रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव

 रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव

धनाजीं जाधव यांचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. ते प्रथम प्रतापराव गुर्जरांच्या सैन्यात होते. 

रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव

सरसेनापती धनाजी जाधव हे जिजाबाईंचे जवळचे नातलग.सख्ख्या भाऊ अचलोजी  यांचा मुलगा संताजी जो कानाकगिरीच्या युद्धात कामी आले.त्या संताजी चा मुलगा शंभूसिंग आणि शंभूसिंग यांचा मुलगा म्हणजे सेनापती धनाजी जाधव.असे छत्रपतींचे व जाधव घराण्याचे नातेसंबंध सांगता येईल. शंभूसिंग जाधव हे पावनखिंडी च्या युद्धात ३०० सैनिकासहित मरण पावले.महाराष्ट्राला तेथे बाजीप्रभू देशपांडेचे बलिदान लक्षात आहे पण त्याचवेळी शंभूसिंघ च बलिदान विसरतो .मराठ्यांचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी शिवकाळा नंतर उत्कृष्ट कामगिरी बजावली . त्यांनी झुल्फीकारखानाला दीड हजार मैल पायपीट करुन महाराष्ट्र भर फिरवले. विजापूरचा सेनापति अबदुलकरीम याच्याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत त्यांंनी विशेष शौर्य दाखविल्यामुळें सैन्यात बढती देण्यांत आली.सावनूरच्या लढाईंत त्यांनी हुसेनखान मायणा याचा पुरा बिमोड केला तेव्हां शिवाजी महाराजांनी त्यांची तारीफ केली होती. (१६७९).यावेळी ते वयाच्या विशीत होते. 

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आतां पुढें काय करावें? हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठा मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होते.या सर्व मंडळीनी छ राजाराम महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी

” वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून ‘जयसिंगराव’ हा किताब दिला ”

नंतर शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) . शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.

 मंगळवेढा जवळ असणाऱ्या ब्रम्हपुरी मध्ये त्यावेळी आौरंगजेबाची छावणी होती. या मोगल तळावर पुन्हा पुन्हा हल्ले करून त्यांनी अशी काही दहशत निर्माण केली की औरंगजेबाला शेवटी आपली बायको व मुलगी यांना सुरक्षिततेसाठी म्हणून विजापूरला हलवावेसे वाटले.आणि शेवटी त्यांना पेडगावला आणून ठेवावे लागले.

धनाजी जाधव यांनी सातार्याच्या मोगल छावणी वर सुध्दा हल्ले चढवले व मोगली सेनेला जेरीस आणले. 

साधा लाकूड फाटा व गवतचारा आणण्यासाठी औरंगजेबाला भक्कम पथके बरोबर देऊन सरदारांना छावणी बाहेर पाठवावे लागे.छावणीत आणि खुद्द बादशहाच्या निवासस्थाना भोवती गस्त व पहारा यांची कडेकोट व्यवस्था करावी लागली.धनाजी जाधवांचा दरारा किती होता हे यावरून समजते.

"संताजी- धनाजी रणात दिसता"

"शत्रू पळे प्रतिबिंब पाहता" 

 एवढ्या दोन ओळीवरून तरी ह्याची भीती व जरब काय असेल हे गनिमाना  कळतं असे. 

शिवकाळामध्ये धनाजी जाधव यांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पराक्रम केला...

यामध्ये उंबरखिंडीची लढाई (१६६१) उमराणीचे युध्द (१६७२) नेसरीचे युद्ध (१६७४) कोपल बहादुरविंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनाजीरावांनी पराक्रमाची शर्थ केली आणि स्वतःची मुद्रा (शिक्का) तयार करून "शिवचरणी तत्पर 'धनजी जाधव किंकर" असा बहुमान प्राप्त केला या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःला किंकर म्हणजेच सेवक अगर चाकर असे म्हटले आहे...

छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या नंतरच्या प्रतिकूल काळात स्वराज्याचे रक्षण करणारे सेनापती म्हणून धनाजी जाधव यांचा उल्लेख केला जातो .

त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. संताजी घोरपडे मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली.त्यांच्या सेनापती बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी समकालीन संदर्भातून धनाजी जाधव यांनी अतुलनीय कामगिरी करत सेनापतीपद सांभाळले...संताजी घोरपडे यांच्या मृत्युनंतर मोगलांविरूद्ध यशस्वीपणे लढा देण्याचे श्रेय सेनापती धनाजीराव जाधव यांचेच आहे.

 शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजीं जाधवांचा मोठा वाटा होता.श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली.

छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढाया केल्या व मोगल सरदारांना आपल्यामागे मोठी पायपीठ करण्यास भाग पाडले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई सरकार यांच्या काळात गुजरातमधील बडोद्यापासून ते कर्नाटकातील धारवाड़ आणि कारवार पर्यंत आपल्या लष्करी मोहिमा चालवल्या. अनेक मोगल शहरे मारली इतकेच काय खुद्द बादशाहच्या छावणीवर हल्ले चढवले.याचबरोबर इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात परत आले होते.

धनाजी जाधव (इ.स. १६५० - २७ जून, १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते.

सरसेनापती धनाजी जाधव हे ते कोल्हापूर जवळील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं पेठवडगांव (ता.हातकणंगले)येथें त्यांची छावणी पडली होती. त्यांना कित्येक दिवसांपूर्वी झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळे ते बरेच दिवसापर्यंत आजारी होते.(कदाचित मधुमेह असावा कारण पायाच्या असाध्य व्रण ( गॅन्गरीन ) झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे रियासतकार म्हणतात.)अणि त्यामध्येच त्यांचे वडगाव मुक्कामी (२८ जुन १७१०)रोजी निधन झाले.त्यांची समाधी पेठवड़गाव  ता. हातकणगले  जि. कोल्हापूर येथे असुन त्यांच्या  अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी गोपिकाबाई या सती गेल्या.पेठवडगाव येथे त्यांची व पत्नी गोपिकाबाई यांची समाधी आहे.ही समाधी बरेच दिवस अज्ञात होती. ही समाधी शोधण्यात पन्हाळ्याचे इतिहास संशोधक गुळवणी यांचा सिंहाचा वाटा आहे.

अशा या पराक्रमी सरसेनापतींबद्दल अनेकांनी इतिहासाच्या पाना-पानांत भरपूर समरगाथा लिहिली आहे. मात्र, त्यांच्या स्मारकाबद्दल फारशी माहिती नसल्याने तेथे भेट देणार्‍यांची संख्या अंत्यंत दुर्मिळ आहे. हे चित्र बदलण्यासाठी "सरसेनापती श्री धनाजीराव जाधव स्मारक" पर्यटन नकाशावर येणे गरजेचे आहे. यासाठी शासनासह इतिहास संशोधन संस्था-संघटना व शिवप्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव
सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी

रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव
समाधी मंदिरातील शिल्प

रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव
गोपिकाबाई यांच्या समाधी मंदिरातील शिल्प
🔸 समाधी स्थळाचे जतन व संवर्धन.🔸 

सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे या उद्देशाने पेठवडगांव नगपरिषदेच्या वतीने या परिसराचा विकास करण्यात आला.पण तो पुरेसा नाही. समाधी द्वारावर सरसेनापती श्री  धनाजीराव जाधव यांचा पुतळा बसविण्यात आला.तसेच स्वागत कमानीला सरसेनापती धनाजी जाधवांचे नाव दिले आहे. याशिवाय महाराष्ट्र शाहीर परिषद व कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी २८ जून रोजी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे  केले जाते. 

सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्यासह सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोपीकाबाई यांच्या वृंदावन परिसरामध्ये महाराष्ट्राचे राज्यफुल जारुळ, नागकेसर, कंकू फळ, आपटा, सीतेचा अशोक आदी झाडे लावण्यात आली आहेत. असे हे ऐतिहासिक स्मारक पर्यटनाच्या नकाशावर येणे  अत्यंत गरजेचे आहे.

-अनिल पाटील,पेठवडगाव

9890875498

रणझुंजार सरसेनापती धनाजी जाधव समाधी पेठवडगाव



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম