शिरोळ येथील दत्तगुरूंचे भोजनपात्र मंदिर

 

शिरोळ येथील भोजनपात्र मंदिर

शिरोळ हे तालुक्याचे गाव.म्हटलं तर खेडेगाव म्हटलं तर निमशहरी गाव.या गावातुनच पुढे न्रंसिहवाडीला जावे लागते.गावात मध्यवर्ती ठिकाणी "श्री दत्त भोजनपात्र" आहे. 

शिरोळ येथील दत्तगुरूंचे भोजनपात्र मंदिर

शिरोळ पासुन ३ किमी वर नरसोबावाडी येथे नृसिंह सरस्वती बारा वर्षे वास्तव्याला होते. त्यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांच्या "पादुका" म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं वाडीचं दत्त मंदिर म्हणजे जीवाला शांती देणारे ठिकाणआहे. 

शिरोळ गावात शके १३६७ दरम्यान व्दितीय दत्तावतारी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज एकदा भिक्षेसाठी गेले होते. तेथे एक गंगाधर नामक दरिद्री ब्राम्हण राहात होता.त्याची भार्या (पत्नी) दत्तभक्त होती. त्यांच्या उद्धारासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेच्या हेतूने तेथे गेले. उजव्या हातात ब्रह्म, धेनू, नाग, शंख, आणि परशु मुद्रा या पांच मुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात भिक्षापात्र घेऊन, हळुहळू शांतपणे ब्राम्हणाच्या घरी गेले.  "ॐ३ऱ्हीं "असा उच्चार करून भिक्षेची मागणी केली. महाराजांचा तो शब्द ऐकल्यावर ती ब्राम्हण पत्नी घराबाहेर आली.तिने महाराजांचे स्वागत केले. श्री गुरूना ती म्हणाली कांडणे, दळणे, चूल पेटविणे, पाणी आणणे व केर काढणे या पांच कारणांनी घडणाऱ्या ज्या पांच हिंसा आहेत त्यांचा दोष घालविण्यासाठी वैश्वदेव केला पाहिजे. पण तो झाला नाही तथापि वैश्वदेवाकरितां वेगळे अन्न काढून आपणास भिक्षा वाढते. मी जोंधळ्याच्या (ज्वारीच्या) कण्या शिजविल्या आहेत पण घरात पत्रावळ सुद्धां नाही आपण क्षणभर थांबावे. मी लवकर पत्रावळी घेऊन येते ते साध्वीचे शब्द ऐकताच, श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली, पाण्यानी धुवून स्वच्छ करून ठेवली, त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले. त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली. तिच्यामध्ये ॐकार युक्त आठ पाकळ्यांचे कमळ काढले व ब्राम्हणीला म्हणाले, या पात्रात भिक्षा वाढा.सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रात जोंधळ्याच्या कण्या वाढल्या. अपोशन घेऊन संन्यासीरूपात आलेल्या साक्षात भगवान श्री दत्तात्रेयानी पात्रात वाढलेल्या कण्या खाण्यास प्रारंभ केला. श्रीहरी भिक्षा भक्षण करून तृप्त झाले. त्यांनी हात-पाय धुतले. आचमन केले व तेथेच ते अंतर्धात पावले. 

शिरोळ येथील दत्तगुरूंचे भोजनपात्र मंदिर

     दत्तप्रभुंची बोटे उमटली

नंतर काही वेळाने त्या साध्वीचे पति घरी आला असता, तिने सर्व वृत्तांत सांगितला.पाहतात तो काय, त्या पात्रावर भगवान दत्तप्रभुंची बोटे उमटलेली होती. ते महाशिळापात्र पाहतांच प्रत्यक्ष श्रीदत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना आनंद झाला. तरीपण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही म्हणून तो ब्राम्हण कष्टी झाला.  माझ्या पत्नीवर ईश्वराची कृपा झाली. मला जरी ईश्वर दर्शन घडले नाही तरी माझ्या पत्नीला भगवान दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यामुळे मी सुद्धा तिच्या योगाने धन्य झालो.असे म्हणुन त्या ब्राम्हणाने दररोज आपल्या घरी त्या भोजनपात्राची पूजा केली व कृतकृत्य झाले. तेच हे भोजनपात्र मंदिर. श्री दत्तात्रेयानी आपल्या हाताची शंक, चक्र, पद्य चिन्हानी युक्त अशी पाच बोटे उमटविली ती आजही पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. अगोदर हे मंदिर लहान स्वरूपाचे होते.त्यावेळी हे भिक्षापात्राचे सहज दर्शन घडत होते. 

शिरोळ येथील दत्तगुरूंचे भोजनपात्र मंदिर
काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असुन आता भव्य असे मंदिर बांधले आहे.सध्या हे भिक्षापात्र मंदिराच्या गाभाऱ्यात असुन लहान घुमटीतुन दर्शन घ्यावे लागते. नरसोबावाडीला कधी गेला तर अवश्य या मंदिराला भेट दया.
व्हिडिओ पहा 👇
 


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম