शरद पवार यांनी सुध्दा बंड केले होते

 शरद पवार यांनी सुध्दा बंड केले होते

आणीबाणीनंतरचा तो काळ होता.आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर सुध्दा झाला.कॉंग्रेस पक्षात 'इंदिरा गांधीनिष्ठ' आणि 'काँग्रेस पक्षनिष्ठ' असे दोन गट निर्माण झाले.यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत, 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. यशवंतराव चव्हाणचे शिष्य असल्याने शरद पवार, वसंतदादा  रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.तर नासिकराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले.

शरद पवार यांनी सुध्दा बंड केले होते

१९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. जनता पक्षाने ९९ जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं होते तर  इंदिरा काँग्रेसला ६२, रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या.शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या.यामुळे कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं.जनता पक्ष अपक्षाना घेऊन सरकार स्थापन करू नये म्हणून इंदिरा कॉंग्रेस व रेड्डी कॉंग्रेस एकत्र आले. 

आणि वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात १९७८ साली दोन पक्षाचे सरकार स्थापन झालं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले होते.तर शरद पवार हे उद्योगमंत्री बनले होते.

सरकार कसेबसे चालले होते पण नासिकराव तिरपुडे यांच्या आडमुठ्या पणामुळे वसंतदादा यांची गोची होत होती. 

१९७८ सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होते. अधिवेशन सुरू असताना कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक शरद पवार यांनी ४० आमदार घेऊन बंड केले. पवारासोबत सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंकी आदी तरूण नेते होते. 

शरद पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं संयुक्त सरकार अल्पमतात आले यामुळे वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं सयुक्त सरकार  साडेचार महिन्यात कोसळले," 

 यानंतर पवारांनी आपली स्व:तची 'समाजवादी कॉन्ग्रेस' स्थापन करून सोबत जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट या पक्षाना  एकत्र करून 'पुरोगामी लोकशाही दल' (पुलोद) आघाडी केली. 

पुलोदने पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.वयाच्या ३८ व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले  तर सुंदरसिंह सोळंकी उपमुख्यमंत्री बनले.या सरकारमध्ये निहाल अहमद, उत्तमराव पाटील, गणपतराव देशमुख, हशु अडवाणी यासारखे वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी मंत्री बनले. 

या सरकार मध्ये पण अंतर्गत कलह होताच.कारण वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी एकत्र येऊन हे सरकार चालवत होते. 

देशात त्यावेळी राजकीय वातावरण गढुळ बनत चालले होते.केंद्रातील मोरारजी देसाई यांचा जनता पक्ष फुटला होता.चरणसिंग काही काळ पंतप्रधान बनले होते मात्र देशात लवकरच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या व परत इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या होत्या. 

साहजिकच याचा परिणाम महाराष्ट्रात होऊ लागला.जनता पक्ष व त्यांचे मंत्री आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत होती.तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दोन कॉंग्रेस एकत्र यावीत, शरद पवारांनी कॉंग्रेस मध्ये यावे असे वाटत होते.तसा निरोपही इंदिरा गांधी यांनी शरद पवारांना दिला होता.पण शरद पवारांनी तो मानला नाही.

आणि अचानक १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली.

   -अनिल पाटील पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম