लाखमोलाचा संग्रह करणारे नाणी संग्राहक कुरुंदवाडचे अन्सार पटेल
__________________________________________
काही लोकांना कशाचे तरी वेड असते.असाच एक वेडा मला भेटला तोही कुरुंदवाड मध्ये. या वेडया माणसाचे नाव अन्सार पटेल.
मी व विक्रम धनवडे फिरत फिरत कुरुंदवाड मध्ये गेलो. जाताना शिरोळ येथील छ शिवाजी महाराज यांची गादी व व विठ्ठल मंदिर यांचे दर्शन घेतले.मग नरसेबावाडीत गेलो पण कोरोना मुळे मंदिर बंद होते. नंतर आौरवाड ( तत्कालिन नाव अमरजापुर) येथे गेलो तेही मंदिर बंद होते. मग डायरेक्ट अन्सार पटेल यांचे घर गाठले.
त्यांचे घर कुरुंदवाड गावाबाहेर कॉलेजरोडवर असुन नविन पध्दतीने बांधले आहे.
पाहुणचार झालेवर अन्सार पटेल यांनी आमच्या समोर अक्षरश: खजिना रिता केला.तरुणाने जगातील ७९ देशांची चलने आणि अंदाजे १००० हुन जास्त आहे प्रकारांपेक्षा जास्त नाणी जमा करून एक दुर्मिळ संग्रह तयार केला आहे. पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह कुरंदवाड येथील अन्सार पटेल यांनी केला आहे.महात्मा गांधी जन्मशताब्दी, योगाला आंतरराष्टीय दिन घोषित केल्यानंतर त्यावर्षी काढलेली २१ योग मुद्रा (नाणी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त काढलेले १२५ रुपयांचे नाणे, राष्टपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त काढलेली विशेष नाणी यांचादेखील त्यामध्ये समावेश आहे.
इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.तांब्याच्या नाण्याला दाम म्हणत, तर चांदीच्या नाण्याला ‘रुपया’ हे नाव दिले गेले. चांदीला संस्कृतमध्ये ‘रूप’ म्हणतात. म्हणून हा चांदीचा रुपया. या शब्दानेच आपले आजचे चलन ओळखले जाते. मोगलांच्या काळात ९ रुपयांची १ मोहोर होती. ५ मोहोरांचेसुद्धा नाणे होते. अकबराच्या नाण्यांत विविधता होती. त्यावर राजाचे, टांकसाळीचे नाव, हिजरी सन, कलिमा, चार खलिफांची नावे, ईश्वराचे मागितलेले आशीर्वाद होतेच; पण काही नाण्यांवर हिंदू देवताही होत्या. जहांगीरने तर १२ राशींची १२ नाणी काढली होती.
त्यांच्याकडे बौद्ध कालीन नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मीळ 'शिवराई' आणि 'सोन्याचा होन', तसेच पेशवे, होळकर, गायकवाड, शिंदे आणि इतर संस्थानांची नाणीही व नोटा संग्रही आहेत.
१८३५ पासूनचे ईस्ट इंडिया कंपनी तसंच विलियम्स, व्हिक्टोरिया सम्राज्ञी, एडवर्ड सातवा, पाचवा जॉर्ज, सहावा जॉर्ज, यांची तांब्याच्या पै पैशापासून आणा, चांदीचा रुपया तसंच स्वतंत्र भारताची सन १९५०पासून अर्धा आणा, एक आणा, एक पैसा ते २०१५ पर्यंतची नाणी संग्रही आहेत.
भारतात इंग्रजांचे राज्य असताना भारतात चालणारी सर्वांत मोठी नोट १० हजार रुपयांची होती. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा नव्या सरकारने १९४९ साली १० हजार रुपयांची नोट चलनात आणली. सोबतच पाच हजार रुपयांची नोटासुद्धा चलनात आणली होती.या नोटासुध्दा त्यांच्याकडे पाहावयास मिळाल्या. रिझर्व्ह बँकेचे वेगवेगळे गव्हर्नर यांचे दोन रुपये ते हजार रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या आकाराच्या अनेक जुन्या व नवीन नोटा तसंच भारत सरकारने छापलेल्या वेगवेगळ्या वित्त सचिवांच्या सह्या असलेल्या एक रुपयांच्या नोटाही संग्रही आहेत. जुन्या दुर्मीळ नाण्यांमधील विविधता, नाण्याचा आकार, वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली नाणी, टांकसाळीच्या चिन्हांबाबत नाण्यावर असलेली माहिती मनोरंजक आहे.
कुवैत, सौदी अरेबिया,पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, उत्तर कोरिया, चीन, बांगलादेश, दुबई, सोमालिया, इजिप्त, पेरू, पोलंड आदी एकूण ७९ देशांतील १२५ हून अधिक जुन्या नोटा व नाणी अन्सार पटेल यांचेकडे संग्रही आहेत.
आम्हाला त्यांनी केवळ दाखवली नाही तर हाताळण्यासाठी देखील दिली. अक्षरश: तीन तास कधी संपले हे कळले नाही.
याबद्दल बोलताना अन्सार पटेल म्हणाले,या सर्व जुन्या नाण्यांविषयी नवीन पिढीला माहिती आणि ज्ञान मिळावं यासाठी मला आता शाळा व कॉलेजमधून प्रदर्शन भरवायची आहेत. हा माझा खजिना म्हणजे माझ्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
नाणी नोटा शिवाय त्याच्यांकडे जुना ग्रामोफोन पाहावयास मिळाला. त्याचबरोबर त्यांच्याकडे जुनी घडयाळे,क्रित्येक संस्थानचे जुने सॅट्म्प दोन दोन दिवस प्रयत्न करूनही न उघडणारी कुलपे, आदी अॅण्टिक पीस आहेत. पण आमचेकडे जास्त वेळ नसल्याने पुढील वेळी निवांत येतो म्हणुन अन्सार पटेल यांचा आम्ही निरोप घेतला.
✍️अनिल पाटील, पेठ वडगाव
9890875498
__________________________
अन्सार पटेल |
अन्सार पटेल यांचा फोन नंबर
9881086012