जैन धर्मातील गणेश
फेसबुक लिंक https://bit.ly/3hAeMde
जैन धर्माचे प्रमुख दोन संप्रदाय आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर कट्टरपंथीय संप्रदाय आहे.परंतु श्वेतांबर संप्रदायात विद्वानांनी आपल्या रचनेच्या सुरवातीला मंगलाचरण श्लोकात विघ्नविनाशक गणेशाचे स्मरण केले आहे. 'गणेश' प्रणाम श्लोकाने आपल्या ग्रंथाची सुरवात केली आहे. सतराव्या शतकाच्या प्रारंभ काळात कपूरमंजरीरासच्या सुरवातीला खालील चौथाई मिळते.
प्रथम गणपती वर्णव ॐ गवरी-पुत्र उदार ।
लक्ष लाभ जे पुरवई, देव सविहूँ प्रतिहार ।।
सेवंत्रे जस मुगट भर, शेंदूर सोही शिशिर ।
सिद्धी बुद्धी नऊ भरतार, जे बुद्धी अवतार बडवीर ।।
ही रचना श्वेतांबर जैन संप्रदायाचे पंडित मतिसार यांनी रचलेली आहे. या प्रकारे समकालीन एका ग्रंथात हमीरेप्रबंधाच्या सुरवातीला एक दोहा मिळतो.
गवरी पुत्र गजवंत विशाल,सिद्धी बुद्धी वर वचन रसाल।
सुर-नर-किनर सारइं सेव, धुरी प्रणमूँल लंबोदर देव।।
या ग्रंथाचे रचनाकार अमृत कलश जैन श्वेतांबर संप्रदायाचे आहेत. तसेच विवाहप्रसंगी 'विनायकयंत्र' पूजेची प्रथा आहे.
जैन हा बहुसंख्य व्यापारी असलेला समाज आहे. त्यामुळे जैन धर्मातील गणेशाचे आताचे स्वरूप हे कुबेराशी साम्य सांगणारे आहे. म्हणूनच जैन धर्मात गणेशाचा संबंध व्यापाराच्या समृद्धीसाठी जोडला जातो. श्वेतांबर जैन पंथीयांनी गणेश व इतर हिंदू देवतांना त्यांच्या पंथात समाविष्ट करून घेतले.
सुरुवातीच्या काळात जैन धर्मात मूर्तीपूजेला फारसे प्राधान्य दिलेले आढळत नाही.जैन र्तीथकराची सर्वात प्राचीन प्रतिमा ही बिहार येथील लोहानीपूर येथे सापडली. अभ्यासकांच्या मते हे शिल्प मौर्यकालीन आहे. त्या नंतर मात्र कुशाण काळापासून जैन शिल्पे मोठय़ा प्रमाणात सापडण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात जैन मूर्ती या कमी अलंकरण असलेल्या, केवळ र्तीथकरच असलेल्या स्वरूपाच्या होत्या,सरस्वती, पद्मा, गजलक्ष्मी ही विशेष उल्लेखनीय उदाहरणे आहेत. जैन मतात र्तीथकर हे अग्रणी असल्याने इतर देवता या दुय्यम स्थानी दाखविल्या जातात. त्यामुळे जैन धर्मातील गणेशाचे स्थान हे हिंदू धर्माप्रमाणे अग्रणी नसून दुय्यम आढळते.
श्वेतांबर पंथातील साहित्या नुसार गणपतीदेखील विरक्त जीवन जगणारा आहे. तसे संदर्भ वर्धमानसुरीच्या ‘अकारदिनकरा’मध्ये सापडतात. प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी गणपतीचे पूजन होते. तसेच मोठ्या मोहिमेच्या आधी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा श्वेतांबर पंथात आहे. उदयगिरी आणि खंडगिरी या दोन दिगंबर परंपरेतील पंथाच्या शिल्पांकलेत गणपतीची दोन शिल्पे कोरलेली आढळतात. मथुरेला जैन गणेश पुतळा आहे. त्यासोबत जैन यक्षी अंबिका म्हणजेच ‘गौरी’देखील आहे. राजस्थान, गुजरात येथील जैन मंदिरात गणपतीची चित्रे आहेत.
प्रत्येक परंपरेतील गणपतीचा स्वतंत्र आविष्कार आहे. त्यामुळे गणपतीचे आढळणारे अवशेष म्हणजे हिंदू आक्रमणाचे प्रमाण ठरत नाहीत. त्याउलट हिंदू संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण एकतेचे ते पुरावे आहेत.
अभिधान चिंतामणी’ या हेमचंद्र लिखित जैन ग्रंथात गणेशासाठी हेरंब, गणविघ्नेश, विनायक इत्यादी नावांचे उल्लेख सापडतात व हा गणेश गजमुख असून तुंदिलतनू, लंबोदर, एकदंत, परशुधारी आहे. त्याचे वाहन उंदीर आहे, असे वर्णन साहित्यात आपल्याला सापडते.जैन पंडित वर्धमान सुरी यांच्या इसवी सन १४१२ मध्ये लिहिलेल्या ‘आचार दिनकर’ या ग्रंथात गणेशाचा संदर्भ सापडतो. या ग्रंथातील ‘गणपती प्रतिष्ठा’ या अध्यायात गणेशाचे मूर्तिविधान, गणेश प्रतिष्ठान विधी दिलेले आहे.
गोमुख नावाचा आदिनाथांचा यक्ष व पूर्णभद्र नावाचा यक्ष हेदेखील गजमुखच आहेत. पूर्णभद्राचे वाहन घोडा आहे. म्हणूनच जैन गणेशाचे स्थान जीनालयात मुख्य गाभाऱ्यात तर ते प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर, पीठावर किंवा तळघरात सापडते. मुख्य गाभाऱ्यातील गणेशाची गरहजेरी हे त्याचे जैन धर्मातील गौणत्व सिद्ध करते. जैन गणेशाचे सर्वात प्राचीन शिल्प हे मथुरेला सापडते. सध्या ती शिल्पकृती मथुरा पुरातत्त्वीय संग्रहालयात आहे. मुळात मुख्य शिल्पकृती ही अंबिकेची असून शिल्पकृतीच्या उजव्या कोपऱ्यात गणेशाचे अंकन सापडते. या अंकनात गणेश ललितासनात दाखविलेला आहे. दावा पाय दुमडलेला तर उजवा पाय खाली सोडलेला आहे. एक हात अभय मुद्रेत आहे तर दुसऱ्या हातात मोदकपात्र आहे. गणेशाचे द्विभुज असणे हे त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते.
राजस्थानमधील घानेराव, ओसिअन, नारलाई, विमल वासही, आहाड येथील जैन मंदिरातील गणेश शिल्पे ही विशेष महत्त्वाची आहेत.
घानेराव येथे महावीर मंदिरात आढळणारे गणेशाचे शिल्प हे एका स्तंभावर गूढ मंडपाच्या जवळ सापडते. येथील गणेश हा ललितासनात असून वरद मुद्रेत आहे. हातात अनुक्रमे परशु, मोदकपात्र, कमळ धारण केलेले आहे. तर ओसिअन येथील महावीर मंदिर परिसरात तीन गणेश शिल्पे आढळतात. येथील गणेश प्रतिमांमध्येही गणेश हा मोदकपात्र, कमळ, परशु, नागपवीत धारी आढळतो तर एका ठिकाणी गणेशाचे वाहन हे हत्ती दृष्टिपथास पडते. नारलाई येथील नेमीनाथ व सुपाश्र्वनाथ मंदिरात दोन गणेश शिल्पे आढळतात. नेमीनाथ देवळातील गणेश हा उंदीर वाहनासकट आणि वरदमुद्रा आणि मोदकपात्र, कमळधारी, चतुर्भुज आहे तर सुपाश्र्वनाथ मंदिर परिसरातील गणेश द्विभुज असून त्याचे वाहन मेंढा आहे. विमल वसही येथील जैन मंदिरात गणेश हा एका ठिकाणी पाश्र्वयक्ष स्वरूपात दिसतो तर दुसऱ्या ठिकाणी जैन देवता महाविद्यागौरीच्या चौकटीवर कोरलेला आहे. या काही मंदिरांशिवायदेखील राजस्थानमधील अनेक जैन मंदिरांवर गणेशदर्शन घडते. राजस्थानशिवाय गुजरात येथील बनासकांठा कुम्भारीया महावीर मंदिरातील गणेश विशेष उल्लेखनीय आहे. येथील गणेश हा चतुर्हस्त, लंबोदर आणि ललितासनात असून मूषक वाहनासोबत मोदकपात्र, करंडकमुकुट, उद्रबंध, नागपवीत धारण करणारा आहे. तर खांबात पाश्र्वनाथ मंदिर हे चिंतामणी मंदिर या नावाने प्रसिद्ध असून येथील गणेशाच्या शिल्पकृतीमुळे त्या मंदिराला चिंतामणी नाव पडले असावे.

Tags
धार्मिक- गणपती