कोल्हापूरची 'लक्ष्मी' मोटरसायकल

 कोल्हापूरची 'लक्ष्मी' मोटरसायकल

कोल्हापूरला सुध्दा एकेकाळी मोटरसायकलचे उत्पादन होत होते हे कोणास सांगुन पटणार नाही.उचगाव जवळच्या हायवे पलिकडे मुडशिंगीला जाताना मणेरमळयाच्या पुढच्या बाजूस 'केजीपी' हा मोटरसायकल उत्पादनचा कारखाना होता. केजीपी म्हणजे 'किर्लोस्कर-घाटगे-पाटील' होय.

भारतात त्यावेळी मोटरसायकल उत्पादक कंपन्या मोजक्याच होत्या.राजदुत, बुलेट, बजाज स्कुटर या नंबर वनवर होत्या.या काळात इटलीची इनोसेंटी कंपनीची लॅम्ब्रेटा या मॉडेलची डिलरशिप कोल्हापूरच्या घाटगे-पाटील या कंपनीला मिळाली होती.तशा इटलीच्या मोटरसायकल पण भारतीय रस्त्यावर फारच थोड्या प्रमाणात धावत होत्या.त्यावेळी एक पार्टनर माधवराव घाटगे यांना एक कल्पना सुचली की आपणच जर मोटरसायकल उत्पादन चालू केले तर... प्रश्न मोठा होता कारण तो काळ 'परमिट राज'चा होता.केंद्रीय स्तरावर सहजासहजी परवानगी मिळेल याची शाश्वती नव्हती.पण एकदा घाटगेंच्या मनात आल्यावर त्यांनी आपली कल्पना दुसरे पार्टनर जयकुमार पाटील यांना सांगितली. त्यांना ती एकदम पसंत पडली. व त्यावर विचार चालू झाला.या अगोदर 'घाटगे पाटील इंडस्ट्रीज, घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट, काही कंपन्याची असलेल्या डिलरशिप या 'घाटगे-पाटील ग्रूप'च्या कंपन्या जोरदार चालू होत्या.पण मोटरसायकल उत्पादन चालू करायची झेप मोठी होती.फक्त पैसा असुन उपयोगी नव्हता जोडीला तंत्रज्ञानाची जोड हवी होती. रात्रंदिवस  या कल्पनेवर विचार चालू झाला. धाडस मोठे होते.घाटगे-पाटील यांच्यासाठी ही एक मोठी झेप होती.त्यासाठी जागा, उत्पादन,कुशल कामगार,इंजिनिअर यांची आवश्यक होते. यावेळी त्यांच्या समोर शंतनुराव किर्लोस्कर यांचे नाव आले.त्यासाठी माधवराव घाटगे व पाटील यांनी शंतनुराव यांची भेट घेऊन आपली कल्पना सांगितली व त्यांच्या गळी ही कल्पना उतरवण्यास यशस्वी झाले.व तिघांनी एकत्र येऊन ३५℅ प्रत्येकी शेअर्स वर ' किर्लोस्कर-घाटगे-पाटील अॅटो'ची स्थापना झाली.

कोल्हापूरची 'लक्ष्मी' मोटरसायकल
'लक्ष्मी' मोटरसायकल
उंचगावच्या माळावर त्यासाठी जागा निवडण्यात आली.इटलीच्या इनोसेंटी कंपनी बरोबर करार करण्यात आला. किर्लोस्कर कंपनी कडुन इंजिन, तर आोगले कंपनीच्या डेलस्टारकडुन  मोटरसायकल चेसीस व तत्सम पार्ट घेऊन १९७२ च्या सुमारास उत्पादनास सुरूवात झाली.या मॉडेलला 'लक्ष्मी' हे नाव देण्यात आले. 

ही मोटरसायकल ४८ सीसीची होती.सायकल सारखे असणारे मोठे चाक, १ लिटरची पेट्रोल टाकी, हातामध्ये दोन गिअर हे त्याचे वैशिष्ट्य होते.या लक्ष्मीमध्ये दोन मॉडेल होती. एक होती किकस्टार्ट तर दुसरी पायडल स्टार्ट. 

किकस्टार्टची किक पुढील बाजुस मारावी लागायची.तर पायडल स्टार्ट ही गाडी मधल्या स्टॅण्डवर ऊभी करून पायडल मारून स्टार्ट करावी लागायची व तेच पायडल मागे विरुद्ध दिशेला फिरवले की याचा उपयोग ब्रेक म्हणुन व्हायचा.या गाडीकडे पाहता त्याकाळी गाडीकडे गरज म्हणून लोक पाहत असत, फॅशन म्हणुन नाही.पाहतापाहता ही लक्ष्मी मोटरसायकल प्रसिद्ध झाली.त्याकाळी मोटरसायकल म्हणजे लोकांना अप्रूप होते.कोल्हापुरची मोटरसायकल म्हणुन स्थानिक भागामध्ये या मोटरसायकलची लोकप्रियता पसरली.हिची किंमत ३५०० ते ३८०० अशी असल्याने  व एवरेजला पण ५५ ते ६० असल्याने क्रित्येक लोकांच्या ही पसंतीस ऊतरली.घाटगे- पाटील कंपन्याचे कामगार तर या गाड्या घेऊ लागलेच शिवाय शेतकरी, दुकानदार व दुधाचा धंदा करणारे गवळी लोकपण या गाड्या वापरू लागले.गाडीच्या दोन बाजुला दुधाच्या घागरी अडकवुन गवळी लोक बुंगाट गाड्या पळवत असत.शिवाय बेकरीवाले लोक पण गाडीच्या दोन्ही बाजूला भल्यामोठ्या पिशव्या अडकवून माल पोहचवण्यासाठी लक्ष्मीच वापरत असत. थोडीफार सुबत्ता असलेल्या घरात लक्ष्मी गाडी हमखास दिसायची. त्यावेळी हप्ता पध्दत नसताना सुद्धा बरयाच लोकानी पै-पै गोळा करून गाड्या घेतल्या व आपले स्वप्न पुरे केले.लक्ष्मी गाडीची लोकप्रियता पाहुन कंपनिने आपले पुढील मॉडेल 'पिझाझ' सुरू केले.ही मोटरसायकल लक्ष्मीच्या तुलनेत लहान वाटावी अशी होती.

कोल्हापूरची 'लक्ष्मी' मोटरसायकल
पिझाझ
(लुनासारखी)या मोटरसायकलला पण १ लिटरची पेट्रोल टाकी,हातामध्ये दोन गिअर, किक स्टार्ट व फुट ब्रेक होते.हिला पण ५५ते ६० एवरेज असल्याने हिला लोकांनी डोक्यावर घेतले.१९८७-८८ या काळात बाजारात स्पर्धा वाढत होती.सरकारी नियम सैल होत होते.अशातच कायनेटिकची 'लुना' व बजाजची M-50 चे आगमन झाले.व लक्ष्मी व पिझाझ' मोटरसायकल मागे पडत चालली.लोकांची आोघ नवनविन गाडयाकडे वळल्यानंतर या गाड्या मागे पडु लागल्या. दुर्दैवाने, तांत्रिक आणि बाजारातील अकार्यक्षमतेमुळे लक्ष्मीला उद्योगात ठसा उमटवता आला नाही.त्यातच कंपनीत संप सुरू झाला व संघटनेच्या आडमुठ्या धोरणाने संप चिघळत चालला. व्यवस्थापन पण आपल्या धोरणावर ठाम होते. तशातच कंपनिचे एक संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या निधनानंतर सुमारे चार वर्षांनी १९८८-८९ मध्ये लक्ष्मी स्कूटरेटचा अंत झाला.सुमारे ३५० कामगार आपली नोकरी गमावुन बसले.

अजुनही काहीजण आयुष्यात पहिल्यांदा घेतलेल्या या गाडीला विसरलेले नाहीत.आता या लक्ष्म व पिजाज गाड्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीज उचंगाव मध्ये शोकेस मध्ये पाहावयास मिळतात. ही कंपनी चालली असती तर कदाचित कोल्हापूरचे नाव मोटरसायकल उद्योगामध्ये गौरवाने घेतले गेले असते. 

 -अनिल पाटील पेठवडगाव

9890875498





animated-motorbike-image-0011
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম