आंग्रेकालीन चलन 'अलिबागी रुपया'
दि. १८ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3jXBrm0
चलनात वापरात असणारा पैसा हा काळानुरूप बदलत गेला. शिवकाळापासून ते आजच्या मोदी काळापर्यंत पैशाचे स्वरूप बदलत गेले. मात्र, आजही जुन्या चलनाबाबत लोकांना आवड, उत्सुकता आहे. पूर्वी आंग्रेकालीन अलिबागचेही स्वतःचे असे एक चलन बाजारात अस्तित्वात होते. या चलनाला 'अलिबागी रुपया' म्हणून संबोधले जायचे. असे चलन अस्तित्वात होते याला कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनीही दुजोरा दिला आहे.अलिबागी रुपयावर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिक्का होता. पुढे आंग्रे काळात याचे रूपांतर ‘श्री’ या अक्षरात केले गेले. हे चलन खास आंग्रे परिसरात चाले. पण यामुळे त्या काळात आजच्या पैशांप्रमाणे जुना रुपया आणि नवा रुपया असे भेद अस्तित्वात आले होते. आंग्रे यांचा हा रुपया अधिक शुद्ध होता. गंमत म्हणजे त्यावेळी आंग्य्रांचे ८८ रुपये म्हणजे इंग्रजांचे १०० रुपये असत.
एकेकाळी आंग्रे काळात येथील टाकसाळीत तयार होणारा प्रसिद्ध 'अलिबागी रुपया' सर्वत्र प्रसिद्ध होता. गाव त्यासाठीच ओळखले जात असे. मात्र या घडीला त्याची फारशी माहिती कुणालाही नाही.
ब्रिटिशांचे राज्य येण्यापूर्वी या देशात अनेक राजे-महाराजे आणि संस्थानिक आपापली स्वायत्तता राखून होते. त्यांचे स्वत:चे कायदे, संरक्षक दल आणि अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. तशी नाणीही ही मंडळी स्वत:च्या नावाने पाडत असत. त्याकाळी खेडी स्वयंपूर्ण होती. बलुतेदारी, अलुतेदारी अस्तित्वात होती तो हा काळ होता. त्याकाळी व्यवहार वस्तू विनिमयानेच चालत. पैशांची गरज क्वचित भासत असे. अशा काळात जंजिर्याचा नवाब, आंग्रे यांनी आपले चलन तयार करून घेतले होते. त्यात अलिबागी रुपया होता.
जुन्या अलिबागी रुपयाचे वजन १७१.६४ ग्रॅन्स होते. म्हणजे हा रुपया चांगलाच वजनदार होता. कागदपत्रांवरून दिसत असलेल्या माहितीनुसार इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यावरही हा अलिबागी रुपया चलनात होता. इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीला ढबू, सापिका आणि दमडी ही कमी किमतीची नाणी देखील चालत असत. यापैकी सापिका हे आंग्य्रांच्या अष्टागराचे वैशिष्ट्य होते. त्याचा उल्लेख मागच्या पिढीच्या ज्येष्ठांच्या तोंडीही येत असे. पुढे बराच काळ हा अलिबागी रुपया सुरती व पुणेचाल बरोबर चालत असे.
१८२४-२५ सालात येथील नागाव गावात टाकसाळ होती. तशी या परिसरात आणखी एक टाकसाळ प्रसिद्ध होती नागोठण्याची. नाणे पाडण्याचे ठाणे म्हणून या गावाला नाणे ठाणे आणि पुढे नाणेठाणे हे नाव पडले. हा मोगल राजवटीचा काळ असला तरीही आंग्य्रांनी यात बरीच प्रगती केली होती. त्यांनी नाणे पाडण्याची वतने द्यायला सुरुवात केली. पद्माकर प्रभुणे यांच्यासारखे नाणेशास्त्राचे अभ्यासक अशा वतनदारास ‘पोतदार’ म्हणत असे दाखवून देतात. हे पोतदार या विद्येत पारंगत असत. ते अतिशय कुशलतेने हे काम करत. त्यांना सोनारकामाची पार्श्वभूमी असे. खोटा रुपया म्हणजेच करडा रुपया ओळखण्याचे तंत्रही त्यावेळी विकसित केले गेले. आंग्रेकाळात आणखी एक नाणे या परिसरात प्रसिद्ध होते ते म्हणजे ढबू पैसा. अत्यंत कमी किमतीमुळे ते नाणे लोकभाषेत बराच काळ टिकून होते. एका ढबूच्या दोन शिवराया मिळत, तर बारा शिवराई आणि एक ढबूची एक लादी मिळे. अष्टागरातील काही उत्खननात ही नाणी सापडली आहेत. शिवपूर्वकाळात ‘सजगणी’ तर नंतर 'बुजुरकी' हे नाणेही येथे प्रसिद्ध होते. मुरुड जंजिरा येथेही एक टाकसाळ होती. तेथील रुपयाला 'हबसाणी' रुपया किंवा 'निशाणी' रुपया म्हणत.१८२४-२५ दरम्यान नागाव येथे टाकसाळ टाकण्यात आली होती. या टाकसाळ मधून अलिबागी रुपयांची निर्मिती केली जायची. या अलिबागी रुपयांवर 'श्री' हे चिन्ह आणि किलवर सारखे फुल होते. किलवर हे चिन्ह खाचा करून तयार केले होते. तर 'श्री' हा शब्द देवनागरी भाषेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात सगळीकडे फारशी भाषेचे प्रभुत्व होते. शिवरायांनी आपल्या नाण्यात देवनागरी भाषेचा वापर केला. तीच प्रथा आंग्रेंनी पाळली आणि त्यानंतर 'श्री' या नावाने 'अलिबागी रुपया' चलनात आणला.
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
Tags
माहिती
