श्री मुक्तेश्वर समाधी,तेरवाड कोल्हापूर

 श्री मुक्तेश्वर समाधी,तेरवाड कोल्हापूर 

वेगळ्या वाटा धुंडाळत चालताना जशी आगळीवेगळी माणसे भेटतात त्याचप्रमाणे काही निराळी आणि छानशी ठिकाणेसुद्धा दर्शन देऊन जातात. खरं तर ही ठिकाणं जायच्या यायच्या वाटेपासून अगदी जवळ असतात, पण मुद्दाम त्यांना भेट देण्याचे राहूनच जाते. असेच एक स्थान आहे "तेरवाड "

इचलकरंजी किंवा कुरुंदवाड पासुन जवळच समान अंतरावर तेरवाड हे गाव आहे.या ठिकाणी संत मुक्तेश्वर यांची समाधी आहे.संत मुक्तेश्वर हे १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी होते.ते संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचे नातू होय. यांचा जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकांत मतभिन्नता आहे.

श्री मुक्तेश्वर समाधी,तेरवाड कोल्हापूर
एकनाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. 

एकनाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला.नाथांना दोन मुली. त्यांची दोन्ही नातवंडे मुक्तेश्वर आणि उद्धव महाराज पंचगंगा आणि वारणा नदीकाठी आलेली दिसतात.उद्धव महाराज यांची समाधी वारणाकाठी "बुवाचे वाठार" या गावी आहे. 

मुक्तेश्वरांच्या कुटुंबात पारंपारिक विठोबा व लिला विश्वंभराची उपासना होती. एकनाथांचा हा नातू  आपल्या आजोबा प्रमाणेच दत्ताचा उपासक होता. याच्या वडिलांचे नाव चिंतामणी, आईचे सासरचे गोदावरी ( माहेरचे गंगामाई) होते.त्यांचे वडील, चिंतामणी उर्फ लीला विश्वम्भर हे एकनाथांचे अनुग्रहित व मुक्तेश्वरांचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांचे उपनाम  मुदगल होते. वयाच्या १० व्या वर्षापर्यंत ते मुके होते.विलक्षण तेज बुध्दी असणारा हा बालक मौजी बंधानानंतर बोलु लागला.मुक्तेश्वरांचा कुलस्वामी सोनारीचा भैरव व कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. श्री दत्त हे त्यांचे उपास्य दैवत होते. पूर्वयुष्याचा बराचसा काळ पैठणात आजोळीच गेल्याने ते पैठणच्या भूमीत विविध शास्त्रात पारंगत झाले.दत्तभक्त मुक्तेश्वर फिरत फिरत नरसिंह वाडीच्या परिसरात आले असता पंचगंगेच्या काठी असलेल्या  शांत निसर्गरम्य खेड्याचे आकर्षण वाटले. व ते येथेच स्थिरावले. तेरवाड  जवळ पंचगंगा नदी उत्तरवाहिनी वाहते. यामुळे हि नदी एक तिर्थ मानले जाते.

श्री मुक्तेश्वर समाधी,तेरवाड कोल्हापूर
मुक्तेश्वरांचे ग्रंथकर्तृत्व अफाट आहे. महाभारताची आदी, सभा, वन, विराट  व सौप्तीक ही ५ पर्व, रामायण, गरूड गर्व परिहार, हरिश्चंद्र आख्यान, भगवद्गीता, मूर्खलक्षणे, गजेंद्र मोक्ष, शुकरंभा संवाद, विश्वामित्र भोजन, एकनाथ चरित्र इ. ग्रंथ काही पदे आरत्या भूपाळ्या एवढी ग्रंथरचना उपलब्ध आहे. भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन इत्यादी बाबतींत मुक्तेश्वरांसारखा दुसरा कोणी कवी प्राचीन काळात आढळत नाही. तेरवाड येथे मुक्तेश्वरांचे दत्तमंदिर असून तेथे त्यांच्या पूजेतील दत्तात्रेयांच्या पादुका आहेत.‘विश्वेश लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । तत्प्रसादें मुक्तेश्वरु । निरोपीं तें परिसावें ॥

चिन्मूर्ती लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । त्याचेनि नामें मुक्तेश्वरु । कथा बोले भारती ॥’ अशा अनेक ठिकाणी त्यानी उल्लेख केलेले आढळतात. मुक्तेश्वर हे शिवाचे उपासक असल्यामुळे यांनी शिवरूप दत्ताची आराधना केलेली दिसते.‘कां नाभिपादांत कमळासनु । मध्यकंठांत रमारमणु । स्कंधावरुता त्रिलोचन । अंगयत्रीं जो येकु’ अशी त्रिमूर्ती शिवाची म्हणजे दत्तात्रेयांची कल्पना त्यांनी केलेली आहे. मुक्तेश्वराच्या स्फुट काव्यांत शुकरंभासंवाद, गजेंद्रमोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्रभोजन, हरिश्चंद्राख्यान इ. पौराणिक आख्याने येतात. यांशिवाय त्यानि एकनाथचरित्र लिहिले असून भगवद्‌गीतेचा श्लोकबद्ध अनुवादही त्यानी केला आहे. त्याशिवाय भुपाळ्या, पदे, आरत्या वगैरे आहेत .या सर्व स्फुटरचनेची ग्रंथसंख्या अडीच हजारांच्या घरात जाते. ही सर्व काव्ये आकाराने लहान असली, तरी त्यांतूनही त्याचे अस्सल कवित्व जाणवते.

मुक्तेश्वराची कीर्ती त्याच्या भारतीय पर्वामुळे आहे. आतापर्यंत त्याची आदि, सभा, वन, विराट आणि सौप्तिक ही पाच पर्वे उपलब्ध झाली असून  त्यांनी ती तेवढीच लिहिली असे वाटते. 

   

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম