आडनाव ही आपली ओळख आहे, तर कसे पडतात आडनाव?

 आडनाव ही आपली ओळख आहे, तर कसे पडतात आडनाव?

मुळात ‘सरनेम’ या इंग्रजी शब्दासाठी ‘आडनाव’ हा शब्द कसा आला असावा? की आडनावावरून सरनेम आलं? मला वाटतं, दोन्ही शब्द स्वतंत्रपणेच आले असावेत. कारण हे दोन्ही शब्द एकमेकांशी सुसंगत नाहीत. पण आडनावाचा अन्वयार्थ लक्षात घेता सरनेम हा शब्द जितका चपखल वाटतो तितका आडनाव हा शब्द योग्य वाटत नाही. मराठीत आड म्हणजे विहीर. आड वाट, आड वळण, आड बाजूला अशा आड या शब्दाच्या छटा लक्षात घेतल्या, तर आड हा शब्द मराठीत सकारात्मकदृष्टय़ा वापरला जातो असं म्हणता येत नाही. मग जे कुटुंबाचं नाव सांगायचंय ते असं ‘आड’वळणाने का?

आडनाव ही आपली ओळख आहे, तर कसे पडतात आडनाव?
आडनाव हे प्रत्येक व्यक्तीची ‘आयडेंटिटी’ असते. ते चित्रविचित्र, वेडेवाकडे, दुबरेध, लांबलचक, अर्थपूर्ण वा अर्थशून्य- कसेही असले तरी प्रत्येकाला त्याच्या आडनावाचा अभिमान असतो. माणसाचा धर्म, जात, गोत्र, प्रदेश, संस्कृती या साऱ्यांचा ज्यातून बोध होतो.

माणसांची आडनावं कशी पडली असतील? हजारो वर्षांपूर्वी माणूस जेव्हा जंगलात राहत होता तेव्हा गरीब-श्रीमंत अशी वर्गवारी नसणार, कुणीच काही कामधंदा करीत नसणार. सकाळ झाली, की उठायचं, पशु-पक्षी-प्राणी मारून खायचे किंवा त्यातल्या त्यात जे ‘जगा आणि जगू द्या’ या वृत्तीचे होते त्यांनी जवळपासच्या परिसरातली फळं, फुलं तोडायची आणि घरातल्या कच्च्याबच्च्यांना खाऊ घालायची हाच दिनक्रम. यासाठी माणसाला ओळखीची गरजच भासली नसावी.

पुढे माणसाला अग्नीचा, जमिनीतल्या खनिजांचा, तेलाचा, धातूंचा शोध लागला तसतसा तो वेगवेगळे उद्योग करू लागला. कुणी मातीपासून मडकी तयार करू लागलं, तर कुणी धातूपासून भांडीकुंडी, तर कुणी शस्त्रास्त्रं, कुणी भातशेती करू लागलं तर कुणी कापसापासून कापड विणू लागला, कुणी ताड-माडापासून ताडी-माडी गोळा करून ती लोकांना कशाच्या तरी बदल्यात देऊ लागला. ज्यांची बुद्धी चांगली होती, त्यांनी सृष्टीची निर्मिती, निसर्ग, ऋतुचक्र यांचा अभ्यास करून आपल्याजवळचं ज्ञान समाजाला द्यायला सुरुवात केली आणि यातूनच त्या त्या माणसाच्या उद्योग-व्यवसायानुरूप त्याला नावं-आडनावं पडली असावीत. जशी- कुंभार, लोखंडे, सुतार, गवळी, माळी, कोळी, वैद्य, पुरोहित, इत्यादी.

अमुकवाले तमुकवाले अशीही बरीच आडनावं आहेत. त्यांच्या तशा पडण्यामागचा तर्क आपण समजू शकतो. उदा. चांदीचा व्यापार करणारे चांदीवाले, त्याचप्रमाणे लोखंड, तांबे, पितळेचा व्यापार करणारे अनुक्रमे लोखंडे, तांबे, पितळे, इ. याच प्रकारे बाटलीवाला, कांचवाला, दारूवाला, लकडावाला, रेशमवाला. आपण बिनीवाले, छापवाले समजू शकतो, पण पूंछवाले? तशी ‘पूछ’ तर तुमच्या-आमच्या सगळ्यांच्याच पूर्वजांना होती, मग यांनी का लावलं असावं?

गाव-शहरांच्या नावांवरून अनेक आडनावं पडली. त्यातही गंमत म्हणजे काही शहरांवरून आडनावं पडली, पण काहींचा विचार झालेला दिसत नाही. उदा. मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, सोलापूरकर आहे; कोल्हापूरकर नाही, मात्र कोल्हापुरे आहे. औरंगाबादकर, जळगावकर, नागपूरकर, सातारकर, सांगलीकर, ठाणेकर, कल्याणकर, कल्याणपूर, मुरबाडकर, पेणकर, पनवेलकर अशी आडनावं आहेत, पण मग डोंबिवलीकर का नाही? गोवेकर, मंगेशकर, पाटणकर, कुडाळकर, चिपळूणकर, वाईकर आहे, परंतु रत्नागिरीकर नाही! कदाचित काही शहरे भविष्यकालीन तरतूद म्हणून राखून ठेवण्यात आली असावीत!

अर्थात, महाडचे रहिवासी म्हणून महाडकर, मुरुडचे रहिवासी म्हणून मुरुडकर असे असले तरी सगळेच मुरुड-महाडला राहणारे मुरुडकर-महाडकर होऊ शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे. असं झालं असतं, तर मुंबईकरांची फारच पंचाईत झाली असती! कारण एक कोटी पन्नास लाखांपैकी अर्ध्यानी जरी मुंबईकर आडनाव धारण केलं असतं तर मोठा गोंधळ उडाला असता. मग त्यांना माहीमकर, वांद्रेकर, अंधेरीकर, गोरेगावकर, गिरगावकर अशी उपनगरीय आडनावं घ्यावी लागली असती. पण गंमत म्हणजे माहीमकर, गोरेगावकर, दादरकर, परळकर ही आडनावं आताही आहेतच!

गाव-शहरांच्या नावांवरून पडलेल्या आडनावांवरून त्यांच्या जातीचा मात्र बोध होत नाही. जसं गोखले, परांजपे, रानडे, आपटे, पटवर्धन, दीक्षित ही आडनावं उच्चारली, की ती ब्राह्मणांची आहेत हे समजतं. वेर्णेकर, पालशेतकर, पेंडुरकर, पेडणेकर ही आडनावं उच्चारताच सोन्या-चांदीच्या पेढय़ांचे व्यापारी अर्थात सोनार मंडळी डोळ्यासमोर येतात. (आता पेठे, गाडगीळ अशी ब्राह्मण मंडळीही यात उतरली आहेत ही गोष्ट वेगळी!) चिटणीस, टिपणीस, प्रधान, गुप्ते, कर्णिक म्हटलं, की चवीने खाणारी कायस्थ मंडळी किंवा पवार, कदम, देशमुख, शिंदे, चव्हाण म्हटलं, की मंडळी मराठा आहेत हे समजतं. तसं जळगावकर, नागपूरकर, सातारकर, सांगलीकर यांतून जातिबोध होत नाही.

जाधव, पाटील यांसारखी काही आडनावं अशी आहेत, की जी मराठा, आगरी, बौद्ध अशा अनेक जातींमध्ये आहेत. गाव-शहरांच्या नावांवरून अनेक आडनावं पडली हे समजण्यासारखं आहे, परंतु फळांच्या नावावरूनही खूप आडनावं आहेत. फणसे, बोरे, आवळे, आंबेकर, केळेकर, बोरकर, नारळीकर, ताडफळे, जांभळे, इ. (चिकू, पेरू, मोसंबी, संत्रे या फळांकडे कुणाचं लक्ष कसं नाही गेलं?) भाज्यांवरूनही अनेक आडनावं आहेत. उदा. भेंडे, वांगीकर, गवारीकर, गोवारीकर, गोवारी, दुधे, भोपळे, पडवळे, कोथिंबिरे, इ. शिवाय बागाईतकर असे सर्वसमावेशक आडनावही आहे. कांदे आडनाव आहे, बटाटे का नाही? कोथिंबिरे आहे, मिच्रे का नाही? पक्ष्यांवरूनही आडनावं आहेत. उदा. कोकीळ, पोपट, पोपटकर, गरुड, गरुडे, कावळे, चिमणे, ससाणे, भारद्वाज, इ. तसेच प्राण्यांवरून आडनावं आहेत- वाघ आहे (सिंह महाराष्ट्रात नाही, पण पंजाबमध्ये भरपूर आहेत), म्हैसकर, म्हैसाळकर, अस्वले, कोल्हे, गाढवे, डुकरे, लांडगे आहे. घोडे, घोडेस्वार, घोडेकर, घोडके आहे. सापे, नाग, नागे आहे. विंचूही आहे. ढेकणे, झुरळे आहे; पण पाले, डासे नाही. शिवाय सर्वसमावेशक असं प्राणी हे आडनावही आहे.

शिवाजी महाराजांच्या किंवा त्यानंतरही पेशव्यांच्या काळात सर्वच लोक आडनावं लावत नव्हते असं इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातल्या आठपैकी सात जणांची आडनावं नमूद केलेली नाहीत. उदा. अण्णाजी दत्तो, रामचंद्रपंत त्रिंबकजी, रावजी निराजी, दत्तात्रय त्रिंबक, इ. मात्र जे पंतप्रधान (पेशवे) होते त्या मोरोपंत पिंगळे यांचे मोरो त्रिंबक पिंगळे असं पूर्ण नाव नमूद केलेलं आढळतं. हंबीरराव मोहितेंचंही पूर्ण नाव नमूद केलं आहे. शिवाय अलीकडच्या काळातील जगन्नाथ शंकरशेट, शंकर सखाराम, जावजी दादाजी अशी आडनावविरहित नावं आपण वाचलीच की!

काही काही आडनावं त्या व्यक्तींना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभत नाहीत. आडनावांमध्ये अनेकदा विरोधाभासही आढळतात. काळे आडनावाची माणसं चक्क गोरी असतात, तर गोरे आडनावाची चक्क काळी असतात! खोटे आडनावाची माणसं सदा सत्यवचनी असतात. काहींचे आडनाव वाघमारे असतं, पण मांजरालाही घाबरतात. गोडबोले आडनावाची सगळीच माणसं गोड बोलत नाहीत, तर कडू आडनावाची माणसं आम्ही नावापुरतंच कडू आहोत हे जणू दर्शविण्यासाठी खूप गोड बोलतात! आडनाव टकले असतं, पण डोक्यावर भरपूर केस असतात, तर त्याउलट आडनाव केसकर असतं, पण डोक्यावर केसांचं नामोनिशाण नसतं! बरेचदा भोळे भोळे नसतात तर सावे साव नसतात. कुलकण्र्याना कुळकर्णी आणि कुळकण्र्याना कुलकर्णी संबोधलेलं आवडत नाही. कारण कुलकर्णी म्हणजे देशस्थ ब्राह्मण, तर कुळकर्णी म्हणजे कायस्थ प्रभू.

हे इथंपर्यंत सहज समजण्यासारखं आहे, मान्य होण्यासारखं आहे. पण काही आडनावं मात्र या गृहीतकाला अपवाद असतात. काही आडनावं विचित्र असतात, काही गमतीदार असतात, काही अनाकलनीय असतात. उदा. हुजूरबाजार, खडबडे, धडपडे, भडभडे, किरकिरे, गोंधळेकर, नाकतोडे, चिकटे, हरले, बोचरे, चावरे, इ. ती तशी का पडली असतील याचा आपण विचार करीत राहतो, खरं ना?

संख्येवरूनही काही आडनावं आहेत. उदा. बारटक्के, एकबोटे, अष्टपुत्रे, दशपुत्रे, इ. तर नांदेड जिल्ह्य़ात ‘वार’ या शब्दाने शेवट असणारी आडनावं खूप आहेत. उदा. पेडगुलवार, बेजगमवार, मामीडवार, गजेवार, बोजेवार, केशटवार, इ. आणि विशेष म्हणजे, यांपैकी बहुतेकांचा व्यवसाय छपाईचा आहे. नागपुरे, तनपुरे, अनासपुरे, गणेशपुरे, केकातपुरे अशी आता ‘पुरे’ सांगणारी आडनावं नागपूरकडे आढळतात. तसे अमुक कर तमुक कर असं सांगणारीही बरीच आडनावं आहेत.आडनाव काहीही असो, ते विनोदी असो, विचित्र असो, विसंगत असो वा हास्यास्पद, आपण त्याच्याकडे फारसं गांभीर्याने न पाहता हसून-खेळून पाहिलं पाहिजे. कारण जगात अर्धीअधिक आडनावं ही अशीच विनोदी, विचित्र आणि विसंगत आहेत.

कोरा लिंक : http://bit.ly/3JrzUAg

Anil Patil यांनी दिलेले उत्तर

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম