संजीवन माची
फेसबुक लिंक http://bit.ly/2XKxhDO
मोरोपंतांच्या देखरेखीखाली राजगडचे बांधकाम चालु होते.राजधानीचा गड, स्वराज्याची सुरुवात.या मुरुंबदेवाच्या डोंगरास खणत्या,पहारी लागल्या.श्री गणेशा झाला.राजधानीचा गड नव रुप घेऊ लागला.गडावरील इमारती,तट,बुरुंज यांना लागणारा दगड हा डोंगरावरील अनावश्यक भागास खणत्या,पहारी लावुन फोडुन उपलब्ध केला जाऊ लागला.राजगडाच्या तिन्ही माच्या संरक्षित केल्या जात होत्या.मोरोपंतांनी किल्ले राजगडाची पश्चिमेकडील माची वैशिष्ट पुर्ण बांधली.पश्चिमेकडील एक दीड मैल लांबीच्या डोंगरसोंडेवर अंती हेच बांधकाम दुहेरी केलेले आहे आणि जागोजागी असलेल्या बुरुजांचे बांधकामही दुहेरी केलेले आहे.अगदी शेवटी एका मुलभूत खडकावर बिनिचा बुलंद बुरुंज बांधलेला आहे.जागोजागी पाण्याची टाकी,शिबंदीची घरे,चिलखती तट,चिलखती बुरुंज,आळ दरवाजा,जुंझार बुरुंज,दैवत स्थाने,तटसरनोबत सदर,पायखाने इत्यादी बांधकामांनी ती माची सजली,संरक्षित केली.किल्ले मुरुंबदेवाच्या सन १६४८ ते १६६३ या बांधकामाच्या कालावधीत हिरामण बेलदाराची पालें त्या राजगडाच्या आसमंतात असणार्या गुंजवणी नदीकाठी पडली.राजगडाचे बांधकाम सुरु झाले.वास्तुविशारदाच्या देखरेखीखाली राजगड रुप घेऊ लागला.दिवसाकाठी जेमतेम हातभर बांधकाम होई.कारण,चुन्याच्या मिश्रणावर,दगडाच्या चपखलपणावर,घेतलेल्या पायावर,उभारलेल्या तटबंधीच्या लांबी रुंदी जाडीवर,बुरुंजातील तटबंदीतील जंग्यांच्या अंश कोनावर, गोलाईवर एकंदरीत बांधकामावर डोळ्यात तेल घालुन काम पुढे चालले होते.पश्चिमेकडील माचीचा पहीला टप्पा पुर्ण झाला.शासकीय बांधकाम आधिकार्याने मोरोपंतांमार्फत शिवरायांना विनंती केली,स्वत: महाराजांनी जातिनिशी येऊन पहील्या टप्प्याचे बांधकाम नजरेखाली घालावे.काही उणे दुणे असल्यास पुनर्रचना करण्यास सोपे जाईल.
महाराज दुसर्या दिवशी सकाळी नित्यकर्मे आवरुन लवकरच माचीकडे जाण्यास निघाले.महादेवाची पुजा व पद्मावती मातेस वंदन करुन महाराज निघाले.मोरोपंत,निळोपंत,आबाजी सोनदेव,आण्णाजी दत्तो,निराजी रावजी आणि चिटणवीस पंताजी गोपीनाथ सोबत होते.महाराजांनी माचीची बारकाईने पहाणी केली.त्या भागातील बांधकामावरील आधिकार्यांस शिवरायांनी समाधान दर्शविले.त्या भागातील तीनही बुरुंजाच्या मार्यात किल्ले तोरण्याकडे जाणारा नसरापुर वेल्हे हा राजपथ येत होता.त्या राजपथावरुन पद्मावती माची,शिवापट्टण महादरवाजा आणि या माचीला पुढे धोका संभवत होता.मोंगली आगर आदिलशाही तोफांचे गाडे सहजपणे कधीही येण्याची शक्यता होती.घोडदळाला किल्ले तोरणा व किल्ले राजगड यांवर हल्ला करण्यास हा राजपथ सुरक्षित सोईचा होता.म्हणुनच किल्ले राजगडाच्या अराखड्यात शिवरायांनी या माचीवर तीन बुरुजांची निर्मिती केली.शिवराय उत्तरेकडून दक्षिणाभिमूख वळले व दोन पाऊले चालुन थबकले.त्यांच्या चेहर्यावर नाराजी पसरली.सर्व आधिकारी भांबावुन एकमेकांकडे पहात होते.शिवराय उद्गारले
"पंत!या बुरुजांच्या बांधकामात एक महत्वाची बाब तुमच्या लक्षात कशी आली नाही.पंत!एक मोठी उणीव राहुन गेली.तुम्ही बलदंड मारगिरीचे हे बुरुंज बांधले.त्यावर गाड्यावरील तोफांच्या मार्यासाठी निरनिराळ्या कोनांतुन विस्तृत जंग्या ठेवल्या.तिनही बुरुजांना जोडणारा मार्ग तोफांच्या गाड्यासाठी बांधला.पंत!या बुरुंजावरील मोठ्या तोफा 'चरकी'वरील नाहीत.तुम्हास ठावुक आहे.येथील तोफा गाडावरील आहेत.पण पंत! तोफ डागल्यावर टाकलेल्या बारासोबत तोफेचा गाडा बसलेल्या दणक्याने मागे सरतो.हे आपणांस सांगावयास नको.हे तो तुम्हा अवधियांसी ठाऊकी आहे.मग या बुरुंजालगतचा हा डोंगरकडा फोडावयास हवा.ह्या बुरुजांच्या मागे पाच दहा हात तरी जागा समतळ मोकळी हवी.अन्यथा तोफ डागल्यावर स्फोटाच्या दणक्याने तोफेचा गाडा मागे सरुन डोंगराच्या वेड्यावाकड्या भागावर आपटेल.गाडा कलंडला जाईल.गाडा मोडून पडेल अगर परत गाडा जोराने पुढे जाऊन तटाची जीभि तोडून तोफेसहीत गाडा खाली कोसळेल.आपणांस नाहक एका लाखमोलाच्या भांड्याली मुकावे लागेल.सांप्रत मोठी भांडी सहजासहजी मिळत नाहीत.पंत!डागलेल्या तोफेच्या दणक्या सरशी काय होईल हे लक्षात आले का?हे मारगिरीचे बुरुंज व यावरील भांडी अत्यंत महत्वाची आहेत.तोरणा व मुरुंबदेवगड यांची सुरक्षितता याच भांड्यांच्या गलोल्यावर अवलंबुन आहे.पंत!ही कोताई आताच्या आत्ता माझ्या समक्ष दुर करा."
बांधकाम प्रमुख तिमाजीला सांगुन बेलदारांचा मुखिया हिरामणला पाचारण केले.सुरुंगाचे साहीत्य घेऊन हिरामण व तोरमणने शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे सुरुंग तयार केले व त्याला वातान लावली.बापाच्या अनुभवाखाली तोरमण सुरुंग पेटवण्यास पटाईत झाला होता.हिरामणने ओरडुन ओरडुन सर्वांना लांब जाण्यास सांगितले व तोरमणने सुरुंग पेटवला.तोरमण चपळाईने मावळतीकडे पळाला.सुरुगाचा बार झाला.सार्यांना स्फोटाबरोबर धुर व मातीचा ढग जमिनीपासुन उफाळुन काहीशा उंचीवर दिसला.खडक दुभंगुन ठीकर्या उडाला.आता दुसरा सुरुंग झाला व तिसर्या सुरुंगास तोरमणने बत्ती दिली व तो पळाला.पण,दहा पाऊलावर वेलीच्या भांडोळ्यात त्याचा पाय आडकला व तोंडावर पडला.हातातील पेटत्या काकड्यामुळे जवळील गवतास आग लागली.तितक्यास सुरुंगाचा स्फोट झाला.निमिषार्धात एक मानवी आकृती निमिषभर सर्वांच्या समोर आडवी उभी होऊन समोरील तटाखाली फेकली गेली.पुत्र वात्सल्यापोटी हिरामण आर्त किंकाळी फोडत बेशुद्ध पडला.घटका भराने धुर विरला.माती खाली बसली.
काहीशा अगतिकतेने महाराज हिरामण जवळ आले.समोर पाहीले तर तोरमण थरथरत,घाबरलेल्या स्थित धडपडत उभा राहीला व महाराज म्हटले,
पंत! तो पहा जिवंत आहे तो.हिरामण शुद्धीवर आला व त्याने तोरमणला मिठी मारली व म्हटला की,"धनी!तुमच्या पुण्याईमुळे माझ लेकरु जिवंत आहे.सुरुंगात सापडुन देखिल तो वाचला.ही रहाळातील वाघजाईची ही कृपा"
महाराजांनी तोरमणला जवळ घेऊन पाठीवरुन हात फिरवला.
शासकीय आधिकार्यांस व बांधकामावरील मजुरांस उद्देशु म्हणाले,
"याला तो संजीवन प्राप्त जाहलें!समस्त पंत हो!या पुढे या आकरिताची चिरंतन स्मृती किल्ले राजगडाच्या पश्चिमेकडील माचीस "संजीवन माची" ऐसे संबोधने!"
गडे हो,कधी त्या राजगडावर गेलात.तर,संजीवन माचीच्या पहील्या टप्प्यावर त्या तीन बलदंड मारगिरीच्या बरुजांच्या मागे चतुर्थीच्या चंद्रकोरीप्रमाने कंसाकृती दगडाचे पक्के बांधकाम अढळेल.तिथेच ही कथा घडली व त्या माचीस संजीवन माची असे संबोधले जाऊ लागले.
परंपरागत जनमानसांत या अशा प्रकारच्या अनेक दंतकथा, लोककथा प्रचलित असतात.त्याचा गाभा मात्र सत्याचाच असतो.घडलेल्या ऐतिहासिक घटनांभोवती या कथा गुंफलेल्या असतात.इतिहास लेखनात याला महत्व नसते.कारण,या घटना घडत असतात तेव्हा प्रगल्भ लेखक हजर नसतो.
(विषय-दंतकथा व लोककथा सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांच्या)
संदर्भ-
किल्ले राजगड कथा पंचविसी
लेखक-आप्पा परब
लेख - नवनाथ आहेर
Tags
इतिहास