सैन्य दलातील अग्निपथ योजना आणखी कोण कोणत्या देशात आहेत
जगातील अनेक देशांत प्रत्येक तरूणाने किमान एक वर्ष तरी लष्करी सेवा दिलीच पाहिजे असा सक्तिचा कायदा आहे.मग तो कितीही श्रीमंत असो वा गरीब असो.आपल्याकडे असा सक्तीचा कायदा नसल्याने त्याचे महत्त्व वाटत नाही.
भारतामध्ये सर्वाना रोजगार देणे शक्य व्हावे म्हणुन प्रथमच सैन्यात अल्प कालावधीसाठी भरतीची योजना जाहीर झाली आहे.तिचे नाव अग्निपथ असे असुन, भरती झालेल्या जवानांना अग्निवीर असे संबोधले जाणार आहे.
भारत सरकारने (१४ जून २०२२) लष्करातील अल्पकालीन नियुक्त्या जाहीर केल्या. या योजनेनुसार, तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत भरती झालेल्या 25 टक्के तरुणांना चार वर्षांनंतर भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी मिळेल, तर उर्वरित अग्निवीरांना नोकरी सोडावी लागणार आहे.अनेक युवक बेरोजगारीला तोंड देत आहेत त्यामुळे ज्या तरुणांची इच्छा आहे की देशासाठी काम करावे ,देशाची सेवा करावी अशा सर्व तरुणांना "अग्निपथ योजना" वरदान ठरणार आहे.
लाभार्थी तरुणांना दर महिन्याला पगाराशिवाय इतर अनेक फायदे दिले जातील. जर तुमचे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
सरकार तर म्हणते ही भरती योजना फक्त भारतातच नसुन इतर देशांमध्ये देखील असुन ती उत्तम प्रकारे राबवली जात आहे.मग ही योजना भारतासारख्या बहुसंख्य लोकांच्या दे शात राबवली तर काय हरकत आहे.? बरेच देश असे आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते.त्या देशात लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे आणि त्यासाठी त्यांचे कायदे ही आहेत. भारताची अग्निपथ योजना मात्र सक्तीची नाहीय.ते देश कोणते ते पाहु
🔸लिथुआनिया
या देशात सक्तीची लष्करी सेवा २०१६ सुरू केली. रशियाच्या वाढत्या लष्करी कारवाई विरुद्ध म्हणून हा निर्णय घेण्यात आला. देशातील प्रत्येक १८ ते २६ वयोगटातील पुरुषांना एक वर्ष सैन्यात सक्तीची सेवा करावी लागते.फक्त या सेवेतून विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थीना सूट देण्यात आली आहे.
🔸ब्राझील
या देशामध्ये १८ वर्षांवरील पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. हे सैन्य १०ते १२ महिन्यांच्या कालावधीसाठी सेवा देते. पटण्यासारखे आरोग्याचं कारण असल्यास सक्तीच्या सेवेत सूट दिली जाते.तसेच विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लष्करात भरती होणे सक्तीचे आहे.
🔸उत्तर कोरिया
या देशामध्ये नागरिकांना सक्तीची लष्करी सेवा द्यावी लागते. या देशात पुरुषांना ११ वर्षे आणि महिलांना ७ वर्षे सैन्यात सेवा द्यावी लागते.तसा कायदा या देशाने केला आहे.
🔸दक्षिण कोरिया
या देशात राष्ट्रीय लष्करी सेवा अनिवार्य आहे.शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषांना लष्करात २१ महिने, नौदलात २३ महिने किंवा हवाई दलात २४ महिने सेवा देणे सक्तीचे केले आहे.याशिवाय पोलीस, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि काही विशेष प्रकरणांमध्ये सरकारी विभागात काम करण्याचा पर्याय ही येथील नागरिकांना आहे.विशेष म्हणजे ऑलिम्पिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या खेळाडूंना सैन्यातील सक्तीच्या सेवेतून सूट दिली जाते. पण खेळाडूंना पदक मिळाले नाही तर त्यांना परत येऊन सैन्यात सेवा करावी लागते.
🔸इस्रायल
या देशामध्ये पुरुष आणि महिला नागरिकांना लष्करी सेवा सक्तीची आहे.संरक्षण दलात पुरुषाली ३ वर्षे आणि महिलाना २ वर्षे सेवा बजावावी लागते. लष्करात सेवा बजावणे इस्रायली नागरिकांसाठी सक्तीची असते.
🔸 इरीट्रिया
या देशात राष्ट्रीय सैन्यात सक्तीच्या सेवेची तरतूद करण्यात आली आहे. या देशात पुरुष, तरुण आणि अविवाहित महिलांना १८ महिन्यांसाठी देशाच्या सैन्यात सेवा बजवावी लागते.विशेष नागरिकांना मात्र यामध्ये सुट आहे.
🔸स्वित्झर्लंड
या देशामध्ये १८ ते ३४ वयोगटातील पुरुषांना लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. हि सेवा २१ आठवड्यांची असते. त्यानंतर एक वर्ष अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाते.तर महिलांना मात्र हा सक्तीचा नियम लागू नाही. त्या स्वेच्छेने सैन्यात सामील होऊ शकतात.
🔸सीरिया
या देशामध्ये पुरुषाकरिता लष्करी सेवा सक्तीची आहे. ती १८ महिन्याची असते. वाढत्या दहशतवादी कारवायाना प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
🔸जॉर्जिया
या देशामध्ये १ वर्ष सक्तीची लष्करी सेवा सक्तीची आहे. यामध्ये ३ महिन्यांसाठी युद्धाचं प्रशिक्षण व उर्वरित ९ महिने व्यावसायिक सैन्याला मदत करण्यासाठी ड्युटी ऑफिसर म्हणून काम करावे लागते.
🔸स्वीडन
या देशाने २०१० मध्ये सक्तीची लष्करी सेवा रद्द केली होती. ही सेवा पुन्हा सुरू करावी का? यासाठी २०१७ मध्ये सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतानंतर २०१८ पासून ५००० स्त्री-पुरुषांना सक्तीच्या लष्करी सेवेत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.
वरील देशाबरोबर ग्रीसमध्ये, १९ वर्षांच्या मुलांसाठी ९ महिने लष्करी सेवा अनिवार्य आहे.
इराणमध्ये १८ वर्षांवरील पुरुषांना २४ महिने सैन्यात सेवा बजवावी लागते.
क्युबामध्ये १७ ते २८ वयोगटातील पुरुषांना २ वर्षे सक्तीची लष्करी सेवा अनिवार्य आहे.
तुर्कीमध्ये २० वर्षांवरील सर्व पुरुषांसाठी लष्करी सेवा सक्तीची आहे. त्यांना ६ ते १५ महिने सैन्यात सेवा करावी लागते.
आपणाकडील 'अग्निपथ' सेवा वरील देशासारखीच आहे फक्त ती सक्तीची नाही एवढाच काय तो फरक आहे. या योजनेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, सेवेदरम्यान आत्मसात केलेलं कौशल्य आणि अनुभव यामुळे त्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्याही उपलब्ध होतील.
-अनिल पाटील पेठवडगाव
9890875498