विस्मुर्तीत गेलीली मोजमापे
व्यवहार म्हटले की मोजमाप आले.द्रव्य वस्तु लिटरमध्ये, कापड मीटरमध्ये, इतर वस्तु किलोमध्ये मोजतात हे प्रमाण आज आपल्याला माहीत आहे व त्याचा वापरही चालू आहे.
पण पुर्वी ही मोजमापे वेगळया स्वरूपात होती. आज सोने ग्रॅम मध्ये मोजत असले तरी पुर्वी ते 'तोळा' मध्ये मोजत असत. धान्य मोजताना ते अडीशेर किवा अडीसेर, अडीसरी या मापात मोजत असत. खेडोपाडी ते नाव 'अडीसरी' या नावाने आज सुध्दा वापरात आहे.पासरी व धडा. किती अडीसरी म्हणजे पासरी? दोन? का ….? तसेच किती पासरी म्हणजे धडा?
धान्ये, मटकी चवळी सारखी कडधान्ये,डाळी, पीठे मोजण्याची मापे: सर्वात लहान माप चिमूट व नंतर मूठ . पण ही फक्त सोयीची व अंदाजाची होती. व ती लोकमान्य पण होती. त्यामध्येच माशीच्या पंखाइतकी, नखभर, किंवा ‘ किंचित’ ह्यांचा समावेश करता येईल.(आजही खेड्यात चहाचा आग्रह करताना समोरची व्यक्ती नकार देत असेल तर'घे की नखावडा' हा शब्द वापरतात)
पण प्रमाणित मापे म्हणजे सर्वात लहान निळवे/ निळवं.
२ निळवी = १ कोळवं.
२ कोळवी = १ चिपटं .
२ चिपटी= १ आठवा किवा आठवं.
२ आठवी = १ शेर
ही मापी वजने. चिपटे व शेर प्रत्येक घरात असे.आजही ते आहे. लोखंडी पत्र्याचा,साधारणत: डमरुच्या आकाराचे ते असते.ही पत्र्याची मापे करणारी विशिष्ट कारागिर असत.दारावर ती विकत मिळत असतं.
ही मापे घरची लक्ष्मी म्हणुन ही तिला मान दिला जाई.हे सर्वत्र लोकमान्य होते.मान लचकली तर हा शेर डोक्याखाली घेऊन झोपले तर मान मोकळी होऊन दुखणे हमखास थांबायचे. दुखण्याच्या शेरावर हा शेर सव्वाशेर असायचा! आजही जुनी जाणती माणसं याचा उपयोग करतात.
४ शेर = १ पायली.
१६ पायल्या = १ मण.
२० मण= १ खंडी.
असे मापाचे याचे प्रमाण असे.
पुर्वी व आता दुधा तेलाची मापे: दूध मापून देत व तेलही.
१ पावशेर ;
२ पावशेर = १ अच्छेर (बहुधा अर्धा शेर ह्या अर्थी)
२ अच्छेर = १ शेर.
तेल मोजून देताना
१ १/२,(दीड पाव) पाव = १ अडीशेर (अडीच शेर) किंवा अडीसरी.
२ अडीशेर किंवा अडीसरी = १ पासरी.
२ पासरी = १ धडा.
अशी मापे असत.
यावरूनच "नमनाला धडाभर तेल !" ही म्हण अस्तित्वात आली असावी.
मिठाई तोलताना (तराजूत वजने ठेवून) छटाक (हे लहान माप तेल मापतानाही असायचे.) हे सगळ्यात लहान माप होते. (साधारणतः ५० ग्रॅम)
४ छटाक = १ पावशेर.
२ पावशेर = अर्धा शेर.
२ अर्धा शेर किंवा ४ पावशेर = १ शेर.
वाण्याकडे या शेराच्या पटीतच व्यवहार चालत असे.तसेच सुपारी तीळ खोबरे साखर वगैरे वजन करून देतानाही वापरत.
भाजीबाजारात पण ही सांगितलेली दीड पाव = १ अडीशेर किंवा पासरी ही मापे वांगी भेंड्या गवारी घेवडा ह्या सारख्या भाज्या मापुन देतानाही वापरत.
लाकुड वखारीत लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मण ही वजने असत.
सोने तोलताना गुंज हे सर्वांत लहान माप. गुंजा दिसायलाही सुंदर असत. केशरी लाल व त्यावर देठाच्या जागी काळा ठिपका. गुंज चमकदार असे. सशाच्या डोळ्यांनाही गुंजेचीच उपमा आहे.ती यामुळेच ‘गुंजेसारखे लाल ( व लहान)डोळे लुकलुकत होते’. या अर्थी.
तर अशा
८ गुंजा= १ मासा.
१२ मासे= १ तोळा.
एखादी वस्तु अगदी थोडी घ्या किंवा द्या म्हणायचे असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे, दोन बोटांच्या चिमटीत मावेल, चिमूटभर, माशीच्या पंखाएवढी, गहूभर, गव्हाएवढी म्हणले जात असे. कमी लांबीची सांगताना “ उगीच बोटाचे अर्धे किवा एका पेरा एव्हढे घ्या /द्या म्हटले जाई. नाहीतर “ एक टिचभर म्हणजेच अंगठा ते तर्जनी एव्हढे अंतर, जर त्या पेक्षा जास्त असेल तेव्हा एक वितभर म्हणत.
▪️चलन :
तीन पै = एक पैसा
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
दोन ढब्बू पैसे = एक आणा
दोन आणे = एक चवली
दोन चवल्या = एक पावली
दोन पावल्या = एक अधेली
दोन अधेल्या = एक रुपया
विटी दांडू किंवा गोट्या खेळताना ही दोन मापे वारंवार उपयोगात यायची. पण कुणाची हेटाळणी करण्यासाठीही ह्याचा सढळ ‘हाताने’ वापर होत असे.
कापडाच्या दुकानात गज (तीन फुटाची धातूची,इंचाच्या व फुटांच्या खुणा असलेली जाड पट्टी असे. वेळेत सापडली नाही तर कापड दुकानदार ‘हातभरा’चे माप काढून कापड मोजून देई. हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन अगदी अडीच ‘वार’ सुद्धा मोजून द्यायचा!
किराणा दुकानात दर्शनी एक तराजू टांगलेला असे. त्यात एका तागडीत कायमचे वजन ठेवलेले असे. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाराचे वजन ठेवल्यानंतरच ते वजन काढले जाई. केव्हाही दोन्ही तागड्या रिकाम्या दिसणार नाहीत.
▪️अंक :
१ - एक
१० - दहा
१०० - शंभर
१००० - हजार
१०००० - दहा हजार
१००००० - लक्ष
१०००००० - दशलक्ष
१००००००० - कोटी
१०००००००० - दशकोटी
१००००००००० - अब्ज
१०००००००००० - खर्व
१००००००००००० - निखर्व
१०००००००००००० - महापद्म
१००००००००००००० - शंकू
१०००००००००००००० - जलधी
१००००००००००००००० - अन्त्य
१०००००००००००००००० - मध्य
१००००००००००००००००० - परार्ध
▪️अंतर :
तीन फूट = एक यार्ड
१७६० यार्ड = एक मैल
दोन मैल = एक कोस
भाजीवाले हातात तागडी धरूनच वस्तू मोजून देत.
नंतर मात्र ही मोजमापे इतिहास जमा झाली असुन आता सरकारमान्य मोजमापावर सर्व व्यवहार चालू आहे.