मी पाहिलेल्या ग्रामीण भागातील एक लग्न.
"अक्षताची वेळ जवळ आली आहे "
मुलीचे मामा! मुलीचे मामा कुठे आहेत?त्यांनी ताबडतोब स्टेजवर या.
"लग्नमंडपात वधुचे मामा वराचे मामा वधु वरांना लवकरात लवकर लग्नमंडपात घेवुन येणे मुहुर्ताची वेळ जवळ आली आहे" भटजींचा सारखा गजर चालु होता.वेळ पुढं घड्याळ्याचा काटा पुढं सरकल तसा भटजींचा चढत्या पटीतला आवाज ऐकायला यायचा.मांडव गर्दीनं खचाखच भरलेला .अक्षताच्या पाट्या घेवुन भावकीतली पोरं ,मित्र,अक्षता वाटत होते .कुरवल्यांच्या घोळक्यासोबत मुलीचे मामा मुलाचे मामा वधु वरांना घेवुन आले की लगेच भटजी विधिवत कार्यक्रम उरकून घेवुन अंतर पाट धरायचे.सुरवात व्हायची मंगलाष्टकेला.एक मंगलाष्टका पुर्ण होते ना होते तोच दुसरा कोणीतरी मध्येच त्यांची पाठ असलेली मंगलाष्टका म्हणायला सुरवात करायचा.,लगेच दुसरा ,तिसरा,पुन्हा पहिला,चढाओढ चालायची म्हणायची...वेगवेगळ्या चालीतल्या मंगलअष्टका ऐकुन मनोरंजन व्हायचं.आमचं लक्ष मात्र"वाजंत्री बहुगलबलाट"कधी करत्यात आणि कधी एकदाची हातात दाबुन धरलेली अक्षताची मुठ ताकदीनं पुढं उभारलेल्याच्या डोक्यावर मारीन आणि जेवणाच्या पंक्तीकडं पळीन याकडे असायचं. झुंबड उडायची लोकांची पंक्तीला बसायला.जेवण उरकुन कुठंतर झाडाची सावली बघून आडवं व्हावं हा विचार असायचा.
लग्न उरकलं जेवणंखानं झाली की माघारी फिरायची तयारी चालु व्हायची.अनॉउन्स केला जायचा.."व-हाडाचा ट्रॅक्टर लागलेला आहे व-हाडी मंडळींनी लवकर बसुन घ्यावं.पाहुण्या पै च्यात गेलीली मंडळी लगबगीनं ट्रॅक्टर कडं जायची.ट्रॅक्टर गेला की एस टी भाडं कुणी भरा हा अर्थिक विचार डोक्यात असायचा.
पण करवलं आणि कुरवल्या मात्र नवीन जोडप्याच्या अवतीभोवती कोंडाळं करुन उभी होती. त्यांचा एकच हेका असायचा "नाव घ्या".मग एखाद्या करवलीनं नवरा नवरी च्या कानाला लागायचं ,खुदकन हसुन बाजुला व्हायचं ,नवरीनं लाजत लाजत...रावांची झाले मी वगैरे वगैरे यमक जोडायचं आणि नाव घ्यायचं. मग नवरयाची पाळी. नव-यानं उगा धीटपणाचा आव आणुन नाव घेतलंं, आम्हीमाळावर खेळत होतो क्रिकेट " ....."पाहुन पडली माझी विकेट... झाला उखाणा..संपली उत्सुकता.
असाच एक भन्नाट आणि भाबड्या उखाणाची आठवण होते.गल्लीतल्या पक्याचं लग्न ठरलं,पक्या सकाळ उठल्यापासुन रात्री झोपेपर्यत आपल्या कामात व्यस्त राहणारा..मोजकच मित्र ,मोजकाच संवाद,आपलं काम भलं नी आपण भलं या विचारांचा चेष्टामस्करी मर्यादेतच ...मनाचा साफ.पक्याच्या लग्नात पोरांनी हिरीरीनं सहभाग घेतला.नदीचं पाणी भरणं ,मंडपाची जागा झाडूनझुडून साफ करणं...सांगावं लागलं नाही आम्हाला.गावदेव साधाच काढला.पक्या आतुन भलताच खुश झालेला.देहबोलीतुन समजत होतं.लग्नाचा दिवस उजाडला.व-हाड आलं.आल्या आल्या सगळी व-हाडी बघायला गेली.भावकीत घरटी पाहुणा असलेल्या गावचं व-हाड.नातेसंबधाची मुळं खोलवर रुजलेली.लग्नाची वेळ जवळ आली.अक्षता पडल्या.आता बारी होती नाव घ्यायची "उखाणा".पक्या पहिलाच लाजरा बुजरा.त्यात आज मुंडावळ्या बांधुन,सगळ्यांच लक्ष त्याच्याकडचं त्यामुळं आणखीणच लाजुन चुर झालेला.दोघं चौघं जरी असली तरी मोजुन मापुन बोलणारा हा गडी आज सगळ्यासमोर नाव घ्याव लागणार म्हणल्यावर जरा दबावात आलेला.पहिल्यांदा नावच घेणार म्हणून अडून बसला.पण कूरवल्या काय केल्या ऐकेनात..भावजी नाव घ्या भावजी ,नाव घेतलच पाहिजे..त्याशिवाय आम्ही हलणारच नाही,पक्या भलताच गोंधळला,कावरा बावरा झाला..या अशा गोड आर्जवाची माउलीला सवय नव्हती.आणि आज अचानक गोडपणा उतु जायला लागलेला.तसा लग्नांत उखाणा घेतलाच पाहिजे ईथपर्यत त्याला माहिती होतीच.पक्या उखाणा घेणार आहे हि बातमी मंडपात लगोलग पसरली.आम्हाला पण उत्सुकता लागली.आम्ही पक्याच्या शेजारी उभा राहीलो.नवरीनं उखाणा घेतला.आता बारी पक्याची होती.मंडपाचं सगळं लक्ष पक्याकटं लागलं.मंडपाच कान सुपाएवढं झालं.पण पक्याला उखाणा येतोय कुठं कुणीतरी शिकवायला पाहीजे.मग भावकीतली एक मुलीनं कानात जावुन एक उखाणा सांगितला.पक्यानं गडबडीनं बोलुन पण दाखविला.नवरीकडच्या मुलींना उखाणा एकायला आला नाही आणि पहिल्यांदा येत पण नसतो.नवरदेवाकडुन पुन्हा पुन्हा तोच तोच उखाणा ऐकून घेण्यात त्यांना आसुरी आनंदच मिळत असावा.त्या मुलींनी पक्याला पुन्हा तोच उखाणा घ्यायला सांगितला.पक्या गडबडला,..ठार विसरला.यमक जुळवता जुळवता नाकी नऊ आलं.त्याचा मित्र एकनाथनं पुढाकार घेत एकदम सोप्पा उखाणा जो प्रत्येक लग्नात घेतलाच जायचा असा निवडला आणि पक्याला सांगितला.पक्याला थोडसं हायसं वाटलं.आता आपली सुटका होते या झंजटातुन म्हणून तोंडपाठ केला आणि नाजुक हसत म्हणाला"ह्य बघा मी आत्ता एकदाच नाव घेणार हाय कुणाला एकायला आलं तर बर नाय आलं तर पुन्हा घेणार नाय "एकनाथानं वारंवार पक्याला सांगुन सांगुन उखाणा तोंडपाठ केलेला.ऐकायला न येण्यावर कुणीतरी तोडगा काढला आणि माईक आणायला सांगितला.हे बरं झालं.मजी पुन्हा कुणी म्हणाय नको मंडपात येवुन "आरं आमी ऐकलच नाय नाव घे पुन्हा".
माईक आला ,मंडप आतुर झाला ,पक्या सज्ज झाला.कुरवल्यांचा घोळका पक्याकडं बघायला लागला.एक दिर्घ श्वास घेत पक्यानं उखाणा घ्यायला सुरवात केली.
"भाजीत भाजी मेथीची 'टिंबा टिंबा माझ्या प्रीतीची".ऐकणारी क्षणभर स्तब्ध झाली.माईक झटपट बंद केला.कुणालाच काही समजना.ज्यानं उखाणा शिकवला तो एकनाथ पोट धरुन हसायला लागला.टिंब टिंबाचा गाळलेल्या जागेचा प्रकार माझ्याही लक्षात आला .चावी दिल्यासारखं मलाही हसु फुटलं...हसत हसतच एकनाथाला विचारलं "आरं एकनाथा हि काय हाय भानगड टिंब टिंबाची"
एकनाथ म्हणला आता काय सांगु तुला...टिंबा टिंबा च्या जाग्यावर ह्यनं वहिनंच नाव घालायच..."एकनाथ बोलता बोलता थांबला फक्त हसतच होता.त्याचही बरोबरच होतं नाव त्यानं कसं घ्यायचं नाव घेणाऱ्याला तर शिकवायचं चाललेलं. मंडप हसत होता.पक्या पारच गोंधळुन गेलेला.त्याला नेमकं काय झालय ते कळायला मार्ग नव्हता.कुरवल्या पण गायब झालेल्या. पुढं पुढं करणाऱ्या जीपतल्या पुढल्या सीटवर बसलेल्या.झाला प्रकार पक्याच्याही लक्षात आलेला."मग त्यला काय हुतय नाव घेतल की झालं की"म्हणून एकदाचा मोकळा झाला.उखाणा "नावाविना"रिक्तच राहीलेला.
गावाकडलं लग्न म्हणलं की रुसवं फुगवं ,देणं घेणं,मानपान,गंमतीजंमती,व-हाडाचा ट्रॅक्टर,ट्रॅक्टर शेजारुन जाणारा दुसरा व-हाचा ट्रक,फाळक्यावर बसलेलो आम्ही जाणाऱ्या ट्रकातल्या फाळक्यावरल्या बसलेल्यांना केलेलं हातवारं, प्रत्युत्यरादाखल त्यनी केलेलां हातवारं,पोरांनी फस्त केलेल्या ट्रकातल्या फराळ्यांच्या करंड्या.यासह ईतर गोष्टीची आणि वर्तमानातील लग्नाची बरोबरी करताना एक गोष्ट लक्षात येते.धावपळीचं जीवन,घरोघरी मोटरसायकल,वेळेचा अभाव,दैनंदिन कामांची मोठी यादी,ट्रकमधी जागाच जागा,लग्नाला या म्हणून घाईगडबडीत जाता जाता केलेल्या हातवा-याला केवळ हात दाखवण्याची पद्धत,जेवण संपल्यावर मोकळा होणारा हॉल,हॉल मध्ये नाईलाजानाचं या ठिकाणी अंतरपाटासमोर मी उभा असतो म्हणून अक्षता टाकणारा एखादा वन साईड पेपरसारखी गत झालेला तरुण,चित्रच वेगळं होतं ग्रामीण भाग गतीमान होत चाललाय.पक्याच्या भाबड्या उखाण्याची जागा आता टिव्हि मालिकेतील उखाण्यांनी घेतलीय. वाढप्याच्या भुमिकेत असणाऱ्या मित्रपरिवाराची जागा आता कंत्राटी कामगारांनी घेतल्या. पहिला जिव्हाळा लोप पावत चाललाय..उरलीय फक्त औपचारिकता.
कोरा लिंक : http://bit.ly/3dpQYso
Anil patil यांनी दिलेले उत्तर