शोध मैलाचा, शोध किलोमीटरचा

 शोध  मैलाचा, शोध किलोमीटरचा 

पुणे २०० किलोमीटर.....!भुसावळ ४०० किलोमीटर...!!
असा बोर्ड आपण अनेक वेळेस रस्त्याने प्रवास करताना पहातो किंवा काही वेळेस हे अंतर सुद्धा बदलत त्या वरील आकडा बदलतो पण पुणे ....किलोमीटर हा शब्द काही बदलत नाही. हे अंतर कस आणि कुठून मोजतात हा प्रश्न मला अगदी लहान पणा पासून पडत असे, मग माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी माझ्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना विचारले तर सहज एक उत्तर मिळत असे की, शिवाजीनगर एस.टी स्टँड, कोणी सांगत असे पुणे स्टेशन एस.टी स्टँड, कोणी सांगत असे स्वारगेट एस.टी. स्टँड असे उत्तर मिळाल्यावर मी सुद्धा माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर शोधण्यासाठी त्या भागात गेलो की,तिथं कोठे "o" लिहिलेला दगड आहे हे पाहत होतो पण दगड काही मिळाला नाही आणि प्रश्नाचे उत्तर सुद्धा मला मिळत नव्हते म्हणून अनेक दिवस मनात ह्या प्रश्नाचे अनुत्तरित कोड असच संभाळून ठेवलं होतं.
शोध  मैलाचा, शोध किलोमीटरचा
पण काल मी पुणे स्टेशन परिसरात दुपारी पायी जात असताना जनरल पोस्ट ऑफिस समोरून फूटपाथवरून चालत असताना तिथं काही तरी विज्ञान विषयाशी संबंधित लोखंडी उपकरण आणि जवळ काळ्या रंगातील पुतळे उभे केलेले व त्या शेजारी काही तरी बारीक अक्षरात माहिती लिहिले असल्याचे मला दिसली, उत्सुकता म्हणून ती माहिती वाचली असता त्या मधून मला माझ्या अनेक दिवसाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 
पुणे शहर अमुक किलोमीटर दूर आहे हे जे अंतर ठरवलं जात ते कोठून ठरवलं जाते याच ते उत्तर होत......! 
पुणे शहरातील जनरल पोस्ट ऑफिस समोरील ब्रिटीश काळात उभारण्यात आलेल्या "०" मैलाचा दगड, या दगडा पासून इतर शहराचे अंतर त्या काळी पायी फिरून मोजण्यात आले आणि त्या नुसार दोन शहरातील अंतर ठरविण्यात आले आहे. भारता मध्ये ब्रिटिश साम्राज्य होते त्या वेळेस म्हणजे १८७२ मध्ये त्या वेळच्या सरकारी पोस्ट ऑफिस समोर हा दगड उभारण्यात आलेला आहे अश्या पद्धतीने कन्याकुमारी ते हिमालय व मुंबई पासून ईशान्य भारतातील किनार पट्टी पर्यंत चा भूभाग मोजण्यासाठी एकूण संपूर्ण भारता मध्ये ८० सरकारी पोस्ट ऑफिस समोर हे "०" मैलाचे दगड उभारण्यात आले आहेत. सरकारी पोस्ट ऑफिसच का तर ही इमारत त्या काळी सरकारच्या ताब्यात असे आणि भविष्यात ती पुढे सुद्धा सरकारच्या ताब्यात राहणार याची त्या वेळेस असणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण खात्री होती, व हा दगड कधीच हलवला जाणार नाही याची पूर्ण शास्वती होती म्हणून सरकारी पोस्ट ऑफिस निवडलं होत.
भारताची अक्षांश, रेखांश, प्रत्येक भूभागाची समुद्र सपाटी पासूनची उंची त्याची भौगोलिक रचना, नद्या नाले, शहरे यांची अत्यंत अचूक आणि शास्त्रीय माहिती देणारे सर्वेक्षण या काळात करण्यात आले या संपूर्ण सर्वेक्षणाला ५० ते ६० वर्ष लागलेली आहेत त्या काळी आजच्या सारख्या वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या आणि संपूर्ण प्रवास हा प्रत्येक प्रांतात पायी फिरून करण्यात आला होता.
 त्या सर्वेक्षणामुळे आज आपण दोन शहरातील अचूक अंतर आणि तिथे पोहचण्याची अचूक वेळ ठरवू शकतो पुढच्या पिढ्यांसाठी केवढा मोठा विचार त्या काळी केला गेला आहे. 
हे सर्वेक्षण करण्यासाठी राधानाथ सिकंदर आणि नैनसिंग रावत या दोन भारतीयांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या काळी ब्रिटिश सेवेत असणारे व भारता मध्ये नियुक्तीस आलेले इंग्रज अधिकारी लेफ्टनंट विलियम लॅमटन या अधिकाऱ्याने सर्वेक्षणाच्या या कल्पनेस जन्म दिला व संपूर्ण भारताचा सर्वे त्यांनी केला व पृथ्वी चा नक्की कसा आकार आहे हे जाणून घेतले त्याच्या सर्वेला " ग्रेट इंडियन आर्क " असे नाव दिले गेले. हे सर्वेक्षण चालू असताना भयंकर असे महामारीचे रोग आणि जंगलातील वाघ, सिंह, विचू यांच्या चाव्याने अनेक काम करणारे लोक मृत्यूमुखी पडले परंतु हे काम बरोबर अर्ध शतक म्हणजे ५० वर्षापेक्षा अधिक काळ अव्याहत पणे चालू होते. त्या काळात युद्धात जेवढे लोक मरण पावले नसतील त्या पेक्षा जास्त लोक या सर्वेक्षण काळात मृत्यू पडले आहेत. या सर्वेक्षणाचा फायदा पुढच्या अनेक पिढ्या उपभोगत आहेत. या सर्वेक्षणात जगातील सर्वोच्च असलेल्या हिमालय शिखरांचा शोध लागला त्याला कर्नल जॉर्ज एव्हरेस्ट या इंग्रज अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले ज्यांनी संपूर्ण मोहिमेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. 
अशी ही संपूर्ण माहिती आपल्याला होणे आवश्यक आहे.
पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या वर अभ्यास करून ही संपूर्ण माहिती विविध संदर्भ ग्रंथातून संकलित केली आहे व पुढच्या आधुनिक विश्वात रमणाऱ्या पिढीला याचे ज्ञान व्हावे म्हणून जनरल पोस्ट ऑफिस पुणे समोर हे शिल्प उभे केले आहे त्या मध्ये नैनसिंग, जॉर्ज एव्हरेस्ट, राधानाथ सिकंदर यांचे म्युरल उभारले असून त्यांची माहिती सुद्धा लिहिली आहे. त्या ठिकाणी थोडा वेळ काढून नक्की भेट द्या व ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बुद्धीतून सर्वेक्षण ही कल्पना जन्माला घातली आहे व ती पूर्णत्वास नेण्यास अनेक भारतीय लोकांनी आपले प्राण गमावले व आजच्या पिढीला जी.पी.एस.सारखी सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लावला त्यांची नक्की आठवण काढा, त्यांना सुद्धा आपण केलेल्या कार्याची पुढील पिढीतील कुणी तरी दखल घेतली याचे ते पृथ्वीच्या ज्या रुपात जिथं असतील जिथे त्यांना कौतुक वाटेल. आपले कार्य सार्थकी ठरले असे वाटेल.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম