते. महाराष्ट्राला लागून असलेल्या या परिसरात बीदर येथील बादशहा शहा मुंतोजी ब्राह्मणी (इ.स. 1575-1650) हे ‘मृत्युंजय स्वामी’ या नावाने ओळखले जातात. हे कादरी परंपरेतील सुफी संत होत. 


शाह मुतबजी ब्रह्मणी ।

जिनमे नही मनामनी ।

पंचीकरण का खोज किये ।

हिंदू-मुसलमान येक कर दिये ॥


अशी त्यांची रचनाच प्रसिद्ध आहे. सुफी संतांचे महाराष्ट्रात विविध स्मृती स्थळे आहेत. त्या ठिकाणी उरूस भरतात. या दर्ग्यांमधून कव्वालीच्या रूपाने संगीत परंपरेचेही जतन केले जाते. ही पीरांची ठीकाणं हिंदूंचीही श्रद्धास्थळे आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज यांच्या बाबतीतच आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्र प्राप्तीसाठी शाह शरीफ दर्ग्यात नवस बोलला होता. हा दर्गा अहमद नगर येथील भिंगार परिसरात आहे. पुत्र झाल्यास त्याचे नाव पीरावरून ठेवले जाईल असा तो नवस होता. पुढे मालोजी राज्यांच्या पत्नी दीपाबाई यांच्या पोटी दोन पुत्र जन्मले. या दोघांची नावे शाह शरीफ दर्ग्याच्या नावावरून शाहजी आणि शरीफजी अशी ठेवण्यात आली. या दर्ग्याला उत्पन्नासाठी दोन गावे इनाम दिल्याची कागदपत्रे मराठा रिसायतीत सापडली आहेत. छत्रपती शाहूंपासूनची काही कागदपत्रेही उपलब्ध आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात. डोणगांव येथे समाधिस्त असलेले संत नुरूद्दीन हे महाराष्ट्रातील पहिले सुफी संत. संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. या जनार्दन स्वामींचे गुरू म्हणजे चांद बोधले. हे चांद बोधले सुफींच्या कादरी परंपरेतील होते. चांद बोधले हे सुफी परंपरेतील हिंदू संत. ते दत्तसंप्रदायी होते. वारकरी संत शेख महंमद यांचे वडिल राजे महंमद हे ग्वाल्हेरच्या कादरी परंपरेतील सुफी संत होते. हे राजे महंमद हे चांद बोधले यांचे गुरू. याच चांद बोधलेंचे दोन शिष्य म्हणजे संत जनार्दनस्वामी (संत एकनाथांचे गुरू) आणि शेख महंमद.

मुस्लिम संतकवी पंढरीच्या विठोबाच्या भक्तीरसात न्हावून गेल्याचे आपल्याला दिसते.

मिळे संतांची मंडळी, वाजे स्वानंदाची टाळी

किर्तनघोषाची आरोळी, पळे पळे पाहोनी भीमरथी

दक्षिणतीरीं, परब्रम्ह उभे विटेवरी कर ठेवोनि

कटांवरी, ध्यान दिगंबर साजिरें

धर्माने मुसलमान आणि संप्रदायाने महानुभाव असूनही मराठी जनमानसावर आपल्या चरित्रचारित्र्याचा आणि वाणीचा प्रभाव गाजवणारा संतकवी शहा मुनी यांनी पंढरीच्या विठुरायाचे केलेले हे वर्णन.

महानुभावापंथीयांचे पंढरी आणि पांडुरंगाविषयी असलेली गौणत्वाची भावना सर्वज्ञात असताना देखील शहा मुनींच्या मनातला प्रेम ठायी ठायी स्पष्ट झालेलं आहे. कलयुगात पापे फार झाल्यामुळे प्रभूने पंढरीची पेठ वसविली आणि त्या पेठेत होळी पेटवून तीत दोषांच्या गोव-या जाळल्या. पंढरी हा पापसागराला ग्रासून टाकणारा अगस्तीच आहे. किंवा भवसर्पाला छिन्नभिन्न करून टाकणारा गरुडच आहे, या शहा मुनीने केलेली भोवोत्कट प्रेरणेनेच वारकरी २१ व्या शतकातही पंढरीची पायवाट धरतात. मराठी संतमंडळीत ‘ मृत्युंजय ’ या नावाने ओळले जाणारे शहा मुंतोजी ब्रम्हणी हे मोठे मुस्लिम संतकवी होऊन गेले आहे. बिदर (कर्नाटक) येथे राजविलास भोगत असताना मुंतोजीच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी एक घटना घडली आणि वैभवाचा त्याग करून ते अरण्याच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना पंढरपुराकडे जाणारी दिंडी भेटली. दिंडीबरोबर पंढरपुरात गेल्यावर तिथं टाळ, मृदंग वीणा यांच्या तालावर अनेक वारकरी गात-नाचत होते. या सगळ्यांकडे पाहून शहा मुंतोजी ब्रम्हणीचे चित्त वैराग्याकडे सहज आकर्षिले गेले. मुंतोजीला भक्तीची दीक्षा पांडुरंगाच्या चरणी मिळाली. पंढरपुरात आल्यानंतर कसे वाटले याचे वर्णन त्याने असे केले... ‘ 

बिजे भाजुनी लाह्या करणे, तैसे आम्हा येणे जाणे. आकारासी नाही ठाव, देही प्रत्यक्ष दिसे देव ’ ..

मुंतोजी हा सूफी होता.हिंदू व मुसलमानी धर्मग्रंथातील तत्वे व विचार एकच आहेत, असे मुंतोजीने एका ग्रंथात लिहिले आहे. मुंतोजी यांनी ‘ स्वरूपसमाधान ’ , ‘ प्रकाशदीप ’ , ‘ सीताबोध ’ , ‘ पंचीकरण ’ सारखे अध्यात्मग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. टाळ मृदुंगाच्या तालावर एकरूप झालेले वैष्णव पाहून मुंतोजीच्या भक्तीची ही उन्मत्त अवस्थेचे आकर्षण वाटु लागते.

पंढरपूरला मुंतोजीला ‘ विवेकसिंधू ’ चे पुस्तक प्राप्त झाले. सहजानंदांनी गुरूपदेश केल्यावरमुंतोजीचे मृत्युंजय असे नाव ठेवले. ‘ 

अमुचा खुदा तो जगन्निवास, पंढरी नगरी विराजे ’ असे शहा मुंतोजीने पंढरीच्या विठोबाचा एके ठिकाणी वर्णन केला केला आहे. विवेकसिंधूद्वारे गुरूशास्त्र आणि सहजानंदासारखा सद्गुरू मुंतोजीला विठ्ठलाच्या कृपेनेच लाभला, असे त्याची चरीत्रकथा सांगते. विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आहे, ही मराठी संतांची श्रद्धा मृत्युंजयानेही स्वीकारली.ज्याच्या मुखी वेणू आहे, जो पांडवांचा साह्यकारी आहे, जो द्रौपदीचा कैवारी आहे, तोच आनंदमय परमात्मा पंढरीत नांदत आहे, त्याचीच सेवा मृत्युंजय करीत आहे. अशी पंढरीच्या विठ्ठलाची स्तूती त्याने केली आहे.

_______

पैठणमधील हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण वारीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या ह्या दर्ग्यामध्ये थांबतात.नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराज येथे २४ वर्ष वास्तव्याला होते.त्यांनी त्या काळात येथे नदीतून पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली.तो रांजण आजही ह्या ठिकाणी बघायला मिळतो.

संत तुकाराम महाराजांचे समकालीन असलेले अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथे श्री परमहंस महंमदखान महाराज हे मुस्लिम समाजातील वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले. ‘सृष्टीचा निर्माता एकच आहे’ या ठाम विश्वासातून महंमद महाराजांनी हिंदू-मुस्लिम धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळी केला.

आधुनिक काळातील मुस्लिम वारकरी

श्रद्धेपुढे धर्माची बंधनंही गळून पडतात. किंबहुना ज्या धर्मात जन्मलो त्याचं पालन करतानाच इतर धर्माच्या वाटेवर चालत आयुष्य अधिक प्रगल्भ करण्याचं कार्य काही व्यक्ती करत असतात. दौंड येथील बाबूमियाँ खान मनात जराही शंका न ठेवता मुक्त मनाने ते वारीत जातात.बाबूमियांच्या वारीला त्यांच्या कुटुंबीयांचीही भक्कम साथ आहे. नमाजच्या वेळेत ते असतील तेथेच नमाज पठण करतात. एकदा रमजानच्या काळातच वारी आली. तेव्हा वारीत सहभागी होत त्यांनी रोजा पाळला. तोंडी अभंग आणि मनात श्रद्धेचा गोडवा, घेऊन ते भक्तिभावाने पंढरिची वारी करतात.

मुस्लिम वारकरयांचा विचार करताना "जैतुनबी" यांचा उल्लेख अटळ आहे.बारामती जवळ असणाऱ्या "माळेगाव"च्या रहिवासी जैतुनबी या वयाच्या दहाव्या वर्षापासून विठुरायाच्या भक्तीत रंगुन गेल्या होत्या.जैतुनबी स्वत: मुस्लिम धर्माप्रमाणे आचरण करीत होत्या. नमाज पठण आणि रोजेही पाळत होत्या. पण पैगंबर आणि विठ्ठल यांत त्यांनी भेद केला नाही.जैतुनबी आक्का मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आल्या पण मुस्लिम असून त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि वारकरी संप्रदायाचा हा विचार स्वीकारून कीर्तनाच्या माध्यमातून गावागावांमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःची दिंडी काढली.

मुस्लिम संत वारकरी     संत शेख महमंद व मुस्लिम वारकरी
बाबूमियाँ खान
मुस्लिम संत वारकरी     संत शेख महमंद व मुस्लिम वारकरी
महेबूबशाह फकीर

मुस्लिम संत वारकरी     संत शेख महमंद व मुस्लिम वारकरी
जैतुनबी आक्का महाराज

मुस्लिम संत वारकरी     संत शेख महमंद व मुस्लिम वारकरी
ताजुद्दीन महाराज शेख

महेबूबशाह फकीर.हे एक सच्चे मुस्लिम असुनही पंढरीची वारी नित्य नियमाने करत आले आहेत. गजानन महाराज पालखी सोबत शेगाव ते पंढरपूर वारी करत दिंडीत भजन गात असतात.

याचबरोबर आजही  मुसलमान कीर्तनकार-भारुड, भजन गायक दररोज खांद्यावरती विणा घेऊन हा वारकरी संतांचा समतेचा विचार गावागावांमध्ये कीर्तन, भजन, भारताच्या माध्यमातून सांगत आहेत. ज्यामध्ये औरंगाबादचे ताजुद्दीन महाराज शेख, निफाडचे जलाल महाराज सय्यद, भारूडकार आमीन महाराज सय्यद, महम्मद महाराज, अत्तार महाराज हे मुसलमान कीर्तनकार आज समाजामध्ये प्रबोधन करीत आहेत. सातारा जिल्ह्यातले अकबर आबा कुशीकर यांचे भजन अत्यंत लोकप्रिय होतं. किर्तन आणि भजन ही त्यांची आवड होती.

अशी ही मुस्लिम वारकरयाची परंपरा असुन आज ताजुद्दीन महाराज सारखे वारकरी पुढे नेत आहेत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম