पडद्यामागील शोले

पडद्यामागील शोले

शोले पाहीला नाही असा एकही चाळीशीपलिकडील व्यक्ति नसेल तर मग आता ही रंजक माहीतीही वाचा


खूप मोठी नक्कीच आहे पण खाञीने तूम्हा सर्वाना आनंद देणारी आहे हिंदी चित्रपटसृष्टीतला एक चांगला दिग्दर्शक म्हणून विधू विनोद चोप्राचे नाव घेतले जाते. त्याची बायको अनुपमा चोप्रा.ती एक चांगली लेखिका आहे. तिने लिहीलेले “शोले “ आहे. 


पडद्यामागील शोले

                           जय                                

 ती १९७३ सालची जानेवारी महिन्यातली थंड हवेने भारलेली रात्र होती. अमिताभ बच्चनच्या अंगात १०२ डिग्री ताप होता. त्याचे डोके दुखत होते आणि घशाला कोरड होती. ह्या अवस्थेतही तो एका मोठ्या फिल्मी पार्टीला आवर्जून हजर होता. कारण त्याला जी. पी. सिप्पीच्या नावाजलेल्या प्राॅडक्शन हाऊसच्या पुढील चित्रपटात रोल हवा होता. नुकतेच एकापाठोपाठ त्याचे बरेच चित्रपट आपटल्याने त्याला हे काम अत्यंत गरजेचे होते.

जी. पी. सिप्पींचा मोठा मुलगा रमेश आपल्या “अंदाज “ आणि “ सीता और गीता “ नंतरची तिसरी फिल्म लाॅंच करत होता. त्यासाठीच सदरची पार्टी होती. नवीन चित्रपट असला तरी सिप्पींच्या गोटातून “सीता और गीता “ ची यशस्वी जोडी - धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही या नवीन फिल्मसाठी जवळ जवळ निश्चित झाली होती. 


पण कथेत आणखी एक पुरूष नायक होता. अमिताभ ह्या रोलसाठी उत्सूक होता. पण सिप्पींच्या वितरकांना तो नको होता. उंच शरीर , लांबुडका चेहरा असलेला आणि कोणतेही बाह्य आकर्षण नसलेला तो हिरो आहे असे त्यांचे म्हणणे होते.( तोपर्यंत “जंजीर “ प्रदर्शित झाला नव्हता) मध्यरात्र उलटल्यावर पार्टीत त्यावेळचा हिट स्टार शत्रुघ्न सिन्हाने “ ग्रॅंड एंट्री “ केली. त्याचे “रामपूर का लक्ष्मण “ आणि “ भाई हो तो ऐसा “ हे चित्रपट नुकतेच बाॅक्स औफिस हिट झाले होते. अशा हिरोंचा हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच उदो उदो होत असतो. त्याप्रमाणे त्याला मध्यभागी ठेऊन धर्मेंद्र - हेमा जोडीसह त्यांचे पटापट फोटो क्लिक होऊ लागले. साहाजिकच अमिताभ बाजूला सारला गेला होता. एक वितरक वाकून रमेश सिप्पीच्या कानात कुजबूजला “ ये है आपकी कास्टिंग. उस लंबूजीका सोचना भी मत !” रमेश फक्त हसला.सलीम - जावेद जोडीकडे एक फक्त चार ओळींची कथा होती. ह्या कथेवर सिप्पी बापलेक फिदा होते. फक्त ती अडीच ते तीन तासांचा चित्रपट होण्याएवढी वाढवण्याची आवश्यकता होती. त्या चार ओळी अशा : एका आर्मी औफिसरच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल केली गेलेय. त्याला ह्या गोष्टीचा बदला घ्यायचाय. त्याला सैन्यातून कोर्ट मार्शल करून हाकलून दिलेल्या दोन ज्युनियर औफिसर्सची आठवण येतेय बदलाकांड करण्यासाठी. हे दोघे लबाड आणि बदमाश आहेत पण धीट आहेत. बस्स. एवढीच रूपरेषा होती. जी. पी. सिप्पी अनुभवी आणि मोठा निर्माता. म्हणाला “ मला मोठी फिल्म बनवायची आहे. ह्या चार ओळींचा विस्तार करा. “अडचण ही होती की आर्मी बैकड्रॅापवर फिल्म करायची म्हणजे बरेचसे अर्ज, परवानग्या, सरकारी औफिसकडे अनंत हेलपाटे ! मग जी. पी. सलीम जावेदना म्हणाले “ कुछ और कर दो ! “मग निर्माता , दिग्दर्शक, लेखक यांच्यामधे विचारमंथनाच्या बैठका सुरू झाल्या. बर्याच बैठकांनंतर कथेला एक आकार येऊ लागला. पांढर्या शुभ्र कपड्यातला ठाकूर तयार झाला. सलीम खान इंदूरमध्ये डीआयजी असलेल्या वडिलांकडून गब्बरसिंग नावाच्या खर्याखुर्या डाकूच्या कथा ऐकून होता. त्यावरून डाकूचे पात्र तयार झाले. दोन मित्र : एक छचोर,  तर दुसरा उपरोधिक, कुचेष्टेने बोलणारा त्यांचेबरोबर एक छम्मकछल्लो आणि दुसरी विधवा “  “.संजीवकुमार, धर्मेंद्र आणि हेमाचे रोल ठरले. दुसर्या नायकासाठी रमेश सिप्पीच्या डोक्यात शत्रुघ्न सिन्हा होता. वितरक पण शत्रूघ्नसाठी राजी होते. 


पण सलीम - जावेदना अमिताभच हा रोल चांगला निभावेल असे त्याचा “ रास्ते का पत्थर “ हा चित्रपट बघून ठरवले होते. अमिताभमधला स्पार्क त्यांनी हेरला होता. म्हणून त्यांनी रमेशला अमिताभबद्दल पटवायला सुरूवात केली होती. विचाराअंती रमेशला पण वाटले की शत्रुघ्न बडा स्टार आहे आणि तीन मेगास्टार एकत्र आले की इगोमुळे शूटिंगमध्ये बाधा येण्याचीच शक्यता जास्त. त्यात अमिताभसाठी धर्मेंद्रने पण रमेशकडे शब्द टाकला.आणि अखेर अमिताभने “जय “ चा रोल मिळवला.


गब्बरसिंग

           डाकूच्या रोलसाठी रमेश सिप्पीला डॅनी डेन्झोग्पा हवा होता. जसजसा गब्बरचा रोल भरीव होत गेला तसे त्या रोलचे आकर्षण वाढू लागले. संजीवकुमार आणि अमिताभ या दोघानाही गब्बर आपण करावा असे वाटू लागले. पण ते शक्य नव्हते आणि रमेशला मान्य नव्हते. धर्मेंद्रला ठाकूरचा रोल आवडला. रमेशने त्याला सांगितले “ तू ठाकूर झालास तर शेवटी संजीवला हेमा मिळेल. “ धर्मेंद्रचा हेमाबरोबर रोमान्स नुकताच बहरू लागला होता. आणि पूर्वी संजीवने हेमाला एकदा प्रपोज केले होते. म्हणून धर्मेंद्र वीरूचाच रोल बरा म्हणून गप्प बसला. 


           डॅनीने फिरोजखानच्या “ धर्मात्मा “ साठी पूर्वीच होकार दिला होता. “धर्मात्मा “ चे शूटिंग अफगाणिस्तानात होणार होते. इकडे “ शोले “ चे शूटिंग बंगलोर - म्हैसूर रस्त्यावरच्या रामनगरम गावाजवळील टेकड्यांमध्ये ठरले होते. नेमके औक्टोबर महिन्यातच दोन्ही शूटिंगच्या तारखा ठरल्यामुळे डॅनीला “ शोले “ सोडावा लागला. 


           


अमजद खान खलनायक जयंतचा मोठा मुलगा. त्याला जावेदने १९६३ साली दिल्लीत यूथ फेस्टिव्हलमध्ये “ ऐ मेरे वतनके लोगो “ या नाटकात सैन्य अधिकार्याचे काम करताना पाहिले होते. कांही वर्षांनंतर मुंबईत परत जावेदने अमजदला एका इंग्रजी नाटकात काम करताना पाहिले होते. सलीम जयंतला ओळखत असल्याने त्याने अमजदच्या घरी जाऊन गब्बरच्या रोलसाठी तू योग्य आहेस असे मला वाटते असे सांगितले. अशा पद्धतीने सलीम - जावेद जोडीने अमजदला रमेशकडे आणले. कारण त्यांना त्याच्या अभिनय सामर्थ्याची खात्री होती. एकदा ठाकूरच्या नोकर - रामलालचे काम करणार्या सत्येन कप्पूना सलीमने विचारले “ कप्पू साब, क्या अमजद आपसे अच्छा आर्टिस्ट है ? “ कप्पू लगेच म्हणाले “ हां, मुझसे अच्छा ॲक्टर है, यंग है, उसकी थिंकींग फ्रेश है.” हा प्रसंग सिप्पींच्या औफिसमध्येच घडल्यामुळे ४ दिवसांनंतर अमजदला स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले. टेस्टला अमजद आला तो बारीक दाढी वाढवूनच. त्याने आपले दात काळे केले होते. त्याची भाषा आणि शब्दोच्चार रोलसाठी अगदी योग्य होते

.

तो अमजदचा शूटिंगचा पहिला दिवस हता. डायलाॅग होता “कितने आदमी थे ?” 


अमजद आपला हिरवा, विरलेला आर्मी युनिफाॅर्म ( हा मुंबईच्या चोर बाजारातून विकत आणला होता.) पहनून आला होता. सततच्या तंबाखूमुळे काळे झालेले दात आणि हातात चंची असा सगळा जामानिमा तयार होता. हे सारे व्यवस्थित असतानाही खुद्द कॅमेरा सुरू झाल्यावर अमजद बिथरला. त्याला बोलता येईना. वर्षानुवर्षे नाटकात कामे करून वाहवा मिळवलेला हा अभिनेता “गब्बर” रंगवताना नर्व्हस झाला. एवढे दिवस रिहर्सल्स करून अंगात भिनवलेला गब्बर कोण जाणे कुठे निसटून गेला ! 


४० अयशस्वी टेक्सनंतर रमेशने त्याला जवळ घेतले, समजावले “ तुझे शूटिंग आपण नंतर घेऊ. तू फक्त आहे त्या ड्रेपरीत सेटवर बसून गब्बर अंगीकृत बाणवण्याचा प्रयत्न कर. अपने आपको सीझन कर दे. “


          त्या रात्री हाॅटेलच्या रूममध्ये अमजद ओक्साबोक्सी रडला. बाप जयंत मुंबईत कॅन्सरशी झुंजत होता. अमजदचा मुलगाही फक्त १ महिन्याचा होता. खान कुटुंबाला या चित्रपटाकडून खूप आशा होत्या.पुढील शेड्यूलमध्ये अमजद बराच सुधारला. कांहीच टेक्समध्ये त्याचे शाॅटस ओके होऊ लागले. तरीही युनिटमधल्या कांही लोकांना त्याच्या कॅरेक्टरमध्ये अजून कांही कमी जाणवत होते. त्यात अमजद ह्या क्रूर चित्रपटसृष्टीला नवीन होता. कुजबूज सुरू झाली की रमेश सिप्पीने गब्बर निवडण्यात चूक केलीय. तो “मिसकास्ट “ आहे. 


हा गोंधळ वाढला तसा आतापर्यंत अमजदच्या पाठीशी ठाम राहिलेले सलीम-जावेद पण रमेशला म्हणाले “ तू समाधानी नसशील तर अमजदला बदल.” त्यानंतर बरेच दिवस अमजदला डिच्चू मिळणार अशी इंडस्ट्रीत हवा होती. पण रमेश खमक्या होता. म्हणाला “ गब्बर अमजदच करेल.” सगळी कोल्हेकुई थांबली.


अमजदचे संवाद दुसर्या एखाद्या डबिंग आर्टिस्टने डब करावेत असे सलीम-जावेद जोडीचे म्हणणे होते. कारण त्यांच्या मते त्याचा आवाज रफ आणि खलनायकाला न शोभणारा होता. खूप खोकला असलेल्या लहान मुलासारखा होता. अर्थात हे सलीम-जावेद यांचे मत असले तरी दिग्दर्शक रमेश सिप्पीला अमजदचा नैसर्गिक आवाज योग्य वाटत होता. उलट नेहमीच्या इतर खलनायकांपेक्षा वेगळा असल्याने तो रमेशला भावला होता. तरीही सलीम-जावेदना वाटत होते की पूर्ण चित्रपटभर अंग पसरलेल्या खलनायकाचा असला बारीक आवाज चित्रपटाला मारक ठरेल. सलीम-जावेदचे मत सर्वत्र पसरले. आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळू लागला.हाॅलिवूडचा फाईटमास्टर जिम आणि जया बच्चन मात्र अमजदच्या बाजूने ठाम उभे राहिले. 


जिम रमेशला म्हणाला “तुझी फिल्म आहे. तू काहीही ठरवू शकतोस. पण त्याचा आवाज बदललास तर तू मूर्ख ठरशील. “ रमेश दोन्ही बाजू ऐकून गंभीर होऊन गप्प बसला.अमजदला समजेना की हे लेखकद्वय माझ्याबद्दल असे का वागताहेत ? मात्र एकंदरीत विरूद्ध वातावरणाने तो आतून मोडून गेला.(नंतर त्याचे आणि लेखकद्वयाचे भांडण पण झाले.) करो या मरो अशा स्थितीतली त्याची ही आयुष्यातली पहिली फिल्म होती. सर्व मोठ्या स्टार्समध्ये तो एकटाच नवखा होता. शूटिंगच्या सुरूवातीला आलेल्या नर्व्हसनेसमधून बाहेर पडण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते. मनोमनी त्याला वाटू लागले की आपले करियर संपावे म्हणून कांही यंत्रणा कार्यरत आहेत.शेवटी निर्णय रमेशला घ्यायचा होता. रमेशचे त्याच्या युनिटमधल्या सर्वांशी अगदी घट्ट नाते असे. त्याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा स्वभावगुण म्हणजे कधीही, कोणतीही घाई न करता धीराने, शांततेने समोर उभ्या असणार्या प्रश्नांची उकल करणे.तो कधीच घाबराघुबरा होत नसे. तसेच चिडत पण नसे. ह्या त्याच्या स्वभावामुळे शूटिंग असो वा सुट्टी, आपल्या कलाकारांकडून आपल्याला हवे ते मिळवत असे. फक्त कलाकारच नव्हे तर युनिटमधील प्रत्येकाशी तो असा वागत असे.अमजदविषयी पसरलेली चांगली वाईट मते ऐकून रमेशने आपल्या “गट फीलिंग” ने ठरवले की कोणी कांही म्हणो, गब्बरचे डबिंग अमजदच करेल. हा निर्णय होऊनही चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कांही शंकास्पद आवाज उठतच राहिले. 


पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमजदच्या “त्याच” बारीक आवाजातील लाखो रेकाॅर्डस खपू लागल्या तेंव्हा शंकेखोर गप्प झाले आणि नेहमीच खरा ठरणारा रमेश पुन्हा एकदा खरा ठरला.आणि अमजदने लहानपणी त्यांच्या धोब्याकडून वरचेवर ऐकलेला “अरी ओ शांती” हा डायलाॅग “अरे ओ सांभा” असा बदलून जग जिंकलं !त्याने बहुचर्चित महत्त्वपूर्ण असा गब्बरचा रोल खिशात टाकला आणि ह्या संधीचे सोने केले.


        सूरमा भोपाली

           सूरमा भोपालीचे पात्र रंगवणारा जगदीप खरे तर एकेकाळचा मोठा हिरो. बेबी नंदा बरोबर प्रमुख भूमिकेत काम केलेला. नंतर त्याचे एवढे हाल झाले की शिरीष कणेकरांच्या भाषेत बोलायचे झाले तर आचरट-ए- आझम बनून फुटकळ कामे करावी लागली. पण रमेश सिप्पीने त्याच्या अंगभूत अंगविक्षेपाचा योग्य वापर करीत त्याला well defined असा थापाड्या सूरमा बनवला. आणि तो चित्रपटात कुठेही आचरट वाटला नाही. हे कौशल्य निर्विवाद रमेश सिप्पीमधल्या विचारी दिग्दर्शकाचे !


           जगदीशला एक दिवस अचानक बंगलोरला शूटिंगसाठी बोलावण्यात आले. त्याप्रमाणे तो आलाही. त्या दिवशी रमेश सिप्पी इतरांचे शाॅटस घेत बसल्यामुळे जगदीपला नुसतेच बसून कंटाळा आला. त्याला माहीत होते की बंगलोरमध्ये रेसकोर्स आहे. वेळ जाईंना म्हणून त्याला वाटले चला रेस तरी खेळायला जाऊ. म्हणून त्याने “शोले “ च्या प्राॅडक्शन मॅनेजरकडे १००० रू. मागितले. का कोण जाणे, त्याने पैसे देण्यास नकार दिला. जगदीपला राग आला. “सिप्पींसारखी मोठी कंपनी जर आमंत्रण देऊन असा अपमान करत असेल तर हा मी चाललो परत मुंबईला माझी बैग भरून. सूरमाचा रोल अन्य नटाला द्या.” असा त्याने पवित्रा घेतला. सिनेमॅटोग्राफर द्वारका दिवेचानी हे संभाषण ऐकल्यावर त्ताबडतोब त्या प्राॅडक्शन मॅनेजरला बोलवून त्यानी जगदीपला पैसे देण्यास सांगितले. शिवाय आपल्याकडील पण कांही पैसे जगदीपला देऊ केले. यामुळे जगदीप शांत झाला आणि त्याने मुंबईचा बेत रद्द केला. “शोले” तील प्रत्येक भूमिका अजरामर झाली. तशीच सूरमा भोपालीचीही झाली.


