श्रावणोत्सव

 श्रावण.



श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे !
क्षणांत येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडेll

श्रावण महिना हा पवित्र, धार्मिक कार्य करण्यास अतिशय शुभ मानला जातो. वेगवेगळया कवींनी त्याचे सुंदर वर्णनही केलेले आहे. सुंदर निसर्ग, हिरवीगार झालेली वृक्षवल्ली यांनी सर्वत्र चैतन्य निर्माण होते. ऊन-पावसाचा खेळ या महिन्यात चालू असतो.
आषाढा महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये म्हणून पूर्वापार देवांची आराधना केली जाते. ते प्रसन्न रहावेत यासाठी पूजाविधी केले जातात. आषाढ अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ म्हणतात. गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते. पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा, तुंबण्याचा वेग वाढला. आताच्या विज्ञानयुगात शहरे स्वच्छ ठेवली तर रोगराई आपोआपच वाहून जाईल. प्रसन्न श्रावणमासाचे आगमन होईल. दिव्यांची अमावस्या साजरी करताना घरातील सर्व पूजासाहित्य दीप-निरांजन- कलश इत्यादी घासून-पुसुन स्वच्छ करतात. ‘‘तमसो मा ज्योतिर्गमय’’ असा संदेश घेऊनच हा दिवस येतो. श्रावण दुस-या दिवसापासून सुरू होणार असतो. या महिन्यात वेगवेगळी व्रतवैकल्ये, पूजा,अभिषेक केले जातात. म्हणूनच ही पूर्वतयारी असावी.
साधारणत: श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. नेहमी मांसाहार करणारी मंडळीदेखील श्रावणात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. उलटपक्षी श्रावणी सोमवार, गुरुवार, शनिवार असे उपवास केले जातात. सत्यनारायणाची पूजा ब-याच घरांमध्ये केली जाते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कालाष्टमी, हरितालिका असे उपवास श्रावणापासूनच सुरू होतात. मंगळागौरीचे पूजन व व्रत सुवासिनी करतात.
आयुर्वेद वैद्यक शाखेतदेखील वर्षा ऋतुचर्येचे वर्णन करताना लंघन करावे, कोमट पाणी प्यावे, दिवसा झोपू नये, असे काही नियम सांगितले आहेत. श्रावणातील व्रतांच्या निमित्ताने आपोआपच आपण या आरोग्यनियमांचे पालन करतो. धार्मिक अधिष्ठान दिल्याने सामान्य जनता पथ्य पालन करते. हाच उद्देश या व्रतांमागे असावा, असे लक्षात येते.
आपण उपवास करतांना मात्र काही स्वास्थ्य नियमांचे अवश्य पालन करावे. सूर्याचे दर्शन श्रावणात दुर्मीळ होते. त्यामुळे शरीरातही भूक मंदावते. सर्वत्र ओलसरपणा असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अग्निमांद्य झाल्याने गरम पाणी पिणे उत्तम! त्यामुळे कफाचे त्रास कमी होतात. तसेच पचनशक्तीदेखील सुधारते. मात्र कडकडीत उपवास करून अॅसिडीटीला निमंत्रण अजिबात देऊ नका. फलाहार अवश्य करावा. दूध प्यावं. साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊ नका. साबुदाणा पचायला जड, वातुळ आहे. त्याच्याऐवजी वरीच्या तांदळाचे पदार्थ किंवा राजगिरा खावा. शेंगदाणेदेखील पित्त वाढवतात. त्यामुळे ते कमीच प्रमाणात खावेत.
तेलाने शरीराला अभ्यंग करून नंतर स्नान करावे. वातवृद्धी कमी करण्यासाठी बस्तीचिकित्सेसारखे पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यावं. तसंही आपल्या धर्मशास्त्रात पथ्याचा विचार करूनच सण, व्रतवैकल्ये, उपवास व विविध नियम सांगितले आहेत. आता गंमत बघा, नागपंचमीला लाहय़ांचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या पचायला हलक्या आहेत. मंगळागौरीला उपवास करून पानांचे दिवे केले जातात. हरितालिकेला, ऋषीपंचमीला पानांची पूजा होते, वेगवेगळया रानभाज्या बनवल्या जातात, ज्या पावसाळ्यातच मिळतात. जन्माष्टमीला पोहय़ांचा नैवेद्य दाखवतात.,समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पूनवेची वाट बघत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्यासाठी तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्यासाठी जणू काही सृष्टीने मानवाला छोटासा ब्रेकच दिला आहे. विविध रानवनस्पती निरनिराळे रसास्वाद देतात. त्यांचाही पोषकपणा मिळणे जरुरीचे असते. मंगळागौरी, हरितालिका पूजेसाठी सोळा पत्री जमा कराव्या लागतात. त्यामुळे विविध वनस्पतीची ओळख मुलांना होते. त्यांच्या स्पर्शानेदेखील पित्तशमन होते. नागपंचमीला, ऋषीला उकडीचे पदार्थ खाल्ले जातात. पानोळया, खीर, पोहे, कुरमुरे, साळीच्या लाहया असे पचायला हलके पदार्थच शास्त्रात सांगितले आहेत. व्रतांच्या पालनाच्या निमित्ताने, पारायणांच्या कारणाने झोप कमी घेतली जाते. अनायासेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिवसा झोप न घेण्याच्या नियमाचे पालन होते.श्रावणातील प्रत्येक दिवसच सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळेच असेल कदाचित पण, श्रावणात मनाच्या सांदी कोपर्‍यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगीकारल्या जाणार्‍या व्रतवैकल्यामध्ये येणार्‍या संकटांमधून निर्भीड आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्याची प्रेरणा मिळते
थोडक्यात काय आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यांची सांगड घातली तर श्रद्धेसोबत बुद्धी लावल्याने श्रावण महिन्यात आपण उत्तम आरोग्यप्राप्तीचे वरदान मिळवू शकतो.

श्रावण.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম