अबब! अडीच लाखाचा जांभळा आंबा
आंबा हे एक बी असलेले रसाळ मधुर फळ आहे.जगभरात आंब्याच्या अनेक जाती आहेत तर भारतात सुमारे आंब्याच्या १५०० जाती आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे.
सर्वाचा लाडका हापुस, तोतापुरी, माकनुर, देवगड याच्यापुढे आपली ऊडी जात नाही.
'हापुस' घेतानाच सामान्य माणूस धास्तावतो ते त्याच्या दरामुळे पण जगात सर्वात महाग एक आंबा आहे तोही आपल्या कडील असलेला केशरी किंवा पिवळ्या रंगाचा नव्हे तर 'जांभळा आंबा' त्याचे नाव आहे 'मियाझाकी आंबा' हा जगातील सर्वात महाग आंब्यांपैकी एक आहे. मियाझाकी आंबा हा जपानमधील क्युशू प्रांतातील मियाझाकी शहरात लागवड केलेल्या सर्वात प्रसिद्ध फळांपैकी एक आहे.
गतसाली आंतरराष्ट्रीय (सुपर मार्कट) बाजारात हे फळ २.७० लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतक्या दराने विकला गेला. हा आंबा मुळचा जपानी असल्याने ‘तायो-नो-टोमागो’ किंवा ‘एग्ज ऑफ सनशाईन’ या नावांनी विकला जातो. त्याचा रंग पिवळा किंवा हिरवा नसतो, तो पूर्ण पिकल्यावर जांभळा होतो आणि त्याचा आकार डायनासोरच्या अंड्यांसारखा दिसतो. या आंब्यांचे वजन साधारणत: ३०० ते ३२५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त असते. तर या आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण १५ %हून अधिक असते.तसेच त्यात बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असते, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे. तसेच कॅन्सरवर गुणकारी असून कोलेस्ट्राल नियंत्रणात राहाते व त्वचा सतेज राहाते असे रेड प्रमोशन सेंटरने म्हटले आहे. मियाझाकी आंब्यापासून पुडिंग, कॅरामल, ज्यूस व वाईन बनविली जाते.
या झाडाला फळ लागल्यावर त्याभोवती प्लॅस्टिक जाळी केली जाते. यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आंब्याच्या त्वचेवर पडतो, ज्यामुळे त्यांना त्यांचा विशिष्ट एकसमान रंग मिळतो.जसजसे फळ मोठे होऊन नैसर्गिकरित्या झाडातून जाळ्यात येतो. तेव्हा चवीला सर्वात गोड लागतो.
भारतीय शेतकरी सुध्दा या जातीच्या आंब्याचा विचार करत आहेत.