राधा  

पांढर्या शुभ्र साडीतली राधा एकेक दिवा विझवत येत असते आणि जय खाली पायरीवर बसून हार्मोनिका वाजवत तिच्याकडे एकटक पहात असतो. विधवा सून आणि तरूण चोर यांच्यामधील अनोखे, अनामिक बंध आणि हळूहळू फुलणारे प्रेम दर्शवणारा हा सीन खुद्द चित्रपटात एखाद्या मिनिटाचाच असेल. पण हा कॅन करायला रमेश सिप्पीने चक्क २० दिवस घेतले. 



हा सीन सूर्यास्त आणि रात्र यामधील “गोल्डन अवर “ ला ( चित्रपटसृष्टीमध्ये या संधिकालासाठी वापरली जाणारी ही संज्ञा ) शूट करण्याचा रमेश आणि द्वारका दिवेचा या दोघांचा मानस होता. संध्याकाळी ५ नंतर या शाॅटसाठी गडबड सुरू व्हायची. कधी हवी तशी प्रकाशयोजना मिळायची नाही तर कांही वेळा सूर्यास्त लवकर व्हायचा. कधी एखादा तंत्रज्ञ चूक करे तर कधी एखादी वस्तू सेटवरून काढायची राहिलेली असे. पुन्हा येरे माझ्या मागल्या ! सगळे तंत्रज्ञ कंटाळायचे. 

एवढे की हा शाॅट म्हणजे सेटवर एक चेष्टेचा विषय झाला. त्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवशी फक्त कांहीच मिनिटे हा विशिष्ट हवा असलेला संधीकाल मिळे. पण रमेश - दिवेचा जोडी कोणाला बधली नाही. आजूबाजूचे लोक कांही म्हणोत, २० दिवस एवढ्याशा एका शाॅटसाठी जावोत, शेवटी तो शाॅट त्या दोघांनीही आपल्या मनाप्रमाणे घेतलाच !


    अहमद

सचिन पिळगावकर त्यावेळी अगदीच पोरसवदा होता. त्याने इमामचाचाच्या मुलाचे म्हणजे अहमदचे पात्र रंगवले होते. ( वयाने लहान असला तरी संजीवकुमारचा तो जिगरी दोस्त होता. म्हणूनच कदाचित ह्या रोलसाठी संजीवने सचिनचे नाव सुचवले असावे.) 


           रमेश - दिवेचा दुक्कलीने अहमदच्या मरणाचा सीन शूट करताना १७ दिवस घेतले होते. ती दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर जोडी होतीच sticklers for perfection ! लाकडांच्या ज्वालेत शिजणार्या मांसाची पार्श्वभूमी घेतली गेली होती. गब्बर त्यातली गरमागरम लालभडक सळी उचलतो आणि लांबून घोडीवरून येणार्या अहमदकडे दाखवत म्हणतो “ इसको तो बहुत तडपा तडपाके मारूंगा “. नंतर अहमदला ठार मारतानाचे पण शाॅट कॅन केले गेले. पण अखेर रिलीज झालेल्या चित्रपटात ही सगळी दृश्ये कापली गेली. गब्बर जमिनीवर पहुडलाय. कॅमेरा क्लोजअप घेऊन दाखवतो की गब्बर हातावरची एक मुंगी दुसर्या हाताच्या तळव्याने त्वेषाने मारतो आणि पुढील दृश्य : अहमदचे घोडीवर लटकणारे प्रेत - एवढाच सीन चित्रपटात राहिला !


           घोडीवरील शाॅटसाठी रमेशने डुप्लिकेटची सोय केलेली असूनही सचिनने त्याला विनंती केली की सगळे शाॅटस मी देईन. डुप्लिकेट नको. 


( आपले शूटिंग झाल्यावर सचिन रमेशच्या बाजूला बसून दिग्दर्शनाची विविध अंगे शिकत असे.) शाॅट असा होता की अहमदचे घोडीवरचे प्रेत जय आणि वीरू उचलून खाली जमिनीवर ठेवतात. शाॅटची जुळवाजुळव सुरू होती तोपर्यंत अमिताभने सचिनच्या कानात सांगितले की तू तुझे शरीर ताठर ठेव. म्हणजे आम्हाला उचलायला हलके जाईल. सचिनने मान डोलावली. 


नंतर शाॅट घेतला गेल्यावर सचिनच्या शरीराची अचूक ताठरता आणि त्याच्या विलक्षण व्यावसायिकतेने भारून गेलेल्या अमिताभने नुकतेच मिसरूड फुटलेल्या सचिनला विचारले “ किती सिनेमात काम केलंयस आतापर्यंत ?” सचिन म्हणाला “ अंदाजे साठ.” अमिताभ गारच झाला. त्याने परत विचारले “ केंव्हापासून चित्रपटात काम करतोयस ?” उत्तर आले “१९६२”. या संवादांनंतर अमिताभने सचिनला ज्येष्ठ मानून त्याच्याशी तसे वागण्यास सुरूवात केली.


          वीरू

“शोले” च्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडला होता. पण प्रत्येक प्रेमकथेतील अडथळ्यांप्रमाणे इथेही अडचणी होत्या. त्याचे लग्न झाले होते आणि त्याला मुलेही होती. शिवाय शुद्ध अय्यंगार ब्राम्हण असल्याचा अभिमान असलेल्या तिच्या आईला धर्मेंद्र आवडत नव्हता.



जेंव्हा जेंव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचे रोमॅंटिक सीन्सचे शूटिंग असे तेंव्हा तेंव्हा तो स्पाॅट बाॅईजना सतत चुका करण्यासाठी पैसे देत असे. ज्यायोगे त्याला तिच्या निकट रहाता येत होते. शिवाय एका विशिष्ट प्रसंगात मिठी पुन्हा पुन्हा मारता येत होती. धरमपा आणि स्पाॅट बाॅईज यांच्यामध्ये सांकेतिक खुणा पण ठरलेल्या होत्या. त्यानुसार ते कधी ट्राॅली ढकलताना चुकवायचे तर कधी रिफ्लेक्टर खाली पाडायचे. अशा रीतिने ती पोरं या प्रेमकथेच्या माध्यमातून दिवसाकाठी दोन दोन हजार कमवायचे !

अगदी भरवशाचा माणूस म्हणून हेमा रमेश सिप्पीची प्रत्येक गोष्ट मानत असे. धर्मेंद्र रमेशच्या मागे “ तू प्लीज मध्यस्थी कर ना “ म्हणून मागे लागला होता. शेवटी हळू हळू हेमा पण धर्मेंद्रमध्ये गुंतू लागली आणि त्याच्यासोबत उघड उघड फिरू लागली.धर्मेंद्र हाॅटेलमधून सेटवर जाताना नारळ पाणी घेऊन जात असे. अर्थातच त्यात दारू मिसळलेली असे ! 


“जब तक है जान “ हे गाणं संपल्यावर वीरू आणि बसंतीला जय सोडवतो. वीरू अर्धवट शुद्धीत असलेल्या बसंतीला उचलून नेताना पायाने किक मारून बंदूकीच्या गोळ्याने भरलेली ट्रंक उघडतो आणि त्यातल्या गोळ्या बंदूकीत भरून पुढे निघतो. ह्या प्रसंगाचे शूटिंग चालू होते. पण सकाळपासून “नारळ पाणी “ प्यालेल्या धर्मेंद्रला ती ट्रंक उघडण्यासाठी किक मारताच येईना. 


शेवटी बरेच टेक्स वाया गेल्यावर एकदाची किक बरोबर बसली. गोळ्या घेऊन त्याने बंदूक लोड केली. आपल्याला जमलं का नाही ह्या विचाराने तो स्वत:वरच चिडला आणि त्याने बंदूकीचा एक बार हवेत काढला. 


अमिताभ वरच्या बाजूला एका मोठ्या दगडावर उभा होता. त्याला चाटून गोळी गेली. (फाॅरेनच्या फाईटमास्टरने खर्याखुर्या गोळ्या वापराव्यात असा सल्ला दिल्यामुळे ट्रंकेतल्या सर्व गोळ्या खर्या होत्या.) या प्रकाराने युनिट मेम्बर्स चिडले. फाईटमास्टर जिम आपली कॅप रागाने आपटून आपला निषेध नोंदवीत सेटवरून निघून गेला. 


           मागितली. आणि पुढील कांही दिवस तरी शूटिंगदरम्यान नारळ पाण्याशिवाय राहिला. !!!


              नफरती

“शोले” मधील बहुतांश नटांना मुंबईत जुहू बीचवर पहाटेच्या वेळी घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले गेले होते. कारण ती चित्रकथेची मागणी होती. लोकेशनवर घोड्यांना सांभाळणे हे कर्म महाकठीण होते. अंदाजे २० घोडे मुंबईहून बंगलोरला ट्रकातून पाठवले गेले होते. मुंबईतील घोडे चित्रपटात वरचेवर काम करून सरावलेले होते. प्रखर लाईटस, सगळीकडे विखुरलेले कॅमेर्यासारखे तांत्रिक आणि अवजड साहित्य किंवा अगदी एखादा छोटा स्फोट या गोष्टींमुळे ते विचलित होत नसत. “ॲक्शन “ आणि “कट” या और्डर्सना पण ते व्यावसायिक नटाप्रमाणे प्रतिसाद देत असत. पण खुद्द बंगलोरमधील म्हैसूर रेस क्लब व इतर कर्जाऊ आणलेले घोडे शूटिंगसाठी तसे नवखेच होते. 


त्यात एक तपकिरी रंगाची इजिप्शियन घोडी होती. ती रेसमध्ये पळणारी घोडी होती आणि तिचे नाव होते नफरती



अचानक उद्भवणारे आवाज, मोठ्या लाईटसचा प्रखर उजेड आणि मोठ्या मोठ्या मशिन्सनी ती बिथरत असे. त्यामुळे तिच्यावर स्वार होणार्या अनेकांना तिने खाली फेकून दिले होते. एवढे की शेवटी युनिटवाल्यांनी तिचे नाव “नफरती” ठेवले !

           तिने कोणालाच सोडले नाही. ठाकूर-गब्बर पाठलागाचे शूटिंग करत असताना तिने अमजदला पाच वेळा फेकून दिले. एकदा तर त्याच्या पाठीवर पाय देऊन उभी राहिली. धर्मेंद्रला पण एकदा अचानक आलेल्या आवाजाच्या भीतिने तिने जमिनीवर लोळवले. 


कालिया झालेल्या विजू खोटेने नफरतीवर बसून बरेच शूटिंग केले. पहिल्या आठवड्यातच तिने विजूला सहा वेळा पाडून त्याची हाडे खिळखिळी करायला सुरूवात केली. अडचण अशी होती की शूटिंगसाठी आणलेले बहुतेक घोडे पांढर्या आणि काळ्या रंगांचे होते. ही एकच तपकिरी रंगाची होती. डाकूंचा गावात शिरतानाचा जो पहिला शाॅट ओके झाला त्यात नफरतीवर स्वार कालिया होता. त्यामुळे गावातील उर्वरित सर्व शूटिंगला “कंटिन्यूटी” मुळे कालियाला नफरतीवर बसण्याशिवाय पर्यायच नव्हता.


           कालियाने घेतलेल्या रायफलचा शरीराला थोडा जरी स्पर्श झाला तरी नफरती वेड्यासारखी सैरावैरा पळत सुटे. विचाराअंती असे ठरले की विजू खोटेने रायफल आणि घोड्याचे अंग याच्यामध्ये आपला पाय सतत आडवा घालायचा म्हणजे नफरतीला रायफल स्पर्शू नये. चित्रपटात बारकाईने बघितल्यास कांही लाॅंग शाॅटसमध्ये विजूने पाय विचित्र ॲंगलमध्ये ठेऊन रायफल दूर केलेली दिसते.


           गावाचे विहंगम दृश्य दाखवणार्या एका क्रेन शाॅटचे वेळी आपल्या मागे मोठे कांहीतरी फिरतेय असे जाणवल्याबरोबर घाबरलेल्या नफरतीने विजू खोटेला एका मोठ्या दगडावर फेकून दिले. आधीच वैतागलेला विजू म्हणाला “ बस्स झालं, आता मी या घोडीवर बसून शूटिंग अजिबात करणार नाही.” 


रमेशसह सर्वांनी त्याला समजावयाचा प्रयत्न केला. पण तो ठाम राहिला. अखेर हिंदीतले जुनेजाणते फाईटमास्टर अझीमभाईनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले “ बाबा, अभी नही बैठोगे तो जिंदगीमे कभी नही बैठोगे.” त्यांनी हळुवारपणे विजूला घोडीवर बसवले आणि पाय नफरतीपासून लांब ठेवण्याचा सल्ला देऊन मग शाॅट घेतला गेला.


पुढील शेड्यूल सुरू होण्यापूर्वी विजू मुंबईला घरी जाऊन आला. पण बंगलोरला आल्यावर त्याला कळले की त्याला परत घोडीवर बसावेच लागणार नाही. कारण त्या शेड्यूलमध्ये गब्बरच्या डेनमध्ये कालिया मारला जातो एवढाच त्याचा सीन चित्रीत व्हायचा राहिला होता. त्यामुळे त्याचे नफरतीशी दुश्मनी नाते संपले होते


    सांभा

चित्रपट पूर्ण झाला. रिलीज डेट आली तरी दिग्दर्शक रमेश सिप्पीने पूर्ण चित्रपट पाहिला नव्हता. कोणत्याही चित्रपटाचा दिग्दर्शक सतत चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे कांही वेळा झालेल्या शूटिंगचे रशेस बघतो. तर कांही वेळा रशेस न बघता तो पुढील शाॅटमध्ये व्यग्र होतो. ह्या कारणाने रमेशने पूर्ण सिनेमा पाहिला नव्हता. 


पण रमेशच्या वडिलांनी - जी.पी.सिप्पीनी संपूर्ण चित्रपट लंडनमध्ये प्रिंटस प्रोसेसिंगला गेल्या असताना पाहिला होता. त्यांना चित्रपट धंद्याची चांगली जाण होती. त्यांच्यातला मुरब्बी निर्माता आपल्या मुलावर अत्यंत खूष होता. जी.पीं. नी ओतलेल्या पै न पैचे रमेशने सोने केले होते. जी.पी. त्यांच्या बंगलोरच्या वितरकाबरोबर डर्बीला जात असताना त्या वितरकाने विचारले “ सिप्पी साब, कैसी लगी आपको पिक्चर ?” सिप्पी म्हणाले 


“ ये पिक्चर दस साल नही उतरेगी !” मोहन मकिजनी उर्फ मॅकमोहन उत्तम क्रिकेट खेळत असे. 


खरे तर क्रिकेटर होण्यासाठी तो मुंबईत आला होता. परंतु सुरूवातीला नाट्यक्षेत्रात कामे करून तो हिंदी चित्रपटसृष्टीतच स्थिरावला. “शोले” मधील त्याचा सांभाचा मूळ रोल मोठा होता. पण एडिटिंगमध्ये तो बराच कापला गेला. एका महाकाय दगडी शिळेवर बंदूक घेऊन बसून फक्त सभोवती पहात राहणे हे काय चित्रपटातले काम झाले काय अशी त्याची भावना झाली होती. त्यामुळे मॅकमोहन खूप नाराज होता. त्याने रमेशला हटकले “ काय हे रमेशजी ? मी तर फिल्ममध्ये एक्स्ट्राच दिसतोय. माझा रोल पूर्णच कापून टाका. मला नको तो.” रमेश म्हणाला “ मॅक, जितना मै काट सकता था, मैने काटा. जितना सेंन्साॅर काट सकता था, सेंन्साॅरने काटा. अब कुछ नही हो सकता.” तो पुढे म्हणाला “ पण मी एक सांगतो. ही फिल्म जर चालली तर प्रेक्षक कधीच सांभाला विसरू शकणार नाहीत.” मॅकमोहनने रागाने “शोले” पाहिला नव्हता. पण जेंव्हा लोक रस्त्यावर तो दिसला की थांबून “सांभा” म्हणून हाका मारू लागले तेंव्हा त्याला आश्चर्य वाटले. 


हे कसे काय घडले ? म्हणून तो एके दिवशी मिनर्व्हाच्या संध्याकाळच्या ६ च्या शोला सहकुटुंब गेला. इंटर्व्हलमध्ये प्रेक्षकांनी त्याला घेराव घातला. “सांभा सांभा “ च्या आवाजाने थिएटरमध्ये गोंधळ सुरू झाला. तो नंतर नंतर एवढा वाढला की पोलिसांना बोलावले गेले. त्यांनी त्याला मागील दारातून गुपचूप बाहेर काढले आणि घरी जाण्याची त्याला विनंती केली.रमेशने सांगितलेले शब्द खरेच ठरले. 


प्रेक्षक आज ४० हून जास्त वर्षे झाली तरी “सांभा” ला विसरले नाहीयत !


आणखी एक महत्वाची गोष्ट ! हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित “सांभा “ हे एकमेव पात्र असे असेल की अख्ख्या चित्रपटात फक्त तीन शब्द बोलूनही अजरामर झाले.आणि ते तीन शब्द होते 


“पूरे पचास हजार !”

            जेंव्हा शूटिंग पूर्ण होऊन फिल्म पोस्ट-प्राॅडक्शन स्टेजला येते, तेंव्हा बहुतांश निर्माते सगळ्याच बाजूनी थकलेले असतात. बजेट संपलेले असते. चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आलेली असते. त्यामुळे “चला, आता आवरू या कसेतरी आणि गुंतवलेले पैसे परत मिळवू या” अशी धारणा बहुतेकांची असते. पण सिप्पी ही वेगळी जमात होती. न डगमगणारी, हवा तेवढा पैसा ओतणारी, शांत राहून कोणतीही तडजोड न करता चांगली फिल्म बनवणारी ! 


“शोले” चे बजेट ३ कोटी ओलांडून पुढे गेले होते.आताच्या हिशोबाप्रमाणे हे पैसे अगदीच कमी वाटत असले तरी त्या काळी एवढा पैसा ओतणे म्हणजे मूर्खपणाच होता चित्रपटसृष्टीच्या मते ! प्रत्येक टेरिटेरीला साडेबावीस लाख मिळणार असले तरी ३ कोटी परत मिळवणे अशक्यप्राय आहे असे इंडस्ट्रीचे मत होते. पण सिप्पी बधणारे नव्हते. ते पैसे सोडत गेले.संगीताचे ट्रॅक्स तयार होत होते. रमेशला नावीन्यपूर्ण, एकमेकाद्वितीय असे बॅकग्राऊंड म्युझिक हवे होते. 


उदाहरणार्थ, गब्बरची क्रूरता किंवा राधाची करूण शांतता न बोलता बॅकग्राऊंड संगीतातून प्रतीत व्हावी असे रमेशचे पंचमला सांगणे असे. पंचम पण नावीन्याचा नेहमीच भोक्ता ! त्याने गब्बरच्या एंट्रीसाठी ट्रकच्या डिफरन्शियलमधून सळी फिरवून एक विशिष्ट आवाज रेकाॅर्ड केला ( ह्याचा विडीओ मध्यंतरी वाॅटसअप वर बराच व्हायरल झाला होता. ) व तो खरोखरच प्रेक्षकांच्या मनांत भीति उत्पन्न करणारा होता. बसंतीच्या टांगा पाठलाग दृश्यासाठी पंडित सामता प्रसादनी वाजवलेल्या सिंगल तबल्याच्या आवाजाने प्रेक्षक थरारून गेले. पाठलागाच्या नेहमी वापरल्या जाणार्या स्टाॅक संगीताप्रमाणे हे कांही नव्हते. कांहीतरी वेगळेच होते. 


आकर्षक होते. सर्व तांत्रिक अंगे पूर्ण करून अखेर “शोले” प्रदर्शित झाला. आणि सुरूवातीलाच अफवा पसरली (की पसरवली ?) की “शोले “ फ्लाॅप झाला. प्रेक्षक गोंधळात पडले. समीक्षकांनी कठोर टीका केली. इंडस्ट्रीत नकारात्मक वारे वाहू लागले. आयुष्यात कदाचित प्रथमच, रमेश हादरला मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवरील “मिनर्व्हा” हे “शोले” चे प्रमुख थिएटर होते. ७० मिमी मावेल एवढा पडदा आणि १५०० प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले ते एकमेव थिएटर होते. चित्रपटाचा पहिला शो सुरू असताना प्रेक्षकांकडून कांहीच प्रतिसाद नव्हता. ना टाळ्या, ना हंशा, ना वाहवा, फक्त जीवघेणी शांतता ! प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा त्या खेळाला आर. डी. बर्मनसोबत हजर होते. ते मनातल्या मनात म्हणाले “ ही चार ओळींची कथा मी का सोडली ?”(सिप्पींनी फायनल करण्यापूर्वी मेहरांनी ही कथा नाकारली होती.) चित्रपट संपल्यावर जसे प्रेक्षक थिएटरबाहेर येऊ लागले तसा पंचम (आर.डी. बर्मन) मेहरांना म्हणाला 


“ लोग तो गालियाॅं दे रहे हैं”. प्रेक्षकांची नस अचूकओळखणार्या मेहरांमधला दिग्दर्शक म्हणाला 


“ घाबरू नकोस. ही फिल्म हिट होणार. कोणीही तिला थांबवू शकत नाही.”


-----------------------------------------------------------


दिलीपकुमारला फिल्म आवडली. राज कपूर म्हणाला” ठीक आहे पण अजून थोडा रोमान्स हवा होता.” राजेंद्रकुमारला कांही फारसा आवडला नाही “शोले”.


       इंडस्ट्रीत चेष्टा सुरू झाली. हे “शोले” नसून “छोले” आहेत असा एक कुजकट रिमार्क आला. चित्रपट समीक्षकांनी चौफेर हल्ले केले. फिल्मफेअरमध्ये छापून आले “ ही फिल्म धड ना वेस्टर्न ना आपली आहे.” आता सिप्पींची मदार जनता जनार्दन प्रेक्षकांवर होती. १५ औगस्ट १९७५ या दिवशी फिल्म प्रदर्शित झाली. त्या दिवशी रमेश सिप्पी स्वत: मुंबईतल्या सर्व चित्रपटगृहात फेरी मारून आला.  सगळीकडे मरणप्राय शांतता होती. आठवड्याच्या शेवटी सिप्पींकडे घबराहट सुरू झाली. तिकीटे खपत होती पण उत्साहवर्धक वातावरण दिसेना. 


मग जी.पी.आणि रमेश सिप्पी अमिताभच्या घरी बसून ह्या परिस्थितीत काय तोडगा काढता येईल यावर विचार करायला बसले.  ह्या वेळेपर्यंत अमिताभ बडा स्टार झाला होता. त्याला एक वजन प्राप्त झाले होते.) चित्रपटाचा शेवट बदलावा असा एक विचार पुढे आला. ह्या बदलाला सलीम-जावेद राजी नव्हते. रमेशला पण चित्रपट आहे तसाच ठेवावा असे वाटत होते. कारण त्याचा स्वकर्तृत्वावर विश्वास होता. पुढच्या आठवड्यात बुकिंगसाठी रांगा दिसेनात. तेंव्हा रमेशचा धीर खचला. सारे संपले असे त्याला वाटू लागले. बायकोला म्हणाला “ मला वाटतंय, मी नापास झालोय.” वडील जी.पी.सिप्पी ठाम होते. त्यांना अजूनही यशाची खात्री वाटत होती.


        “कभी कभी” च्या शूटिंगसाठी अमिताभ शशी कपूरसोबत काश्मीरमध्ये होता. शशीने आपल्या कुटुंबासमवेत “शोले” पाहिला होता. त्या सर्वांना तो आवडला होता. अमिताभ एका क्षणी भावनाशील झाला आणि शशीच्या खांद्यावर डोके टेकवीत म्हणाला “ नही यार, गयी पिक्चर, फ्लाॅप हो गयी.” अमिताभचे इतर निर्माते म्हणू लागले “ रमेशने तुझे करियर बरबाद केले.” ( ही अर्थात इंडस्ट्रीची नेहमीचीच वागण्याची पद्धत ! )


           अमजद खानच्या घरात स्मशानशांतता होती. शेजारीच शूटिंग करत असलेला असरानी एक दिवस त्याला भेटायला घरी आला. अमजद म्हणाला “ मैंने दम लगा दिया, अब नही चली तो क्या कर सकते हैं ?” असरानी उत्तरला “ लेकिन आपकी तारीफ तो बहुत हो रही है.” 


निराश अमजद म्हणाला “ क्या फायदा यार ?”


------------------------------------------------


एके दिवशी वरळीच्या गीता टाॅकीजच्या मालकाचा रमेशला फोन आला. 


म्हणाला “घाबरू नकोस. पिक्चर हिट है.” रमेश म्हणाला “कशावरून सांगतोयस ?” तर तो म्हणाला “ माझ्या साॅफ्ट ड्रिंक्स आणि आईस्क्रीमच्या स्टाॅलची विक्री जवळ जवळ शून्यावर आलीय. प्रेक्षक इंटर्व्हलला बाहेर येतच नाहीयेत. कारण ते चित्रपटाच्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरूच शकत नाहीत.” मग चतुर रमेशच्या लक्षात आले की शांतता कशामुळे आहे सगळ्या थिएटर्समध्ये ते. म्हणजे अजून फक्त थोडा वेळ जावा लागेल. 


आणि तसेच झाले. चित्र अचानक पालटू लागले. माऊथ टू माऊथ पब्लिसिटीने “शोले”च्या ज्वाळा सगळीकडे पसरल्या ! लोक पुन्हा पुन्हा चित्रपटाला येऊ लागले. चित्रपटाच्या शेवटी वीरू जेंव्हा नाणेफेक करतो त्यावेळी स्टिरीओफोनिक साउंड सिस्टीममध्ये फिल्म पाहणारे प्रेक्षक आपल्या सीटखाली नाणे पडलेय की काय म्हणून वाकून पाहू लागले. आणि अचंबित होऊ लागले.“शोले” चे म्युझिकचे हक्क घेतलेल्या पाॅलिडाॅर कंपनीला लक्षात आले की स्पेशल डिस्काऊंट देऊनही गाण्याच्या रेकाॅर्डसना कोणी हात लावेना. म्हणून कंपनीने रिसर्चसाठी विविध थिएटर्सवर माणसे पाठवली. 


संवादाच्या रेकाॅर्डस काढल्या. हा निर्णय अचूक ठरला. प्रचंड वेगाने रेकाॅर्डस खपू लागल्या. एवढ्या की कंपनीची दमछाक झाली. कांही तांत्रिक दोष असलेली रेकाॅर्डसची एक बॅच कंपनीने विक्री न करता रोखून धरली होती. ती बॅच पण हातोहात संपली. ह्या रेकाॅर्डस विक्रीचा चित्रपट अजून लोकप्रिय करायलाही उपयोग झाला.


           सिप्पींचे नशिब पालटले.


 मिनर्व्हासमोर तिकीटांसाठी मैलोनमैल रांगा लागू लागल्या. मिनर्व्हाचा मॅनेजर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत थिएटरवर राबू लागला. शेवटी शेवटी घरी जाण्याएवढाही त्याच्याकडे वेळ उरेना म्हणून त्याने ने अथक थिएटरमधीलच एका फ्लॅटवर आपले कुटुंब हलवले.आणि मग “शोले “ हिट झाल्यावर अथक परिश्रमाने थकलेला रमेश आपल्या अत्यंत आवश्यक असलेल्या सुटीसाठी लंडनला निघून गेला !                              


     आता हे वाचल्यानंतर जेव्हा शोले पाहू तेव्हा एक वेगळाच दृष्टिकोन असेल .पण यानिमित्ताने पडद्यामागच्या गमती आणि वाचनीय माहिती लोकांनी एकमेकांबरोबर वाटून घेतली. आनंद दिला, घेतला.हे शोले सदैव धगधगते राहतील याची काळजी नियतीनेच घेतलीये.


कुणी नव्या पिढीच्या मुलाने विचारावं ...


अजून किती वर्षं शोलेचं गुणगान गात रहाल ? 


आणि आपण म्हणावं ...


पुरे पचास हजार

स्वैर अनुवाद : भाई देशपांडे , गारगोटी.


मूळ पुस्तक : शोले : द मेकिंग औफ ए क्लासिक.


लेखिका : अनुपमा चोप्रा.


facebook link ; https://parg.co/UAVz


जाता जाता या फोटो मधील कलाकराची नावे माहिती आहे का? 


पडद्यामागील शोले


पहिल्या फोटोतील मेजर आनंद व दुसरा बिहारी

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম